आरोप-प्रत्यारोपातून संगमनेर शिवसेनेतील अंतर्गत कलह वाढला! शहरात शिंदे गटाचा लवलेशही नसल्याचे सांगणारेच आता गद्दार हटाओचा देताहेत नारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात सत्तानाट्य घडून दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरीही त्यातून निर्माण झालेले राजकीय कंप मात्र अद्यापही जाणवत आहेत. दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीने शिवसेनेत उभी फूट पडून एकीकडे राज्यातील विविध जिल्ह्यातून ठाकरे आणि शिंदे समर्थक ठळकपणे समोर येवून आपापले गड मजबूत करीत असताना दुसरीकडे संगमनेरातील फूटीच्या चर्चा मात्र हवेतच विरताना दिसत आहेत. त्यामुळे जुने-जाणते पक्षातून बाहेर पडल्यास आपणच ‘राजे’ असा मनोमन समज करणार्‍यांचे मात्र मनसुबे उधळू लागले आहेत. त्याचा परिपाक एकमेकांवर कुरघोड्या व आरोप-प्रत्यारोप करुन डिवचण्याचे प्रकार सुरु झाले असून त्यातून एकमेकांवर चिखलफेक सुरु झाली आहे. त्यासाठी शिवसेनेच्या ठेवणीतील ‘गद्दार’ या शब्दाचा पुरेपूर वापर केला जात असून सोशल माध्यमातही त्याचे प्रतिबिंब दिसत आहेत.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे उपनेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील चाळीस आणि अपक्ष अकरा अशा एकूण 51 आमदारांना सोबत घेत स्वपक्षाविरोधातच शड्डू ठोकले होते. 20 जूनरोजी राज्यातील राजकारणात भूकंप घडवणार्‍या या घटनेनंतर सत्तांतर घडून 30 जून रोजी शिवसेनेचा शिंदे गट आणि विरोधी पक्षाच्या आसनावरील भाजपाने हातमिळवणी करीत राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार स्थापन केले. शिवसेनेतील या उभ्या फूटीचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल अशा चर्चा सुरु असतानाच विविध जिल्ह्यातून ठाकरे आणि शिंदे समर्थक ठळकपणे समोर येवू लागले. फूटीचे हे लोण अगदी अहमदनगर शहरातही दाखल झाले. नगरच्या शिंदे समर्थकांनी दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचे कार्यालय म्हणजे आपल्या गटाचे जिल्हा मुख्यालय ठरवले.

अनिलभैय्या राठोड यांचा जिल्ह्यातील शिवसैनिकांवर मोठा प्रभाव होता. त्यामुळे राठोड यांच्या कार्यालयाचा शिंदे गट फुगवण्यास मोठा उपयोग होईल असेही गृहीत धरण्यात आले. संगमनेर शहर व तालुक्यातही राठोड यांना मानणारा शिवसैनिकांचा मोठा गट आहे. आता राठोड यांचे सुपुत्रही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर हा वर्ग आपोआप शिंदे गटाकडे खेचला जाईल असाच बहुतेकांचा कयास होता. संगमनेरातही तशा चर्चा आणि त्यासोबतच चक्क संभाव्य फुटीरांच्या नावाच्या वावड्याही उठल्या. अर्थात त्यानंतरही अहमदनगर शहर वगळता उर्वरीत जिल्ह्यात शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी अथवा शिवसैनिकांचा शिंदे गटाकडे ओघ असल्याचे कोठेही दिसून आले नाही.

शिवसेनेचे शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. मात्र त्यांची समस्याही वेगळी आहे आणि तसेही ते काही हाडाचे, निष्ठावान वगैरे शिवसैनिक अजिबातच नव्हते, त्यामुळे राजकीय भवितव्याच्या भीतीपोटी घडलेले त्यांचे स्थलांतर मूळ शिवसेनेचा पाया हलवणारे ठरले नाही. म्हणजेच अनिलभैय्या राठोड आणि खासदार अशा दोन घडामोडी घडूनही अहमदनगर वगळता उर्वरीत जिल्ह्यात फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या दोन घटनातून शिवसेनेतील जुने-जाणते ‘भाईंच्या’ गटात जातील आणि आपल्यासाठी मोकळे मैदान निर्माण होईल असा काहींनी कयास लावला होता.

राज्यातील शिवसेना फूटीचे कंप थांबावेत यासाठी खुद्द मातोश्रीवरील धावपळ वाढलेली असताना दुसरीकडे संगमनेरात मात्र दीड-दोन दशकांपूर्वी शिवसेनेची कास धरलेल्या आणि प्रचंड राजकीय महत्त्वकांक्षा असलेल्या काहींनी फूट घडावी यासाठी देवही पाण्यात बुडवून ठेवले, मात्र तरीही मनासारखे घडत नसल्याने आपले मनसुबे उधळत असल्याचे पाहून आता चक्क संगमनेरात शिवसेना रुजवणार्‍या, गल्लोगल्ली शिवसैनिक निर्माण करणार्‍या, स्थानिक शिवसेनेला राजकीय सुवर्णकाळ दाखवणार्‍या आणि त्यांच्या काळातील नेता मुख्यमंत्रीपदी बसूनही पक्षाची कास न सोडणार्‍यांविषयी वावड्या उठवण्यास सुरुवात झाली. संगमनेरात शिंदे समर्थक म्हणून अजूनही कोणीही समोर आलेले नसतांनाही जाणीवपूर्वक काहींची नावे पेरली जावू लागली आहेत. त्यातून शिवसैनिकांमध्येच संभ्रम निर्माण होत आहे.

शहर शिवसेनेत पूर्वीपासूनच गटातटाचे राजकारण आहे. शिवसेना असो, भाजप असो अथवा राष्ट्रवादी या पक्षातील अनेक स्थानिक नेत्यांची लोणीशी सलगी आहे, हे कधीही लपून राहीलेले नाही. त्यातच सत्तांतरानंतर लोणीला दमदार खाते मिळाल्याने या तीनही पक्षातील त्यांच्या समर्थकांच्या वार्‍या वाढल्या आहेत. अर्थात हे प्रकार नवीन अजिबातच नाहीत, यापूर्वीही हे घडतच होते आणि पुढेही घडणारच आहे. मात्र तरीही आता अशा लोकांना शिवसेनेच्या ठेवणीतील ‘गद्दार’ अशा शब्दांची विशेषणे लावून अशी माणसं जाणीवपूर्वक चिन्हीत केली जात आहेत. यातून तुम्ही स्वतःहून जात नसाल तर आम्हीच तुमची बदनामी करुन तुम्हाला तिकडे पाठवण्याची व्यवस्था करतो असाच काहीसा संदेश मिळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


राज्यातील राजकीय नाट्यानंतर स्थापन झालेल्या शिवसेना (शिंदे गट) व भाजपच्या सरकारनंतर नगरमध्येही शिवसेनेत फूट पडली. तोच धागा पकडून संगमनेरातही असे काही घडते का याची माध्यमांकडून चाचपणी सुरु असताना शिवसेनेतील काही पदाधिकार्‍यांनी संगमनेरात शिंदे गट नसल्याचे अगदी ठामपणे सांगितले होते. मात्र आता तीच माणसं जुन्या व जाणत्या शिवसैनिकांना गद्दार, शिंदे समर्थक अशी परस्पर विशेषणं लावून सोशल माध्यमात त्यांच्या नावाचा भंडारा उधळू लागली आहेत. यातून त्यांची राजकीय अस्वस्थता स्पष्टपणे दिसत असून शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Visits: 217 Today: 2 Total: 1116244

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *