वंचित आघाडीच्या उमेदवारावर अखेर आचारसंहिता भंगाचा गुन्हा! प्रचारासाठी अल्पवयीन मुलाचा वापर; चौकशी अहवालावरही ठेवला ठपका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात चर्चेत आलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पाय खोलात गेला आहे. त्यांच्या प्रचारासाठी अल्पवयीन मुलाचा वापर होत असल्याची तक्रार उबाठा गटाच्या एका पदाधिकार्याने केली होती. हा प्रकार निवडणूक आयोग व मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करण्यासह बालकामगार कायद्याची पायमल्ली करणारा ठरला होता. त्याची गंभीर दखल घेत संगमनेरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी भरारी पथकाला चौकशीचे आदेशही दिले होते. मात्र त्यांच्याकडून नकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी असमाधानकारकतेचा ठपका ठेवून संबंधित उमेदवारावर तक्रारीच्या अनुषंगाने तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्यावर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनासह उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आणि बालकामगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल होणार आहे.
याबाबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे शहर सचिव समीर ओझा यांनी गेल्या रविवारी (ता.5) संगमनेरच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे छायाचित्रांसह लेखी तक्रार दाखल केली होती. त्यात वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा प्रेमानंद रुपवते यांचा सायकल रिक्षाद्वारा प्रचार करण्यासाठी अल्पवयीन मुलाचा वापर होत असल्याचे स्पष्टपणे नमूद करुन अल्पवयीन मुलासह ‘त्या’ सायकल रिक्षाची छायाचित्रेही जोडण्यात आली होती. त्या शिवाय आचारसंहितेच्या कालावधीत प्रचारासाठी वापरल्या जाणार्या कोणत्याही वाहनासाठी पूर्व परवानगी घेण्याचे बंधन आहे, शिवाय मिळालेली परवानगी संबंधित वाहनाच्या दर्शनीभागात लावण्याचेही बंधन आहे. मात्र सदरील सायकल रिक्षावर अशी कोणतीही परवानगी दिसून येत नसल्याचे ओझा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हंटले होते.
तक्रार प्राप्त होताच संगमनेरचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी त्याच दिवशी निवडणूक भरारी पथकाचे कार्यकारी अधिकारी ए.एस.शेख यांना चौकशीचे आदेश देतानाच संबंधित उमेदवारालाही नोटीस बजावून आपले लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानंतर भरारी पथकाच्या कार्यकारी अधिकार्यांनी शहराच्या विविध भागात संबंधित सायकल रिक्षाचा शोध घेतला असता ती आढळून आली नसल्याचा अहवाल त्यांना सादर केला. तर, वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी मात्र ‘त्या’ नोटीसला केराची टोपली दाखवत कोणतेही उत्तर देण्याची तसदी घेतली नाही.
परिणाम उमेदवाराने ठरवून दिलेल्या वेळेत उत्तर सादर न केल्याने घडला प्रकार त्यांच्या संमतीनेच झाल्याचे स्पष्ट झाले. तर, तक्रारदाराने आवश्यक पुराव्यांसह तक्रार दाखल केलेली असताना भरारी पथकाच्या कार्यकारी अधिकार्यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघात तीनवेळा फिरुन पाहणी व सखोल चौकशी केल्यानंतरही तक्रारीत नमूद अल्पवयीन मुलगा व सायकल रिक्षा आढळून आली नसल्याचा अहवाल सादर केला होता. त्यावर कार्यकारी अधिकार्यांनी सादर केलेला अहवाल असमाधानकारक असल्याचा ठपका ठेवून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्यांनाच दाखल तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे व त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभेची आदर्श आचारसंहिता लागू होताना केंद्रीय निवडणूक आयोगाने अपंग मतदारांशी आदरयुक्त संवादाचे कठोर धोरण जाहीर करण्यासोबतच निवडणूक प्रचारात अल्पवयीन मुलांद्वारे प्रचाराची पत्रके वाटणे, घोषणाबाजी करणे, प्रचारासाठी रॅली अथवा सभांमध्ये त्यांचा वापर करणे, उमेदवाराचे नाव अथवा चिन्हांचे त्यांच्याकडून प्रदर्शन घडवणे आदींबाबत शून्य सहनशीलतेचे तत्त्वही जारी केले होते. त्याचे उल्लंघन करणार्या उमेदवाराविरोधात आदर्श आचारसंहितेच्या भंगासह 1986 चा बालकामगार कायदा (प्रतिबंध व नियमन) आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या 4 ऑगस्ट 2014 रोजीच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईचे स्पष्ट संकेतही दिले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा पाय खोलात गेला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणुकीतील प्रचाराची पातळी खालावल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली असून प्रचारात उच्चारल्या जाणार्या शब्दांसह निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचार्यांसाठीही कठोर नियमावली तयार केली आहे. त्या अनुषंगाने वयोवृद्ध व अपंग मतदारांना सन्मानजनक वागणूक देण्यासह प्रचारकार्यात अल्पवयीन मुलांचा वापर केल्यास त्यासाठी ‘शून्य सहनशीलते’चे तत्त्वही जारी केले गेले आहे. त्याचे उल्लंघन करणार्या उमेदवारासह संबंधित अधिकार्यांनाही जबाबदार धरण्याचे धोरण असल्याने या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.