आमच्या आवारातील शवविच्छेदनगृह हलवा! मृतदेहांची अवहेलना; पालिकेचे वैद्यकीय अधीक्षकांना पत्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपघाती अथवा अकस्मात कारणांनी मृत्यू झालेल्या मृतदेहांची वेळेत उत्तरीय तपासणी करण्यात वारंवार हलगर्जीपणा होत असल्याच्या कारणावरुन सोमवारी पालिकेच्या आवारात मोठा गदारोळ झाला. यावेळी आपल्या प्रियजनांच्या मृत्यूने शोकमग्न असलेल्या नातेवाईकांचा संताप झाल्याने त्यांनी थेट पालिका कार्यालयात जावून अधिकार्यांना धारेवर धरले. मानवतेला शरमेने मान खाली घालायला लावणार्या या प्रकाराची आता पालिकेने गांभीर्याने दखल घेतली आहे. याबाबत पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांशी पत्रव्यवहार केला असून उत्तरीय तपासणीला होणारा विलंब सामाजिक शांतता भंग करण्यास कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त करण्यासह पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनगृह तत्काळ हलविण्यास सांगण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी (ता.2) तालुक्याच्या विविध भागात एकूण पाच दुर्घटना घडल्या. त्यात पेमगिरी येथे शेततळ्यात बुडून पुष्पा उत्तम डुबे ही महिला तर जवळे कडलग येथील एका विहिरीत ज्योती संतोष पाटेकर ही महिला बुडून मृत्यूमुखी पडली. रात्री शिर्डीच्या दिशेने जाणार्या रस्त्यांवरही दोन वेगवेगळ्या अपघातात कोकणगाव शिवारात अमोल गजानन सानप व निळवंडे शिवारात अनुकूल सत्यवान मेंढे या दोघा तरुणांचा बळी गेला. तर, मध्यरात्रीच्या सुमारास निमगाव टेंभी येथील अश्विन बाबुराव वर्पे या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याने या पाचही जणांचे मृतदेह पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनगृहात पाठविण्यात आले होते. पेमगिरीची घटना वगळता उर्वरीत सर्व घटना सायंकाळनंतर घडल्याने यासर्व मृतदेहांची उत्तरीय तपासणी शनिवारी (ता.3) सकाळी 9 पासून सुरु होणे अपेक्षित होते.

मात्र माध्यान्नाचा सूर्य डोक्यावर येवूनही उत्तरीय तपासण्यांची जबाबदारी असलेल्या वैद्यकिय अधिकार्यांची पावलं काही शवविच्छेदनगृहाकडे फिरकली नाहीत. त्यामुळे सकाळपासून आपल्या प्रियजनांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ताटकळलेल्या नातेवाईकांच्या संयमाचा अंत झाला. सुरुवातीला शवविच्छेनागृहासमोरच मोठा गदारोळ झाला, त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी थेट पालिकेच्या कार्यालयात जावून मुख्याधिकार्यांच्या दालनासमोरच ठिय्या देत आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली. यावेळी मुख्याधिकारी कार्यालयात नसल्याने कार्यालयीन निरीक्षक राजेश गुंजाळ यांनी मयतांच्या नातेवाईकांची समजूतही काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरचा प्रश्न भावना आणि प्रशासकीय दिरंगाईतून निर्माण झालेल्या संतापातून उभा राहील्याने त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले. सदरचा प्रकार वैद्यकीय अधीक्षकांना कळविल्यानंतर काही वेळाने मनमानी कारभारासाठी ओळखल्या जाणार्या ‘त्या’ महिला वैद्यकीय अधिकार्यांचे आगमन झाले.

मात्र रुग्णांवर उपचार करताकरता भावनाशून्य झालेल्या या महिला वैद्यकिय अधिकार्यावर घडल्या प्रकाराचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. अखेर माध्यान्नानंतर पाचही मृतदेहांची उत्तरीय तपासणी पूर्ण झाली आणि तब्बल बारा ते बावीस तासांपासून त्यासाठी ताटकळत विच्छेदनगृहात पडून असलेल्या पार्थिवांची अवहेलना पूर्ण होवून ते अंतिममार्गाच्या दिशेने निघाले. या सर्व घटनांनी पालिकेतील अधिकार्यांच्या भावना मात्र जागल्या आणि त्यांनी घडल्या घटनांचे सविस्तर विवरण मुख्याधिकार्यांच्या कानावर घातले. त्यांनाही अशाप्रकारांची जाणीव असल्याने त्यांनी तत्काळ वारंवार घडणारे असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी वैद्यकीय अधीक्षकांशी संवाद साधून पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनगृह ताबडतोब घुलेवाडीला हलविण्याची सूचना केली.

त्यासाठी सोमवारीच (ता.3) त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लेखी पत्रही पाठविले आहे. त्यात सोमवारी ताटकळलेल्या शवविच्छेनाच्या प्रकाराचा उल्लेख करताना, पालिकेने घुलेवाडी ग्रामीण रुग्णालया अंतर्गत कॉटेज रुग्णालयात शवविच्छेदनगृह उपलब्ध करुन दिल्याचे सांगण्यात आले आहे. रविवारी (ता.2) येथे उत्तरीय तपासणीसाठी पाच मृतदेह आले होते. त्यामुळे सोमवारी (ता.3) सकाळी वेळेवर त्यांची तपासणी करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी उपस्थित होणे अपेक्षीत होते. वास्तवात तसे न घडल्याने संतप्त झालेल्या मयतांच्या नातेवाईकांनी शवविच्छेदनगृहासह पालिकेच्या कार्यालयात येवून आपल्या दालनातही गोंधळ घातला व नाहक पालिका प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.

त्याचप्रमाणे शवविच्छेदनासाठी नियुक्त केलेला सफाई कर्मचारीही याकाळात तेथे आढळून आला नाही. मयताच्या नातेवाईकांचे समाधान करण्यासाठी वैद्यकिय अधिकारी अथवा सफाई कर्मचारी हजरच नसल्याने नातेवाईक मोठमोठ्याने आरडाओरड करीत होते. अशाप्रकारच्या घटनांमधून पालिकेच्या आवारातील शासकीय मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. सदरचे शवविच्छेदनगृह पालिकेच्या आवारात असले तरीही त्याचे संपूर्ण नियंत्रण आपल्या अधिकारात आहे. सदर ठिकाणी येणार्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यास विलंब झाल्यास मयताच्या नातेवाईकांचा संताप होतो व अशा घटना वारंवार घडतात.

सन 2009 मध्ये ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे स्थलांतरीत झाले आहे. या गोष्टीला चौदा वर्षांचा कालावधी होवूनही अद्याप मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यासाठी पालिकेच्या आवारातील जुन्या शवविच्छेदनगृहाचा वापर केला जातो. त्यामुळे उत्तरीय तपासणी करण्यास विलंब होत असून त्यातून मृतांच्या नातेवाईकांचीही गैरसोय होत असल्याने पालिकेच्या आवारातील शवविच्छेदनगृह ताबडतोब घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात हलवावे अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रती उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यावर तालुका प्रशासनाचा गाडा हाकणारे वरिष्ठ सनदी अधिकारी किती गांभीर्याने कारवाई करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला वैद्यकीय अधिकार्याबाबत अनेकांच्या तक्रारी आहेत. सदरील महिला अधिकारी भावनाशून्य आणि माणुसकीशी दुरान्वये संपर्क आला नसल्यासारख्या वागतात असा अनेकांचा धक्कादायक अनुभव आहे. यावरुन अपघाती मृत्यूने घरातील तारुण्य हरपलेले नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हाती मिळावा यासाठी तासन्तास ताटकळत ठेवण्यात खरोखरीच मानवता आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो. उपविभागीय अधिकारी व घुलेवाडीचे वैद्यकीय अधीक्षक या विषयाकडे मानवतेच्या दृष्टीने पाहतील आणि संगमनेरकरांना बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.

