महिलेच्या गळ्यातील सहा तोळ्यांचे गंठन लांबवले! वडगावपान फाट्यावरील घटना; आता ग्रामीण महिलाही असुरक्षित..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारी तालुक्यात सर्वत्र मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह वाहत असताना वडगावपान फाट्यावरुन मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावबाकी परिसरात राहणारी 61 वर्षीय महिला आपल्या मोपेडवरुन संगमनेरच्या दिशेने येत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दोन गंठण घेवून पोबारा केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने आरडाओरड करुन आसपासच्या लोकांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या घटनेत मांगल्याचा सण म्हणून आपल्या संस्कृतीत ओळख असलेल्या मकरसंक्रांतीच्या दिनी एका सुवासणीच्या गळ्यातील तब्बल आठ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सहातोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली असून महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याच्या प्रकाराचे लोण आता शहरापाठोपाठ ग्रामीणभागातही पसरु लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना बुधवारी (ता.14) दुपारी साडेतीनच्या सुमारास वडगावपान फाट्यावर घडली. शहरालगतच्या पावबाकी परिसरात राहणार्या जिजाबाई बाळासाहेब सातपुते (वय 61) या एका नातेवाईकाकडील कार्यक्रमासाठी आपल्या मोपेडवरुन एकट्याच निमगावजाळी येथे गेल्या होत्या. दुपारी कार्यक्रम आटोपल्यानंतर तीनच्या सुमारास त्या घरी जायला निघाल्या. यावेळी प्रवासादरम्यान दुचाकीवरील दोघे आपल्या पाठलागावर असल्याचा संशयही त्यांना आला. मात्र दुपारच्यावेळी रस्त्यावरील वर्दळही बर्यापैकी असल्याने त्यांच्याकडून काही अनपेक्षित घडेल असे त्यांना वाटले नाही. त्यामुळे मनात शंका येवूनही त्यांनी ‘त्या’ चोरट्यांच्या हालचालींकडे दुर्लक्ष केले.

या दरम्यान त्यांची दुचाकी वडगावपान गाव ओलांडून फाट्यावर येताच काहीकाळ त्यांच्या नजरेआड झालेल्या चोरट्यांची दुचाकी वेगाने पाठीमागून आली आणि सदरील महिलेला काही समजण्यापूर्वीच त्यावरील पाठीमागे बसलेल्या एकाने पीडित महिलेच्या

गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मोठे आणि अडीच तोळ्याचे छोटे असे एकूण सहा तोळ्यांचे आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे आठ लाखांहून अधिक मूल्याचे सोन्याचे दोन गंठण ओरबाडून तेथून पोबारा केला. या घटनेनंतर सदरील महिलेने मदतीसाठी आरडाओरडही केली, मात्र तो पर्यंत दोन्ही चोरटे सुसाटवेगाने पसार होण्यात यशस्वी झाले होते.

याप्रकरणी पीडित महिलेने तालुका पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी आपल्याकडे घेतला आहे. गेल्याकाही वर्षात संगमनेर शहर पोलिसांच्या हद्दित महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबवण्याच्या घटना नियमितपणे घडत आहेत, त्यांचा आज-उद्या तपास होवून चोरीला गेलेले दागिने परत मिळतील अशी भाबडी आशा कायम असताना चोरीचे हे लोण आता ग्रामीणभागातही पोहोचू लागल्याने महिलांमध्ये सोनसाखळी चोरांनी भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

या घटनेतील पीडित जिजाबाई बाळासाहेब सातपुते (वय 61, रा.पावबाकी रोड) या निमगांव जाळीहून संगमनेरकडे निघाल्यानंतर लागलीच या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दागिने हेरुन त्यांचा पाठलाग सुरु केला होता. सदरील महिलेला त्या दोघांचा संशय देखील आला. मात्र त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने त्यांच्याकडून काही आगळीक होईल असे त्यांना वाटले नाही. मात्र वडगावपान फाट्याजवळ येताच या दोन्ही चोरट्यांनी अचानक पाठीमागून येत आपला डाव साधला आणि तेथून पोबारा केला. या प्रकरणात संशय आल्यानंतर सदरील महिलेने एखाद्या गर्दीच्या ठिकाणी थांबून आपल्या गळ्यातील दागिने काढून मोपेडच्या डिकीत ठेवले असते तर कदाचित ही घटना टाळता आली असती, मात्र वर्दळीतही असेकाही घडेल याची जाणीव नसल्याने सराईत असलेल्या चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकलाच.

