मिल्कींग मशिनसह कुट्टी मशिन इंजिनची चोरी करणारी टोळी गजाआड अकोले पोलिसांची कामगिरी; 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या काही दिवसांपासून अकोले तालुक्यातील शेतकर्यांच्या मिल्कींग मशिन व चारा कापणी यंत्राच्या (कुट्टी मशिन) इंजिन चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर प्राप्त तक्रारींनुसार पोलिसांनी कसून तपास करीत नुकतीच टोळी गजाआड करत 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, 6 जानेवारी, 2022 रोजी रात्री चैतन्यपूर (ता.अकोले) परिसरातून 20 हजार रुपये किंमतीचे मिल्कींग मशिन चोरी गेल्याबाबत अकोले पोलिसांत तक्रार प्राप्त झाली. त्यावरून तत्काळ गुरनं.12/2022 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा प्रकार सातत्याने घडत असल्याने वरिष्ठांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरीता नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेश, चोरी करणार्या आरोपींच्या राहत्या घरी अचानक भेट अशा प्रकारच्या कारवाया नियमित सुरु असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की, वर नमूद चोरी गेलेले मिल्कींग मशिन हे तुषार बद्रीनाथ गवांदे व बबन सयाजी मांदळे (दोघेही रा.चैतन्यपूर) यांच्याकडे मिळून आल्याने त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. हा गुन्हा त्यांनी साथीदार मयूर रामदास महाले व दौलत साहेबराव महाले (दोन्ही रा. बेलापूर, ता.अकोले) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिल्याने वरील चौघांनाही तत्काळ अटक केली.
त्यानंतर न्यायालयासमोर हजर करुन 11 मे, 2022 पर्यंत पोलीस कोठडी घेतली. या कालावधीत त्यांच्या कब्जातून 20 हजार रुपये किंमतीचे स्वंयचलित मिल्कींग मशिन (दूध काढण्याचे मशिन), 24 हजार रुपये किमंतीचे 4 कुट्टी मशिनचे इंजिन, 50 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल (क्र.एमएच.17, सीएस.2836) व 45 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल (एमएच.17, सीपी.6343) असा एकूण 1 लाख 39 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास अकोले पोलीस करीत असून सदर आरोपींकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे, उपनिरीक्षक भूषण हंडोरे, पोना. किशोर तळपे, विठ्ठल शेरमाळे, पोकॉ. सुहास गोरे, सुयोग भारती, अविनाश गोडगे, आत्माराम पवार यांनी केली आहे.