तालुक्यातील विक्रमी कोविड बाधितांना मिळाला आज डिस्चार्ज! संगमनेरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात ठरले सर्वांत उच्चांकी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील कोविड बाधितांमध्ये मोठी वाढ होत असल्याने अवघा तालुका कोविडच्या दहशतीखाली आला आहे. मात्र दुसरीकडे दररोज रुग्ण बरे होवून घरीही परतत असल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासाही मिळत होता. आजही तालुक्यातील तब्बल 82 रुग्णांनी उपचार पूर्ण केल्याने त्यांना एकाचवेळी घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता तालुक्यातील उपचारांती पूर्णतः तंदुरुस्त झालेल्यांची संख्या 2 हजार 433 झाली आहे. त्यासोबतच संगमनेरने आणखी एक विक्रम नोंदविला असून शहरातील आरोग्यदूतांच्या अथक परिश्रमातून तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.36 टक्के झाले असून हा जिल्ह्यातील उच्चांक आहे.
सुरुवातीच्या तीन महिन्यांत नियंत्रणात असणार्या संगमनेरातील कोविड बाधितांच्या संख्येत गेल्या दोन महिन्यांपासून झपाट्याने वाढ होत आहे. अगदी सुरुवातीला संगमनेर शहर आणि आश्वी बु. येथून समोर आलेल्या व त्यानंतर शहरातील काही ठराविक भागापूरता मर्यादीत असलेला हा प्रादुर्भाव आज तालुक्यातील 132 गावांमध्ये जावून पोहोचला आहे. या महामारीने आत्तापर्यंत तालुक्यातील 2 हजार 664 जणांना बाधा केली आहे. शासकीय आकडेवारीनुसार त्यातील तब्बल 34 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मात्र संगमनेरच्या स्थानिक आरोग्य यंत्रणेने कोविडचा पुढचा प्रवास हेरुन सुरुवातीलाच स्थानिक पातळीवरील आरोग्य व्यवस्था भक्कम करुन ठेवली होती. त्यामुळे गोरगरीब व गरजू व्यक्तिंना कोविडचे संक्रमण झाल्यास घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर हेल्थ सेंटरसह शहरी भागातील नागरिकांसाठी संगमनेर नगर पालिकेच्या प्रांगणातील कॉटेज हॉस्पिटल, वसंत लॉन्स व अमृतवाहिनी शिक्षण संस्था येथे विनामूल्य उपचारांची व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच शहरातील जवळपास एकोणावीस खासगी रुग्णालयांमध्येही सशुल्क अथवा महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही उपचार सेवा पुरविण्यात येत आहे.
यासर्व ठिकाणांहून दररोज रुग्णसंख्येच्या प्रमाणातच उपचार पूर्ण करुन घरी जाणार्यांची संख्या वाढत असल्याने संगमनेरची आरोग्य व्यवस्था आजही ठाकठिक आहे. याच कडीत आज तब्बल 82 रुग्णांना एकाचवेळी घरी सोडण्यात आल्याने संगमनेर तालुक्यातील नागरिकांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी ठरली आहे. संक्रमण झाल्यानंतर न घाबरता आपण तात्काळ उपचार घेतल्यास कोविडचा पराभव अटळ आहे असाच संदेश आज विविध ठिकाणच्या कोविड हेल्थ सेंटरमधून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांत लक्षणे नसलेले रुग्ण मोठ्या संख्येने समोर येत असल्याने तालुक्यात रुग्ण बरे होण्याची सरासरीही कमालीची वाढली आहे. सद्यस्थितीत संगमनेरच्या रुग्ण बरे होण्याच्या सरासरीने जिल्ह्यात उच्चांक केला असून आजच्या स्थितीत संगमनेर तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक 91.36 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यासोबतच तालुक्यातील कोविड मृत्युचा दरही खाली आला असून आजच्या स्थितीत तालुक्यात सरासरी कोविड मृत्युदर अवघा 1.25 टक्के इतका आहे.
तालुक्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर शहरासह काही गावांमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण समोर आले होते, मात्र त्यातील बहुतेकांनी उपचार पूर्ण करीत घर गाठले. यात संगमनेर शहरातील 864 रुग्णांपैकी 801 रुग्ण घरी परतले, 45 रुग्णांवर उपचार सुरु असून 12 जणांचा बळी गेला आहे. त्या खोलाखाल घुलेवाडीतून 201 रुग्ण समोर आले, 184 जणांनी उपचार पूर्ण केले, 15 जणांवर उपचार सुरु असून दोघांचा बळी गेला. तर गुंजाळवाडीतून 118 रुग्ण समोर आले. 107 जणांनी उपचार पूर्ण केले, 11 जणांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय तालुक्यातील अन्य गावातील मिळून एकुण 197 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.