विजयाच्या उन्मादातून विरोधकाच्या कुटुंबावर जमावाचा सशस्त्र हल्ला! संगमनेरच्या प्रभाग दहा मधील घटना; नूतन नगरसेवकासह सतराजणांवर गंभीर गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होवून दोन दिवस उलटले आहेत, मात्र त्याचे पडसाद अद्यापही उमटत असल्याचे समोर आले असून विजयी झालेल्या नगरसेवकाच्या समर्थकांनी थेट विरोधकाच्या घरात घुसून त्याच्या कुटुंबाला सशस्त्र मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. सोमवारी (ता.22) रात्री साडेनऊच्या सुमारास प्रभाग क्रमांक दहामधील भारतनगर परिसरात घडलेल्या या तुफान धुमश्‍चक्रीत विजयाचा उन्माद करणार्‍या जमावाने पाचजणांना गंभीर जखमी केले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मुजीब शमशुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी 17 जणांवर बेकायदा जमाव जमवणे, बेकायदा घरात घुसणे, सशस्त्र दंगल घडवणे, जीवितास धोका होईल याची जाणीव असतानाही दुखापत करणे अशा भारतीय न्यायसंहितेतील विविध तरतुदींसह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे उल्लंघन केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दाखल प्रकरणात विजयी उमेदवार नूरमोहंमद शेख यांनी जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप केल्याने त्यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.22) रात्री साडेनऊच्या दरम्यान पुणे रस्त्यावरील कमल पेट्रोलपंपाच्या पाठीमागील बाजूस घडली. पालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये समावेश असलेल्या या परिसरात सोमवारी रात्री संगमनेर सेवा समितीचे उमेदवार नूरमोहंमद पीरमोहंमद शेख यांची विजयी मिरवणूक सुरु होती. सदरील मिरवणूक व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या मात्र नूरमोहंमद शेख यांचे राजकीय विरोधक असलेल्या मुजीब शमशुद्दीन शेख यांच्या घरासोर येताच वाहनात बसलेल्या नूतन नगरसेवक नूरमोहंमद शेख यांनी आपल्या समर्थकांना ‘इनको बाहर खिचों, और मारों..’ असे म्हणतं जाहीर चिथावणी दिल्याने सुमारे 15 ते 20 जणांचा जमाव संतप्त होवून मुजीब शेख यांच्या घरावर सशस्त्र चाल करुन गेला.


यावेळी विजयाच्या उन्मादात असलेल्या जमावाने लोखंडी रॉड, बेसबॉलची स्टिक व चॉपरसारख्या शस्त्रांचा वापर करीत घरातील अपनान शेख, जोया शेख, मेहरान शेख, इशज शेख, साज शेख यांच्यासह माजीद समशुद्दीन शेख अशा सहा जणांवर जीवघेणा हल्ला करीत त्यांना जखमी केले. या घटनेनंतर परिसरात मोठा गदारोळ झाल्यानंतर काही ज्येष्ठांनी मध्यस्थी करीत उन्मादी झालेली विजयी मिरवणूक पुढे काढून दिल्यानंतर जखमी झालेल्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी आज पहाटे दोनच्या सुमारास मुजीब शेख यांनी शहर पोलीस जावून तक्रार दाखल केली.


त्यावरुन पोलिसांनी सलीम हाजी शेख, नूरमोहंमद शेख, इम्रान गनी शेख, शैजाज सलिम शेख, दानीश सलिम शेख, सलमान सलिम शेख, वसिम अब्दुल रहमान शेख, उमेर अलीम हाजी, जमील अजीज पठाण, याह्याखान समशेरखान पठाण, अदनान शाहीन शेख, जीशान शाहीद शेख, सरजील मोहंमद शेख, अलिम हाजी शेख, नईम रहेमान शेख, तलहा कलिम शेख व रिझवान उस्मान शेख अशा एकूण 17 जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 118, 191 (1), (2), (3), 351 (2) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील 118 प्रमाणे दाखल कलमानुसार सात वर्षांच्या शिक्षेचे प्रावधान असल्याने या प्रकरणातील नूतन नगरसेवकासह दाखल प्रकरणातील आरोपी माजी नगरसेवकांना कारागृहात जावे लागू शकते.


एकीकडे भारतनगरमध्ये घडलेल्या घटनेची चर्चा सुरु असतानाच प्रभाग क्रमांक सहामधील इंदिरानगर गल्ली क्रमांक नऊ मधूनही असाच धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेत विरोधक असलेल्या राजू अभंग यांच्या किराणा मालाच्या दुकानासमोर विजयी उमेदवार वनिता संजय गाडे यांच्या समर्थकांनी खूपमोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण केली. त्यातून वादाचा धूरळा उडून सुरुवातीला दोन्ही बाजूच्या मुलांमध्ये आणि नंतर महिलांमध्येही चांगलीच जुंपली. या घटनेचे पडसाद विद्यमान नगरसेविकेचे पती संजय उर्फ पिंटू गाडे यांनी राजू गाडे यांना मारहाण करण्यात झाल्याने सदरचे प्रकरणही शहर पोलीस ठाण्यात पोहोचले असून वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


संगमनेर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडल्यानंतर त्याचे प्रतिबिंब पालिका निवडणुकीतही उमटतील अशी विरोधकांना आशा होती. मात्र ती पूर्णतः फोल ठरवताना संगमनेर सेवा समितीने महायुतीचा अक्षरशः धुव्वा उडवताना अपवाद वगळता सभागृहातून महायुतीला हद्दपार केले. या ऐतिहासिक यशाने विजयी उमेदवार आपापल्या प्रभागात मिरवणुका काढीत असून त्यातून विरोधकांच्या जखमांवर मीठ शिंपडले जात असल्याने दोनगटात परस्परांशी तुंबळ होत असल्याच्या घटना समोर येवू लागल्या आहेत. शहरातील शांतता व व्यवस्थेचा विचार करता पोलिसांनी आता अशाप्रकारच्या विजयी मिरवणुकांना परवानगी नाकारण्याची गरज आहे.

Visits: 93 Today: 2 Total: 1412406

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *