गणेशोत्सव काळात डी जे.वर बंदी घाला! ज्येष्ठ नागरिकांचे  प्रांताधिकाऱ्यांना निवेदन 

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
गणेशोत्सव काळात कर्ण कर्कश, कानठळ्या बसवणाऱ्या डीजेवर बंदी घाला अशी मागणी शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रांताधिकारी अरुण उंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनात ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे की,गणेशोत्सव आणि कोणत्याही सणाला कर्ण कर्कश आवाज करणारे डी.जे. वाजवू नयेत. यामुळे आमचे आरोग्य धोक्यात आले आहे. डी जे मुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. डी जे च्या कानठळ्या बसणाऱ्या आवाजाने शहरातील ग्रामस्थांच्या  घरातील भांडी व इतर वस्तु रॅकमधून खाली पडतात. तसेच घरामध्ये कायम कंप सुटतो. तसेच  घरांमधील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना खूप त्रास होतो. त्यात काही आजारी पेशंट असल्यामुळे त्या काळात घर सोडून बाहेर जावे लागते. असे सांगून या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, याबाबत वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले. पण कुठलीही कारवाई अद्याप केली नाही.
कोणताही सण, उत्सव, वाढदिवस, मिरवणूक असो कर्कश आवाजात डि.जे. वाजवला जातो. कोर्टाचा आदेश असताना देखील त्या आदेशाची पायमल्ली संबंधित अधिकारी व वाजवणाऱ्यांकडून होत आहे.  दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी डी.जे. बाबत कठोर भूमिका घेतली होती. कुठेही डी.जे. वाजल्यास ते ताबडतोब जप्त करा व संबंधितांवर कडक कारवाई करा, तरी देखील स्थानिक प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
कोर्टाचे आदेश व अधिकाऱ्यांचे आदेश डावलणाऱ्या  पोलीस निरीक्षकावर व त्या संबंधित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर कोर्टाचा व अधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करून  मेनरोडलाच नव्हे तर शहरातील इतर ठिकाणीही कर्ण कर्कश डी. जे. वाजवण्यास परवानगी दिली तर आम्ही सर्व नागरिक संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात जावू. याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. सदरचे निवेदन शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा माजी तालुकाध्यक्ष कैलास वाकचौरे, ज्ञानेश्वर करपे, अतुल कासट यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले. या निवेदनावर शहरवासीयांच्या सह्या आहेत.
Visits: 197 Today: 1 Total: 1982301

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *