बनावट धनादेश देऊन व्यापार्यांची फसवणूक तीन लाखांच्या मुद्देमालासह टोळी केली गजाआड
नायक वृत्तसेवा, अकोले
शहरातील व्यापार्यांकडून इलेक्ट्रिक सामान व स्टील खरेदी करून त्या बदल्यात बनावट धनादेश देऊन व्यापार्यांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. अकोले पोलिसांनी या टोळीला जेरबंद करून तीन लाखांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
अकोले शहरातील व्यापारी अक्षय संजय देशमुख (रा. उंचखडक) व नानासाहेब बबन मालुंजकर यांच्याकडून अशोक मगन मोहिते (रा.नाशिक) याने 3 लाख 7 हजार 895 रुपयांचे बिल्डींगसाठी लागणारे इलेक्ट्रिक सामान व स्टील खरेदी करुन त्यांना बँक ऑफ बडोदा व भारतीय स्टेट बँकेचे बनावट धनादेश देत साहित्य घेऊन सदर इसम नाशिकला पसार झाला. त्याने दिलेले धनादेश हे बँकेत वटविण्यासाठी बँकेत गेले असता ते बनावट असल्याचे बँकेने कळविले. त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक मगन मोहिते याच्याशी संपर्क केला असता तो उडवाउडवीचे उत्तरे देवू लागला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोले पोलिसांत तत्काळ गुरनं 515/2022 भा.दं.वि. कलम 420, 467, 468 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी अशोक मगन मोहिते याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. पंरतु त्याचे साथीदार राहुल विष्णू शिरसाठ, विक्रम विलास वरखेडे (दोन्ही रा. चाटोरी, ता. निफाड, जि. नाशिक) हे पुन्हा अशोक मगन मोहिते याच्या सांगण्यावरुन व्यापारी वर्गाची फसवणूक करण्यासाठी अकोले येथे आले असता त्यांना तत्काळ अटक करुन न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेवून सदर आरोपींच्या मदतीने गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आरोपी अशोक मगन मोहिते (रा. बेलदारवाडी, म्हसरुळ, जि. नाशिक) येथे जावून शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेत अटक केली. त्यास गुन्ह्यात फसवणूक केलेल्या सामान व स्टीलबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलीस कोठडीत घेऊन विचारपूस करता त्याने कबुली दिली. त्यानंतर 3 लाख 7 हजार 895 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. अजून एक साथीदार वामन कचरु पवार (रा. नाशिक) याचा शोध अकोले पोलीस घेत आहे. सदर कारवाई अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, उपनिरीक्षक भूषण हंडोरे, उपनिरीक्षक फराहनाज पटेल, पोहेकॉ. आहेर, पोना. बाबासाहेब बडे, पोकॉ. अविनाश गोडगे, सुयोग भारती, कुलदीप पर्बत, विजय आगलावे, आत्माराम पवार आदिंनी केली आहे.