अंगणवाडी सेविकांसह आशा सेविकांची पगार वाढ करणार ः ठाकूर संगमनेरात कोरोना संकटात काम करणार्‍या महिलांचा कौतुक सोहळा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अविश्रांत काम करत असून इतरांना नेहमी प्रोत्साहन देतात. राज्यातील सर्व महिला भगिनींच्या पाठिशी ज्योतिबाप्रमाणे उभे असून अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्या पेन्शन योजना, एलआयसी योजनांसह पगार वाढ करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. तर संगमनेरातील एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचे होत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

संगमनेर शहरातील वसंत लॉन्स येथे एकविरा फाउंडेशनच्यावतीने कोरोनाच्या महासंकटात सेवाभावीपणे काम केलेल्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट महिला, मदतनीस या सर्व महिलांचा कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात नामदार यशोमती ठाकूर यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला तर अध्यक्षस्थानी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, शरयू देशमुख, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, जिल्हा परिषद समिती सभापती मीरा शेटे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, लता डांगे, राज्य काँग्रेसच्या सरचिटणीस उत्कर्षा रुपवते, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, निर्मला गुंजाळ, इंद्रजीत थोरात आदी उपस्थित होते. यावेळी सर्व महिलांना सन्मानपत्र, जेवणाचे डबे, आरोग्य कार्ड, एकविराची आरोग्य पुस्तिका यांसह आरोग्य किट देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी पुढे बोलताना नामदार ठाकूर म्हणाल्या, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने काम करत आहेत. त्यांचे काम हे सदैव इतरांना प्रेरणा देणारे असून आम्हा सर्व काँग्रेसजणांचे ते मार्गदर्शक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जणांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. संगमनेरची जनताही भाग्यवान असून त्यांना नामदार थोरात यांच्यासारखे सर्वसमावेशक नेतृत्व मिळाले आहे. विकासातून संगमनेरचे नाव देशपातळीवर त्यांनी पोहोचविले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारने स्त्री-पुरुष समानतेसाठी सर्वसमावेशक असे नवीन महिला धोरण राबविले आहे. याचबरोबर अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस यांनी कोरोना संकटांमध्ये केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे.

तर नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले, राजीव गांधी यांनी देशामध्ये सर्वप्रथम महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य पातळीवर हे आरक्षण 50 टक्के केले गेले असून महिलांना संधी मिळाली तर ते अत्यंत यशस्वीपणे कार्यभार सांभाळतात. कोरोना या संकट काळामध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी अत्यंत मोलाचे काम केले असून गावातील प्रत्येक घरादारातील सुख-दुःखात या महिला भगिनी सहभागी होत असतात. गावांचे आरोग्य जपणे यामध्ये या महिलांचे मोठे काम असून त्यांच्या पगारवाढीच्या मागणीबाबत आपण सकारात्मक असून सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, श्रीमती कुकडे, एकविराच्या सदस्या डॉ. वृषाली साबळे, सुरभी मोरे, शिल्पा गुंजाळ, प्राजक्ता घुले, अहिल्या ओहोळ, ऐश्वर्या वाकचौरे, ज्योती थोरात, पूजा थोरात, मिताली भडांगे, आदिती झंवर, जान्हवी कळसकर, मयुरी थोरात, अर्चना नवले यांसह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविक एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले. सूत्रसंचालन आदिती खोजे व वैष्णवी कापसे यांनी केले तर प्राजक्ता घुले यांनी आभार मानले.

Visits: 16 Today: 1 Total: 117902

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *