स्वार्थी राजकारणासाठी तालुक्याची बदनामी : माजी मंत्री थोरात

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
 आद्य क्रांतिवीर  राजे उमाजी नाईक यांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध पहिला लढा उभारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात रामोशी समाजाने अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठतेने काम केले. प्रामाणिक, एकनिष्ठ आणि लढवय्या असा हा समाज आहे. संगमनेर तालुका सर्व क्षेत्रांमध्ये राज्याला दिशादर्शक आहे. मात्र काही लोक त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी तालुक्याला बदनाम करत असल्याची टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.  आद्य क्रांतिवीर  राजे उमाजी नाईक यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
यशोधन कार्यालय मैदानावर राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित २३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. सत्यजित तांबे,डॉ. जयश्री थोरात, बिग बॉस फेम सुरज चव्हाण, अजय फटांगरे, देवराम गुळवे, तानाजी शिरतार, मनोज चव्हाण, महेश गोफने, रोशन गोफने, रमेश गपले, सोमनाथ गोडसे, नवनाथ आरगडे, श्रीराम पवार, शांताराम डुबे, संजय जेडगुले, नंदू बोराडे, रमेश जेडगुले आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना  बाळासाहेब थोरात म्हणाले, ब्रिटिशांविरुद्ध पहिला लढा आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांनी उभारला. त्यानंतर १८५७ चे युद्ध झाले. त्यानंतर लोकमान्य टिळक युग व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर मिळालेली राज्यघटना ही  मोठी देन असून गोरगरिबांना मतदानाचा हक्क मिळाला आहे मात्र सध्या लोकशाही आणि राज्यघटना धोक्यामध्ये आहे. जाती धर्माच्या नावावर राजकारण केले जात असून धर्माधर्मामध्ये फूट पाडली जात आहे.  तालुका हा सततच्या विकास कामातून आपण राज्यात अग्रगण केला. सहकार,शिक्षण, आर्थिक संपन्नता, ग्रामीण विकास, व्यापार येथील चांगले वातावरण यामुळे संगमनेरचा देशात लौकिक वाढवला आहे. मात्र आता काहीजण तालुक्याला बदनाम करत आहेत. तालुक्याचा लौकिक घालवण्याचे काम ते करत आहे. खोट्या नाट्या केसेस टाकल्या जात आहेत. काही लोकांची दिशाभूल झाली ते वेगळ्या मार्गाने जात आहेत, त्यांना समजून सांगा. तालुक्याचा विकास व एकजूट आपल्याला जपायची असून सर्वांनी एकत्र रहा असे आवाहन त्यांनी केले.
आ. सत्यजित तांबे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका विकासातून पुढे नेला. सर्व समाजाला ते जपले. सर्वांना समान संधी दिली, कधीही भेदभाव केला नाही. मात्र काही लोक आता ब्रिटिशांची फोडा तोडा नीती वापरून समाजामध्ये भेद निर्माण करत आहेत. ब्रिटिश प्रवृत्तीचे व कुट नीतीचे हे लोक खोटे  सांगत आहे. त्यांना यापूर्वी कधी जयंती माहित होती का? आपल्यासाठी कोण काम करते आहे ते लक्षात घ्या असे ते म्हणाले.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जपायचा आहे. संगमनेर तालुक्यामध्ये कधीही भेदभावाचे राजकारण झाले नाही परंतु आता नव्याने संगमनेर मध्ये अस्तिर  वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहे. अशा प्रवृत्ती वेळीच रोखा असे आवाहन त्यांनी केले.यावेळी देवराम गुळवे, संजय जेडगुले, मनोज चव्हाण, महेश गोफणे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी संगमनेर मधील कुस्तीप्रेमी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Visits: 142 Today: 1 Total: 1591484

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *