‘आविष्कार’ स्पर्धा विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा उत्सव : चांडक

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात संशोधन हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ‘अविष्कार’ स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि बुद्धिमत्तेचा उत्सव आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्ष साकार करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, ज्यातून उद्याचे वैज्ञानिक आणि संशोधक घडतील असा विश्वास शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चांडक यांनी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी विभागामार्फत आयोजित विभागीय स्तरावरील ‘आविष्कार २०२५’ संशोधन प्रकल्प स्पर्धा संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य, ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) येथे उत्साहात पार पडली. संपूर्ण परिसर संशोधन, नाविन्य आणि तरुणाईच्या ऊर्जा व कल्पकतेने भरला होता. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, उपप्राचार्य डॉ. प्रविण त्र्यंबके,शैक्षणिक संशोधन समन्वयक डॉ. संजयकुमार दळवी, सहसमन्वयक डॉ.सीमा बोरगावे तसेच विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती रुजविणे, नवकल्पनांना चालना देणे आणि शैक्षणिक प्रतिभेला अभिव्यक्तीचे व्यासपीठ देणे हे ‘आविष्कार’चे ध्येय आहे. संशोधनाशिवाय प्रगती शक्य नाही. समाजोपयोगी संशोधन ही काळाची गरज असून प्रत्येक प्रयोग, प्रत्येक विचार भविष्यातील बदलाचे बीज ठरू शकतो. यावेळी डॉ. सचिन घोलप, डॉ. दत्तात्रय अस्वले, डॉ. सतीश जोंधळे, डॉ. रेखा लबडे, डॉ. राजाराम वाकचौरे, डॉ. सचिन गुंजाळ, डॉ. सादिक अली सय्यद, डॉ. कल्पेश राका, डॉ. मिलिंद देशपांडे, प्रा. मोहम्मद रिझवान खान, डॉ. अविनाश जोंधळे, डॉ. राहुल पंडित, डॉ. संगीता कानवडे आणि डॉ. महेश गुंजाळ उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. संजयकुमार दळवी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी तर आभार डॉ. सीमा बोरगावे यांनी मानले.

Visits: 63 Today: 1 Total: 1105287
