राजुरला जनावरांचा बाजार सुरू करणार : सभापती तिकांडे

नायक वृत्तसेवा, अकोले
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा आणि व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी अकोले कृषी बाजार समिती सातत्याने प्रयत्न करत आहे. बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता यावा, यासाठी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील व्यापारी वर्गास प्रोत्साहन देऊन अकोले समशेरपूर, कोतुळ, केळी-रुम्हणवाडी या ठिकाणी शेतमालाचे बाजार सुरू केले आहेत. शेतकरी वर्गाची मागणी लक्षात घेऊन मागील आठवड्यात अकोले बाजार आवारात जनावरे खरेदी-विक्रीचा व्यवहार देखील सुरू केला असून, त्यास शेतकरी आणि व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. भविष्यात राजुर येथेही शेतमालाचा तसेच जनावरांचा बाजार सुरू करणार असल्याची माहिती अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे यांनी दिली.

सध्या दिवाळी तोंडावर आली असून, शेतकरी खरीप पिकांच्या काढणीत व्यस्त आहेत. दिवाळी आणि रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी सोयाबीन विक्री करून भांडवल उभारणी करत आहेत. मात्र, सोयाबीनच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्तावांची मागणी केल्यानुसार, कृषी उत्पन्न बाजार समितीने १६ सप्टेंबर २०२५ रोजी प्रस्ताव सादर केला आहे. शासनाने परवानगी दिल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता बाजार समितीच्या संचालक मंडळाने करून ठेवली आहे. त्यामुळे परवानगी मिळताच हे केंद्र तात्काळ सुरू केले जाईल. बाजार समिती संचालक मंडळाच्या वतीने शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात आले आहे की,गरजेनुसारच सोयाबीनची विक्री करावी. खासगी व्यापारी वर्गास सोयाबीन किंवा कोणताही शेतमाल विक्री करताना, व्यापाऱ्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचा अधिकृत परवाना आहे की नाही, याची खात्री करावी.

संबंधित व्यापाऱ्यांकडून विक्री केलेल्या शेतमालाचे अधिकृत बिल घ्यावे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. विक्री केलेल्या मालाची रक्कम चोवीस तासांत न मिळाल्यास, बाजार समिती कार्यालयात लेखी तक्रार करावी. आपली रक्कम संबंधित व्यापाऱ्यांकडून मिळवून देण्यासाठी बाजार समिती मदत करेल असेही सभापती भानुदास तिकांडे यांनी सांगितले.

Visits: 259 Today: 4 Total: 1104189
