थोरात सहकारी साखर कारखान्याचा साखर वाटप कार्यक्रम जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्यासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी, सभासद, उत्पादक व कामगार यांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. दीपावली निमित्त यावर्षी सभासदांना ३० किलो मोफत साखर देण्यात येणार असून बुधवार दि.१५ ऑक्टोबर ते शनिवार दि. १८ ऑक्टोबर या काळात कारखाना कार्यस्थळावर साखर वाटप केली जाणार असल्याची माहिती व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी दिली.

घुले पुढे म्हणाले, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी १५ किलो साखर सभासदांना मोफत देण्यात येत होती. यावर्षी ३० सप्टेंबर २०२५ अखेर ज्यांचे शेअर्स मंजूर असतील अशा सभासदांना प्रत्येकी ३० किलो साखर मोफत देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. यानुसार साखर गोडाऊन क्रमांक १३ मधून बुधवार दि. १५ ऑक्टोबर ते शनिवार दि.१८ ऑक्टोबर या काळात सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सभासदांना ३० किलो मोफत साखर दिली जाणार आहे.यासाठी सभासदांनी दिलेले ओळखपत्र सोबत आणावे. त्याची झेरॉक्स चालणार नाही कारण हे ओळखपत्र स्कॅन करावे लागणार आहे. त्यांना ओळखपत्राच्या नोंदीवर गोडाऊन क्रमांक १३ मधून साखर देण्यात येईल. तर मयत सभासदांच्या साखरेसाठी छापील अर्ज त्या त्या गावांच्या सेवा सोसायट्यांमध्ये उपलब्ध असून मृत्यूचा दाखला, वारसाचे आधार कार्ड जोडून शेअर्स विभागात अर्ज करावा. जे सभासद बाहेरगावी आहेत आणि त्यांचे ओळखपत्र तयार झालेले नाही. अशा सभासदांनी साखर घेण्यासाठी येताना एक फोटो व आधार कार्ड घेऊन यावे. स्वतः न येऊ शकणाऱ्या सभासदांनी सभासदाचा फोटो, आधार कार्ड, सोसायटी किंवा ग्रामपंचायत यांचे सही व शिक्का असलेले अधिकार पत्र देऊन दिलेल्या वेळेत साखर घ्यावयाचे आहे. साखर वाटप कार्यक्रमानंतर असे अधिकार पत्र स्वीकारले जाणार नाही. तसेच स्वतःचे शासकीय ओळखपत्र बरोबर आणणे आवश्यक आहे.

सर्व सभासद बंधू – भगिनींनी साखर वाटप कार्यक्रमाप्रमाणेच साखर घेऊन जावी व साखर वाटपाबाबत सहकार्य करावे असे आवाहन व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

Visits: 74 Today: 6 Total: 1108873
