संतापजनक; विवाहितांच्या आत्महत्या काही थांबेना…! दिवसेंदिवस सासरी छळ होणार्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या आधुनिक युग म्हणून गणले जाते. परंतु, या युगात माणसांची प्रवृत्ती मात्र बदलताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचारांच्या घटनांत लक्षणीय वाढ होत असल्याचे माध्यमांतून समोर येत आहे. लग्नानंतर विवाहिता सासरी नांदत असताना सासरच्या मंडळींकडून क्षुल्लक कारणांवरुन आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या अनेक घटना आजूबाजूला पहायला मिळतात. संगमनेर तालुक्यातही अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. नुकतीच पारेगाव बुद्रुक येथील एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरुन विवाहितांच्या आत्महत्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे अधोरेखित होत आहे.

संगमनेर तालुकाच नव्हे तर संपूर्ण देशभरात अनेक विवाहितांचा सासरी छळ होत असल्याच्या घटना माध्यमांद्वारे उजेडात येत असतात. तालुक्यातही कायमच विवाहितांच्या आत्महत्या होत असल्याच्या घटना समोर येत राहतात. याची अनेक कारण असून, क्षुल्लक कारणावंरुन डिवचणे आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावणे ही कारणे ठळकपणे दिसून येतात. लग्नानंतर सुरुवातीला काही दिवस सुखाचे नांदवितात, त्यानंतर मात्र ‘नऊ दिवस नवरीचे’ म्हणीप्रमाणे सासरची मंडळी त्रास द्यायला सुरुवात करतात. अशीच घटना पारेगाव बुद्रुकमध्ये घडली आहे. धांदरफळ बुद्रुक येथील कचरु लहानू वाकचौरे यांची तृतीय कन्या रेश्मा हिचा पारेगाव बुद्रुक येथील रुपेश सुकदेव मोकळ याच्याशी 24 सप्टेंबर, 2020 रोजी विवाह झाला होता. त्यावेळी मुलीचे माहेरच्यांनी थाटामाटात लग्न लावून प्रपंचही दिला होता. त्यानंतर सुरुवातीला दीड महिने सासरच्यांनी रेश्माला सुखात नांदवले. त्यानंतर मात्र शेतीसाठी घेतलेल्या जुन्या ट्रॅक्टरसाठी रोटाव्हेटर घेण्यासाठी सासरा सुकदेव मोकळ याने रेश्माचे वडील कचरु वाकचौरे यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी त्यांनी पाच हजार रुपये दिले आणि रोटाव्हेटर घ्या असे म्हणाले.

परंतु, एवढ्यावरही सासरची मंडळी न थांबता त्यांनी रेश्माला त्रास देणे सुरूच ठेवले. अक्षरशः शौचालयातही जावू देत नव्हते. त्यातच नणंद रंजना सचिन शेळके (रा.श्रीरामपूर) ही माहेरी पारेगाव येथे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्याकरिता आली होती. त्यावेळी तिनेही रेश्माला त्रास दिला. ही हकीगत तिने माहेरच्यांना सांगितल्यावर भाऊ संदीप हा रेश्माला माहेरी घेवून आला. त्यानंतर पुन्हा सासरी नेवून घालत त्यांची समजूत घातली. वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देण्याचे सत्र सुरूच ठेवल्याने वैतागलेल्या रेश्माने मंगळवारी (ता.16) माहेरच्यांना संपर्क करुन सासरी खूप त्रास होत असल्याचे सांगितले आणि दुपारी अडीच वाजेपासून बेपत्ता झाली. तेव्हा त्याच दिवशी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास पती रुपेश मोकळ याने वडील कचरु वाकचौरे यांना संपर्क करुन पारेगावला या असे म्हणाला. त्यानंतर रात्री 8 वाजता मुलगा संदीप याच्याबरोबर वडील गेले असता सासरचे लोक बॅटर्या घेऊन शोध घेत असल्याचे दिसले. त्यावेळी यांनीही शोध घेतला असता एका विहिरीजवळ रेश्माच्या चप्पल व बांगड्या आढळून आल्या. अखेर बुधवारी (ता.17) नातेवाईकांसह पारेगावमध्ये माहेरची मंडळी गेली असता त्यांना विहिरीत रेश्मा बुडालेल्या अवस्थेत आढळून आली. तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले. पंचनामा व शवविच्छेदन करुन माहेरी धांदरफळ बुद्रुक येथेच अत्यंत शोकाकूल वातावरणात विवाहिता रेश्मा मोकळ हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पती रुपेश सुकदेव मोकळ, सासरा सुकदेव नारायण मोकळ, सासू सुरेखा सुकदेव मोकळ, भाया अमोल सुकदेव मोकळ आणि नणंद रंजना सचिन शेळके या पाच जणांविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

एरव्ही सासू-सुनेचे भांडणे आपण नेहमी ऐकतो. परंतु, सासरच्या सर्वच मंडळींकडून विवाहितेचा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन शारीरिक व मानसिक छळ होत असल्याच्या अनेक घटना रोज समोर येत आहे. यामुळे लोकांनी सजग होवून विवाहितेचा छळ करण्याची मानसिकता बदलायला हवी. यासाठी स्वयंसेवी संस्थांबरोबर शासनानेही प्रबोधनासाठी अधिक पुढाकार घेणे गरजेचा आहे.
