स्वातंत्र्यदिनी गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत राजकीय राडा! नेत्यांच्या प्रतिमा लावण्यावरुन वाद; ‘टाळे’ ठोकून सरपंच झाले गायब..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शुक्रवारी देशभरात 79 व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह ओसंडत असताना संगमनेर तालुक्यात मात्र त्याला गालबोट लागले. विधानसभा निवडणुकीत झालेल्या सत्ता बदलापासूनच तालुक्यात काँग्रेस विरुद्ध महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी धुसफूस समोर येत आहे. शुक्रवारी गुंजाळवाडी ग्रामपंचायत कार्यालयातही असाच प्रसंग उभा राहीला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात नियमानुसार लोकप्रतिनिधींच्या प्रतिमा लावण्याचा आग्रह धरीत कार्यकर्त्यांसह ग्रामपंचायत गाठली, मात्र स्वातंत्र्यदिनी घडणार्या या प्रसंगाची पूर्वकल्पना असल्याने ध्वजारोहण आटोपताच थोरात समर्थक सरपंच, उपसरपंचासह अख्खे 18 सदस्य ग्रामपंचायत कार्यालयाला ‘टाळे’ ठोकून भंडारदरा सहलीच्या नावाखाली ‘गायब’ झाले. त्यामुळे पालकमंत्री व स्थानिक आमदारांच्या प्रतिमा घेवून पोहोचलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा रोष अनावर झाला. अखेर गटविकास अधिकार्यांच्या मध्यस्थीनंतर तब्बल चार तासांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा स्वीकारीत सोमवारपर्यंत कार्यालयातील प्रतिमांचा ‘फैसला’ करण्याच्या अटीवर आंदोलन स्थगित करण्यात आले. या घटनेतून आगामी कालावधीत संगमनेर तालुक्याचे राजकारण तापणार असल्याचे संकेत मिळू लागले असून त्याची सुरुवात महायुतीचा एकही सदस्य नसलेल्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतीपासून झाल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुंजाळवाडीतील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या प्रतिमा लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (ता.14) महायुतीच्या रोहिदास
गुंजाळ यांनी ग्रामसेवक भारत आहेर यांना फोन करुन सकाळी 9 वाजता महायुतीचे कार्यकर्ते नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालयात येवून दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा बसवणार असल्याची माहिती त्यांना दिली. त्यानुसार दुसर्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास गुंजाळवाडी व परिसरातील महायुतीचे कार्यकर्ते आपल्या दोन्ही नेत्यांच्या प्रतिमा घेवून गुंजाळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. मात्र त्यावेळी कार्यालयाला टाळे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामसेवकांना फोन करुन विचारणा करण्यात आली.

त्यानंतर तासाभराने सावकाश कार्यालयासमोर पोहोचलेल्या ग्रामसेवकांनी कार्यालयाची चावी आपल्याकडे नाही तर शिपायाकडे असल्याचे सांगितले व त्याला फोन केला. मात्र ठरल्याप्रमाणे त्याचा फोनही ‘स्वीचऑफ’ झाला होता. त्यामुळे तोफेच्या तोंडी सापडलेल्या ग्रामसेवकाने ‘एकसे भले दो..’चा
विचार करुन शिपायाच्या घराकडे कूच केली, मात्र शिपायी साहेबापेक्षा हुशार ठरला, त्यामुळे तो घरात आढळून आला नाही. मात्र कार्यालयाची चावी आपल्याकडे नाही असे सांगत त्याने सरपंच चावी घेवून गेल्याची नवीन माहिती ग्रामसेवकाला दिली. एव्हाना हा सगळा राजकीय गुंताडा असल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांचा रोष खद्खदू लागला आणि घोषणाबाजीला सुरुवात झाली, त्यामुळे वातावरण गंभीर झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आपल्या सहकार्यांसह गुंजाळवाडीत दाखल झाले. मात्र महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही संवैधानिक पदावर नसताना काँग्रेसच्या दोघा माजी आमदारांचे फोटो लावण्यामागच्या कृतीवर बोटं ठेवून नियमानुसार जिल्ह्याचे
पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांचे फोटो लावल्याशिवाय मागे हटणार नसल्याची घोषणा केली. त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने गटविकास अधिकार्यांसह गटविस्तार अधिकार्यांनीही गुंजाळवाडीत धाव घेत ‘चावी’ घेवून ‘गायब’ झालेल्या सरपंच अमोल उर्फ नरेंद्र गुंजाळ यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ध्वजारोहण होताच आपण भंडारदरा सहलीसाठी आल्याचे सांगत त्यांनी कार्यालयाचे टाळे उघडले जाण्याची शक्यताच संपुष्टात आणल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला.

अखेर गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी शिष्टाई करीत तब्बल साडेचार तासाच्या या राजकीय नाट्यावर पडदा टाकताना ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांच्या प्रतिमा स्वीकारण्याच्या सूचना केल्या. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही संवैधानिक पदावर नसतानाही काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि डॉ.सुधीर तांबे यांच्या कार्यालयात
असलेल्या प्रतिमा काढून टाकण्याचीही मागणी केली. त्यावर सोमवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने ऐन स्वातंत्र्यदिनी गुंजाळवाडीत रंगलेल्या या चार तासांच्या राजकीय नाट्याची सांगता झाली. या प्रकाराने आगामी कालावधीत संगमनेरचे राजकारण चांगलेच तापणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाल्यापासूनच काँग्रेस विरुद्ध महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय संघर्ष वाढला आहे. त्याचे प्रतिबिंब छोट्या-मोठ्या धार्मिक उत्सवांचे फ्लेक्स लावण्यावरुन आणि फाडण्यावरुन झालेले वाद, उत्सवांच्या आयोजनात वाढलेली स्पर्धा, त्यातून कार्यकर्त्यांचे शाब्दीक संघर्ष, सोशल माध्यमातून एकमेकांवर सुरु असलेल्या टीका अशा वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत असताना आता महायुतीचा एकही सदस्य नसलेल्या गुंजाळवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महायुतीच्या पदाधिकार्यांचे छायाचित्र लावण्यावरुन वाद उफाळण्याने आगामी कालावधीत संगमनेरचे राजकारणही तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

