रस्त्यावर नाही…तर आश्वासनांच्या वाटेवर प्रवास!

नायक वृत्तसेवा, आश्वी
संगमनेर तालुक्यातील मनोली–कोकणगाव–चिंचेचा मळा हा शिव रस्ता विकासाच्या प्रवाहापासून चार दशकांपासून दूर आहे. एकदाच झालेल्या मुरमीकरणानंतर हा रस्ता अक्षरशः खड्ड्यांच्या जाळ्यात हरवला आहे. शासनाच्या योजना, लोकप्रतिनिधींची आश्वासने आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे ग्रामस्थांचा संयम आता संपत चालला आहे. मनोली-कोकणगाव- चिंचेचा मळा या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, वाहनाने प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. पावसाळ्यात तर हा रस्ता चिखल आणि पाण्याच्या प्रवाहात अदृश्य होतो. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि वयोवृद्ध नागरिकांना याचा दररोजच त्रास सहन करावा लागतो.ग्रामस्थांनी नुकतेच तहसीलदारांना निवेदन देऊन शिवरस्त्याचे डांबरीकरण तातडीने करावे अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर दिलीप शिंदे, बाबासाहेब शिंदे, भिका साबळे, शंकर साबळे, महेश शिंदे आणि दिलीप जोंधळे यांच्या सह्या आहेत. ग्रामस्थांनी सांगितले की, पावसाळ्यात मुलांना शाळेत पाठवणे म्हणजे संघर्ष, तर आजारी वृद्धांना रुग्णालयात नेणे म्हणजे संकट. रस्ता धड नाही म्हणून लोकांना दैनंदिन जीवनात अडथळे येत आहेत. दरम्यान, याबाबत ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रस्त्याचे काम प्राधान्याने सुरू केले जाईल असे सांगितले आहे. रस्ता म्हणजे फक्त मातीचा किंवा डांबराचा तुकडा नाही, तो गावाच्या सन्मानाचे प्रतीक आहे.ग्रामविकास म्हणजे फक्त घोषणांचा खेळ नाही. सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासात सोय निर्माण करणारी कृतीच खरी सेवा आहे.मनोली–कोकणगाव–चिंचेचा मळा हा शिव रस्ता शासनाच्या अनास्थेचे जिवंत उदाहरण ठरला आहे. दुर्दैवाने प्रत्येक निवडणुकीत विकासाचे चित्र मोठे दाखवले जाते, पण अशा रस्त्यांची अवस्था वास्तवाचे आरसे दाखवते.प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करून ग्रामस्थांचा विश्वास परत मिळवावा.अन्यथा ‘विकास’ हा शब्द पुन्हा एकदा केवळ भाषणापुरताच राहील.

रस्ता हा गावच्या सन्मानाचा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.आमच्या ग्रामस्थांनी खूप संयम ठेवला आहे.आता शासनाने तात्काळ काम सुरू करून ग्रामस्थांचा विश्वास जिंकावा.या विषयावर आम्ही सातत्याने पाठपुरावा करू असे दिलीप जोंधळे यांनी सांगितले.

Visits: 47 Today: 1 Total: 1102117
