श्रीरामपूरमध्ये नायझेरिया आलेल्या मायलेकांचे अहवाल पॉझिटिव्ह ओमायक्रॉन तपासणीसाठी नमुने अहमदनगर व पुण्यास पाठविले
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
नायझेरिया येथून श्रीरामपूरमध्ये आलेल्या मायलेकांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर येथीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचेही नमुने ओमायक्रॉन तपासणीसाठी अहमदनगर व पुणे येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.
नायझेरियाहून आलेली 40 वर्षीय आई व तिचा सहा वर्षांचा मुलगा हे दोघे श्रीरामपूर येथे शहरातील शिवाजी मार्ग परिसरात आले. याबाबतची माहिती वैद्यकीय विभागास मिळताच त्यांनी या दोघांची कोरोना चाचणी केली असता या दोघांचेही अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यानुसार या दोघांनाही उपचारासाठी श्रीरामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याकाळात या दोन रुग्णांचा ज्या-ज्या नातेवाईक अथवा व्यक्तींशी संपर्क आला त्या सर्वांचीही कोरोना तपासणी करण्यात आली असता या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना घरातच थांबून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मायलेकांची ओमायक्रॉन तपासणीसाठी नमुने अहमदनगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. हे अहवाल लवकरच मिळणार असल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली. परदेशातून आत्तापर्यंत 35 जण श्रीरामपूरमध्ये आले आहेत. या सर्वांची तपासणी केली असता परदेशातून आलेल्या व्यक्ती व त्यांचे नातेवाईक निगेटिव्ह आढळून आले आहेत. यातील एकाचा चुकीचा मोबाईल क्रमांक व पत्ता असल्यामुळे त्याचा शोध लागत नाही. ही व्यक्ती दुबई येथून आली असून त्याचा लवकरात लवकर शोध घेण्यात येणार असल्याचेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.