साकुरमध्ये भाविकांची मांदियाळी! हजारो भाविकांनी घेतले बिरोबा देवाचे दर्शन

नायक वृत्तसेवा, साकुर
राज्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले संगमनेर तालुक्यातील साकुर येथील विरभद्र बिरोबा देवाचे नागपंचमी दिनी हजारो भाविकांनी नतमस्तक होत दर्शन घेतले. यावेळी साकुर मध्ये भाविकांची मांदियाळी बघायला मिळाली.
श्रावण मासात साकुर येथील बिरोबा महाराजांच्या दर्शनासाठी महिनाभर भाविकांची गर्दी होत असते. विशेषतः नागपंचमी आणि नारळी पौर्णिमेला येथे भाविकांच्या गर्दीचा अलोट सागर पाहायला मिळतो.

या यात्रेसाठी राज्यभरासह परराज्यातून भाविक भक्त येथे हजेरी लावत बिरोबा महाराजांचे दर्शन घेत असतात.
यंदाच्या वर्षी मंगळवार दि. २९ जुलै रोजी नागपंचमी असल्याने भाविकांनी येथे मोठी गर्दी केली होती. त्यानंतर आता दि. ९ ऑगस्टला नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनचा सण असल्याने हजारो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे येथील ट्रस्टने भाविकांचे विना अडथळा दर्शन व्हावे, यासाठी नियोजन केले आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी भाविक गंगेचे पाणी कावडीने पायी आणत बिरोबारायाला गंगास्नान घालतात. यात्राकाळात वाण, ओव्यांसह विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात तसेच महाप्रसादाचे वाटप केले जात असून अनेक स्वयंसेवक व तरूणांचे सहकार्य या कामी होत आहे. मंदिर परिसरात मिठाई, खेळणीसह विविध प्रकारच्या दुकानांनी गर्दी केली असून त्यांना ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.

यात्रा कमिटीच्या वतीने नियोजनात कुठलीही कमतरता कमी पडू नये यासाठी बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, नामदेव खेमनर, अमित खिलारी, खेमनर, होळकर, एस.के. खेमनर आदी प्रयत्नशील आहेत.यात्रा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बजरंग दल च्या स्थानिक युवकांनी व घारगाव पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

बिरोबा यात्रेनिमित्त निलम खताळ यांनी दर्शन घेत मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच काही भाविकांशी चर्चा करत विचारपूस केली. यावेळी रक्तदान शिबीरालाही त्यांनी भेट दिली. साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी त्यांनी बिरोबा चरणी प्रार्थना केली.यावेळी रौफ शेख, बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, प्रियंका जाधव, गुलाब भोसले, अमृता कोळपकर, सुभाष भुजबळ, सुभाष पेंडभाजे, मच्छिंद्र खेमनर उपस्थित होते.

Visits: 149 Today: 3 Total: 1102270
