हनुमंतगाव येथे धान्य वाटपात अनियमितता? शिष्टमंडळाने पुरवठा अधिकार्यांची भेट घेऊन केली चर्चा
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील हनुमंतगाव येथील सोसायटीमार्फत चालविल्या जाणार्या धान्य दुकानाच्या असमाधानकारक कारभाराविषयी हनुमंतगाव नागरिकांच्यावतीने शिष्टमंडळ नुकतेच राहाता तालुका पुरवठा अधिकारी भारत खरात यांना भेटले. यावेळी रेशन वाटपात ऑनलाईन पद्धतीमुळे नागरिकांना सोसावा लागणारा मनःस्ताप, ऑनलाईन सेवा मंदगतीमुळे वेळ वाया जाणे, वारंवार खंडित होणारी सेवा, धान्य पुरवठ्यातील अनियमितपणा यामुळे नागरिकांची होणारी चिडचिड, सोसायटीच्या पदाधिकार्यांना होणारा त्रास आदी विषयांबाबत चर्चा केली.
सदर शिष्टमंडळातील प्रवरा बँकेचे संचालक अॅड. किसन कोतकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक घोलप, सोसायटीचे उपाध्यक्ष भागवत ब्राह्मणे, अशोक ब्राह्मणे, सावळेराम पाबळे, भानुदास डोखे, सोमनाथ अनाप, बापूसाहेब अनाप, अनिल बुचडे आदी कार्यकर्त्यांनी सोसायटीच्या रेशन विभागाच्या अनियमित कारभाराविषयी तालुका पुरवठा अधिकारी खरात यांच्याशी चर्चा केली.
यावेळी पुरवठा अधिकारी खरात यांनी ऑनलाईन पद्धतीचे फायदे-तोटे समजावून सांगितले. मंत्रालयातून चालणारी ही पद्धती जिल्हा किंवा तालुका पुरवठा अधिकार्यांच्या हातात नाही. त्यामुळे याबाबत सुधारणा करणेकामी असमर्थता दर्शविली. तसेच सोसायटीतून मिळणारे रेशन वाटपाबाबतही सोसायटीच्या पदाधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. रेशन विभागासाठी होणारा पतपुरवठा त्याचा सदुपयोग, रेशन देताना घेतली जाणारी काळजी, तयार होणारे बिल याबाबत संचालक मंडळाने दक्ष राहणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे रेशन विभागातील कर्मचार्यांना स्थानिक नागरिकांकडून त्रास होऊ नये याबाबतही काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.
रेशन पुरवठा पद्धतीबाबत संचालक मंडळांना माहिती असावी तसेच ऑनलाईन अडथळा याबाबतही संचालक मंडळाला ज्ञात असावे, अशी मागणी अॅड. कोतकर व अशोक घोलप यांनी केली. त्याबाबत असमर्थता दाखवत याबाबत आम्ही विचार करू, असे खरात यांनी सांगितले. परंतु वाटप पद्धतीमध्ये रेशन व्यतिरिक्त इतरांना सामावून घेणे सध्यातरी शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. यावर रेशन खरेदी-विक्रीची चौकशी संचालक मंडळाने करावी. तसेच त्यातील संख्येबाबत अधिकार्यांशी बोलावे. नाहक एकमेकांचे गैरसमज करण्यापेक्षा व्यवहाराची योग्य व्यक्तीमार्फत तपासणी करावी व यातूनही मार्ग न सापडल्यास पुरवठा अधिकार्यांशी मोकळेपणाने चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले.