आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाला ‘लोकमान्यता’! भाजपचे सभागृहातील अस्तित्व संपुष्टात; राष्ट्रवादीचा उतावळेपणा पुन्हा अधोरेखीत..

श्याम तिवारी, संगमनेर
हताश असलेल्या समर्थकांचे नेतृत्व स्वीकारुन केवळ जिंकण्याच्या आत्मविश्वासाने केलेल्या सूक्ष्म नियोजनाच्या बळावर आमदार सत्यजीत तांबे यांनी संगमनेर नगरपालिकेत विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवताना ऐतिहासिक विजय प्राप्त केला. प्रतिकूल राजकीय परिस्थिती असतानाही त्यांनी सकारात्मक राजकारणाचा पुरस्कार करताना विकासाचे व्हिजन समोर ठेवून ‘संगमनेर 2.0’ ही संकल्पना संगमनेरकरांसमोर मांडली. पुढील शंभर दिवसांचे नियोजन सांगताना त्यांच्या नजरेत पाच वर्षांचा ठाव दिसल्याने मतदारांनीही त्यांच्या आवाहनाला साथ दिली. गेल्या अडीच दशकांच्या त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालांचा थेट परिणाम त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर होणार हे निश्चित असताना संगमनेरकरांनी त्यांच्या विकासाच्या दृष्टीला साथ देत त्यांच्या नेतृत्वाला एकप्रकारे ‘लोकमान्यता’च दिली आहे. अनेक अंगानी दीर्घकाळ चर्चेत राहणार्या या निवडणुकीत सुरुवातीला महायुतीसाठी पोषक वातावरण असतानाही आमदार तांबे यांनी अक्षरशः वातावरणालाच कलाटणी देत विजय खेचून आणताना राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपचे संगमनेर नगरपालिकेच्या सभागृहातील अस्तित्व पूर्णतः संपुष्टात आणले. या निवडणुकीत उतावळेपणा दाखवणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा त्यांच्या राजकीय ताकदीचा अनुमान आला. या पक्षाने उभ्या केलेल्या एकूण नऊ उमेदवारांना मिळून दोन हजार मतंही मिळवता आली नाहीत, त्यांच्या बहुतेक उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.

हिंदूत्वाच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेरात परिवर्तन घडले. वर्षभरापूर्वी झालेल्या त्या निवडणुकांमधून संगमनेरातील राजकीय संघर्षही टोकाला गेला. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, मागील कारकीर्दीची उणीदुणी, प्रत्येक कामात दोन्ही बाजूने होणारा श्रेयवाद, राजकीय संघर्षाच्या घटनांमधून वारंवार शहराच्या शांतता व व्यवस्थेचा प्रश्न, गेल्याकाही दिवसांत अमलीपदार्थांवरील कारवाया आणि त्यातून झालेले आरोप अशा साखळी घटनांमधून संगमनेरचे सामाजिक वातावरण विस्कळीत असलेल्या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकांची घोषणा झाली. वर्षभरापूर्वी झालेला सत्ताबदल आणि अद्यापही टीकून असलेली हिंदूत्वाची लाट गृहीत धरुन महायुतीने अगदी नियोजनबद्ध पद्धतीने उमेदवार निवड प्रक्रिया राबवली. मात्र प्रत्यक्ष उमेदवारांची नावे जाहीर झाल्यापासूनच महायुतीतला विसंवाद उघड होवू लागला.

नेहमीप्रमाणे राष्ट्रवादीने आपला गाडा वेगळा हाकण्याचा निर्णय घेत शहरात राजकीय ताकद नसतानाही तब्बल नऊ जागांवर आपले उमेदवार उभे केले. प्रत्यक्ष प्रचारादरम्यान महायुतीकडून विकासाबाबत चर्चा होण्याऐवजी मागील राजकीय कारकीर्दीवर चिकलफेक करण्यातच सभा गाजवल्या गेल्याने मतदारांवर त्याचा नकारात्मक परिणाम होत गेला. या दरम्यान एका वाहनाच्या दालनासह टोलनाक्यावरील कर्मचार्याशी आमदार अमोल खताळ यांच्या संभाषणाची कथीत ऑडियो क्लिपही व्हायरल झाल्याने हा प्रकारही मतदारांवर प्रभाव टाकणारा ठरला. सोशल माध्यमात महायुतीच्या काही समर्थकांकडून थेट असंसदीय भाषेचा वापर करुन विरोधकांना प्रत्यूत्तर देण्याचा प्रकारही प्रत्यक्ष निकालात बदल करणारा ठरला.

दुसरीकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रतिकूल राजकीय परिस्थिती असतानाही सूक्ष्म नियोजन आणि संवादाच्या माध्यमातून त्यावर मात केली. संघटनात्मक पातळीपासून लोकप्रतिनिधीत्व प्राप्त करण्यापर्यंचा अनुभव, दिवंगत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे यांच्यासह राजकीय पटलावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध दिग्गजांकडून मिळवलेल्या शिकवणीचा पूर्ण वापर करुन त्यांनी आधी लढण्यासाठी आवश्यक असलेले मैदान तयार केले आणि त्यानंतर त्यावर लढण्यासाठी विरोधकांना आव्हान देत त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेलेली ही पहिलीच निवडणूक त्यांनी एकतर्फी विजयासह ऐतिहासिकही ठरवली.

वर्षभरातील राजकीय, सामाजिक घडामोडींचा अस्पष्ट उल्लेख करुन त्यांनी विकासावर फोकस करीत त्यात जनसहभाग मिसळून लोकांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्याचा परिणाम ‘संगमनेर 2.0’ ही संकल्पना राबवताना त्यांनी मागवलेल्या अभिप्रायात नऊ हजारांवर नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यातून तयार झालेला जाहीरनामा जनतेच्या मनातील असल्याचे व पुढील पाच वर्षात तो कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा विश्वास मतदारांच्या मनात ठासण्यातही त्यांना यश आले. स्वच्छ प्रतिमा आणि उच्च शिक्षित असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ.मैथिली तांबे यांचा सहज स्वभावही महिलांच्या मनात स्थान मिळवणारा ठरला. जिंकण्याचा आत्मविश्वास, त्यासाठी केलेले सूक्ष्म नियोजन, प्रचंड परिश्रम आणि त्याची पूर्तता यातून प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन ‘बाजीगर’ ठरलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या नेतृत्वाला ‘लोकमान्यता’ही मिळवली.

डॉ.तांबे यांना विक्रमी 68 टक्के मतं..
आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीच्या नावाने लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ.मैथिली तांबे यांनी तब्बल 67.63 टक्के (28 हजार 397) विक्रमी मतं मिळवताना महायुतीच्या सुवर्णा खताळ यांचा 16 हजार 408 इतक्या प्रचंड मतांनी पराभव केला. खताळ यांना 11 हजार 989 मतं (28.55 टक्के) मिळाली. नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवार सुषमा तवरेज, मेघा भगत, अलिशा शेख, तबस्सूम शेख, बानोबी शेख व आलिया सय्यद या सहाही उमेदवारांच्या अनामत रक्कम जप्त झाल्या आहेत. या निवडणुकीत एकूण झालेल्या 41 हजार 988 मतदानातील तब्बल 68 टक्के मतं मिळवण्यात आमदार सत्यजीत तांबे यांनी यश मिळवल्याने एकप्रकारे संगमनेरकरांनी त्यांच्या नेतृत्वाला ‘लोकमान्यता’च दिली आहे.

‘उबाठा’चा एक उमेदवार विजयी!
भाजप आणि राष्ट्रवादीचे सभागृहातील अस्तित्व शून्य करणार्या या निवडणुकीत संगमनेर सेवा समितीने आपला घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला तीन जागा दिल्या होत्या. मात्र प्रभाग क्रमांक 4 (अ) मधील प्राची अमोल कवडे या महिला उमेदवाराला वगळता उर्वरीत दोन्ही जागांवर या पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. प्रभाग क्रमांक 13 (अ) मध्ये उबाठाचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांच्या पत्नी कविता कतारी निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र शिवसेनेच्या साक्षी सूर्यवंशी यांनी त्यांचा 371 मतांनी पराभव केला. तर, प्रभाग क्रमांक 14 (ब) मध्ये उबाठाचे माजी शहरप्रमुख प्रसाद पवार तिरंगी सामना करीत होते. या प्रभागातील अनिश्चित लढतीत अपक्ष उमेदवार योगेश उर्फ चिकू जाजू यांनी त्यांचा 254 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत उबाठाच्या मतांची भागीदारी अवघी 8.31 टक्के इतकीच आहे.

