संगमनेरच्या विषय समित्यांवर कोणाची वर्णी लागणार? नव्यांना संधी की जुन्यांवर विश्‍वास; आमदार तांबेंच्या ‘राजकीय इंजिनिअरिंग’कडे शहराचे लक्ष..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
पालिका निवडणुकीत सलग सातव्यांदा अभूतपूर्व यश मिळालेल्या संगमनेर सेवा समितीने उपनगराध्यक्षपदाच्या निवडीचा पेच निर्विघ्नपणे सोडवल्यानंतर आता पालिकेच्या सत्तेचा खरा ‘कणा’ असलेल्या विषय समित्यांच्या निवडीचे वेध लागले आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवारी जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांमध्ये सभापती निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. संगमनेरात ‘सेवा समिती’ने एकहाती सत्ता राखलेली असली, तरी आमदार सत्यजीत तांबे यांनी मांडलेली ‘संगमनेर 2.0’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोणत्या शिलेदारांच्या खांद्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. यावेळी उमेदवारांची निवड करताना आमदार तांबे यांनी जुन्या-नव्यांचा मेळ घालीत ‘जेन-झी’चा अधिक विचार केला होता, ठराविक मर्यादेत त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची क्षमताही याच पिढीत असल्याने स्थायी व नियोजन समिती वगळता अन्य समित्यांवर त्याचीच छाप उमटण्याचीही शक्यता आहे.

संगमनेरच्या राजकारणात माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची संयमी व सर्वसमावेशक नीती, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा जनसंपर्क आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी सलग 15 वर्षे राबवलेली विकासाची शिस्त, असा मोठा वारसा विद्यमान सत्ताधारी गटाला लाभला आहे. याच भक्कम पायावर आता आमदार सत्यजीत तांबे यांनी आधुनिक संगमनेरचे स्वप्न उभे केले आहे. नुकत्याच झालेल्या स्वीकृत सदस्य निवडीत तांबे यांनी ज्या प्रकारे निष्ठा आणि कौशल्य यांचा मेळ घातला, त्यातूनच त्यांच्या आगामी पाच वर्षांच्या कार्यपद्धतीची झलक पाहायला मिळाली होती.


अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या गटाची सूत्रे हाती घेताना आमदार सत्यजित तांबे यांनी शहरातील सर्व समुदायांना सोबत घेत सलग सातव्यांदा पालिकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. उमेदवारी देताना त्यांनी बदलत्या मतप्रवाहाचा कौशल्याने वापर करीत जुन्या-नव्यांचा संतुलित मेळही घातला. यावेळी सेवा समितीकडून निवडून आलेल्या सदस्यांमध्ये जवळपास दहाजण अनुभवी तर उर्वरीत सतरा सदस्य पहिल्यांदाच सभागृहात दाखल झाले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून डॉ.मैथिली तांबे यांचे राजकीय पदार्पण झाले असल्याने त्यांच्या सोबतीला मार्गदर्शक म्हणून उपनगराध्यक्षपदी एखाद्या ज्येष्ठ नगरसेवकाची निवड होईल असे अपेक्षित असताना आमदार तांबे यांनी धक्कातंत्राचा वापर करुन नूरमोहंमद शेख यांच्यावर विश्‍वास दाखवला. त्याचे प्रतिबिंब विषय समित्यांच्या सभापती व सदस्य निवडीतही उमटतील असे चित्र निर्माण झाल्याने या निवडी आता शहरात उत्कंठेचा विषय बनल्या आहेत.


नगरपालिकांच्या कारभारात ‘स्थायी समिती’ ला अनन्य महत्व आहे. या समितीच्या सदस्यपदासह पाणीपुरवठा, बांधकाम, शिक्षण, आरोग्य व नियोजन यासारख्या महत्त्वपूर्ण समित्यांच्या सभापतीपदासाठी इच्छुकांची मोठी रांग आहे. संगमनेरच्या राजकारणात ‘नव्याला संधी आणि जुन्याला सन्मान’ हे सूत्र नेहमीच पाळले जाते. यंदा मात्र, आमदार तांबे यांचा कल केवळ राजकीय सोयीपेक्षा ‘डिलिव्हरी’ देणार्‍या नेतृत्वाकडे अधिक असल्याचे दिसते. आपल्या मनातील संकल्पना, मग ती ‘क्लीन सिटी’ असो वा ‘स्मार्ट पायाभूत सुविधा’, या पूर्ण करु शकणार्‍या चेहर्‍यांचा त्यांच्याकडून शोध घेतला जात आहे.


‘संगमनेर 2.0’ हे ध्येय घेऊन वाटचाल करणार्‍या नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्यासमोर या निवडीत मोठा पेच असणार आहे. एका बाजूला प्रभागनिहाय विकासकामांचे संतुलन राखणे आणि दुसर्‍या बाजूला अनुभवी नगरसेवकांच्या अनुभवाचा फायदा करुन घेणं, असे दुहेरी आव्हान त्यांच्यासमोर आहे. डॉ.मैथिली तांबे या स्वतः उच्चशिक्षित आणि व्हिजनरी असल्याने, त्यांच्या कार्यकाळात समित्यांच्या माध्यमातून शहराचा कायापालट व्हावा, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे.


संगमनेर विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती पाहता, नगरपालिकेच्या माध्यमातून मिळणारी ही पाच वर्षे आमदार सत्यजीत तांबे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. पालिकेच्या कामातून थेट जनतेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात मोठा मार्ग आहे. त्यामुळेच, प्रत्येक विषय समिती ही केवळ एक पद नसून, ती विकासाची एक ‘लॅबोरेटरी’ व्हावी, असा तांबे यांचा मानस दिसतो. स्वीकृत सदस्यांच्या निवडीतून त्यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या सेवा समितीच्या नगरसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी ‘जबाबदारी’ कोणाच्या पदरात पडते, याची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘राजकीय इंजिनिअरिंग’मधून सोमवारी (ता.19) कोणाची नावे समोर येतात, यावर संगमनेरच्या पुढील पाच वर्षांच्या विकासाची दिशा ठरणार आहे.


नगरसेवकांच्या संख्येनुसार नामनिर्देशित (स्वीकृत) होणार्‍या सदस्यपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहता आमदार सत्यजीत तांबे यांनी दरवर्षी तिघांना संधी देणारी ‘रोटेशन’ पद्धती सुरु केली. मात्र त्यातही त्यांनी धक्कातंत्राचा वापर करीत राजकीय पदार्पणाचा कोणताही लवलेश नसताना मालपाणी परिवारातील सदस्याला ‘स्वीकृत’ सदस्यत्व स्वीकारण्यास राजी केले. त्यांचा हा निर्णय कसलेल्या राजकीय विश्‍लेषकांनाही तोंडात बोटं घालायला लावणारा होता. अर्थात स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून पालिकेच्या सभागृहात पोहोचलेल्या रचना मालपाणी यांच्या सामाजिक कामाचा आवाका खूप मोठा आहे. त्यांची निवड करण्यामागे आमदार तांबेचा हेतूही विकासाला गती देण्याचाच आहे, त्यामुळे विषय समित्यांच्या निवडीत त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाते यावरुन शहरात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

Visits: 126 Today: 2 Total: 1566802

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *