गढूळ प्रतिमा सुधारण्याचे पोलीस अधिक्षकांसमोर आव्हान! ‘एलसीबी’चा दोन वर्षातील ‘धिंगाणा’; ठाण मांडलेले वतनदार बदलण्याची गरज..

श्याम तिवारी, संगमनेर
जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दित घडणार्या गुन्हेगारी घटना आणि बेकायदा कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी थेट जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या नियंत्रणाखालील स्थानिक गुन्हेशाखेचा (एलसीबी) ‘धिंगाणा’ गेली दोन वर्ष जिल्ह्यात चांगलाच चर्चेत होता. या कालावधीत गुन्ह्यांचे तपास करुन परस्पर मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याच्या एकामागून एक घटनांमुळे सामान्यांमधील पोलिसांच्या विश्वासालाच तडा गेला. त्यातून गढूळ झालेली पोलिसांची प्रतिमा तशीच मागे सोडून पोलीस अधिक्षक राकेश ओला यांची बदली झाली. त्यांच्या जागी आलेल्या नूतन अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारताच ‘एलसीबी’ला बाजूला ठेवून ‘विशेष पथक’ नेमताना सूचक इशाराही दिला आणि महिनाभरातच गुन्हे शाखेच्या निरीक्षकांची उचलबांगडीही केली. मात्र त्यातून पोलिसांची मलिन झालेली प्रतिमा उजळणार का? अशी शंकाही निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात समोर आलेल्या शिर्डीच्या ‘ग्रो-मोअर’ प्रकरणाने पोलीस अधिक्षकांच्या प्रयत्नातच माती कालवली असून त्यातून गुन्हे शाखेत फोफावलेली ‘वतनदारी’ही पुन्हा चर्चेत आली आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाचा नेमका फायदा घेताना अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हेशाखेत कार्यरत असलेल्या काहींनी अनोख्या फंड्यांना जन्म घालीत पोलिसांच्या वेशात गुन्हेगारीचे जाळे विणण्यास सुरुवात केली. त्यातून नियमित अवैध आणि बेकायदा धंद्यांवरील संपूर्ण नियंत्रणासह दरोडे, घरफोड्या, चोर्या आणि चेन स्नॅचिंगसारख्या प्रकरणांच्या तपासात आरोपींना केवळ ताब्यात घेवून परस्पर मुद्देमाल हस्तगत करण्याचे प्रकार वाढले. त्यातही अशा प्रकरणांच्या तपासात केवळ आरोपीच्या संपर्कात आल्याने अथवा त्याच्याशी मैत्री असल्याच्या कारणानेही अनेकांना ‘धाक’ दाखवून लाखों रुपयांना नागवले गेले. या सगळ्या प्रकारांमध्ये गेल्याच आठवड्यात शिर्डीच्या ‘ग्रो-मोअर’ प्रकरणात दीड कोटीचा मलिदा लाटण्याच्या प्रकरणात चर्चेत आलेला आणि दीर्घकाळ वतनदाराप्रमाणे एलसीबीत ठाण मांडून बसलेल्या पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव याचे किस्से तर जगावेगळेच.

अगदी भंगारवाल्यापासून ते सोनारापर्यंत आणि खिसेकापू पासून ते उद्योजकापर्यंत सगळ्या श्रेणीतील नागरिकांवर ‘धाक’ निर्माण करणार्या या अधिकार्याने महाराष्ट्र पोलिसांच्या पराक्रमी आणि विश्वासार्ह प्रतिमेशीच खेळ केला. असेच प्रकार जिल्हाभर वारंवार घडत गेल्याने व्यापारी आणि सोनारांची तर अक्षरशः त्राही झाली. याच धाकरावांनी सोनसाखळी चोरीच्या प्रकरणातील सोने विकत घेणार्या संगमनेरातील दोघा सोनारांकडून थोडे नव्हेतर तब्बल किलोभर सोने उकळले होते. तर, अवघ्या 60 हजार रुपये मूल्याची तांब्याची चोरीची तार विकत घेणार्या ‘भांडेवाला’ नामक भंगारवाल्यावर ‘धाक’ उभा करुन त्याला नऊ लाखांना नागवले होते. यावरुन गेली दोन वर्ष जिल्ह्यात पोलिसांचे राज्य होते की गुन्हेगारांचे अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली होती.

विशेष म्हणजे दक्षिणेचे खासदार नीलेश लंके यांनी जिल्हाभर सुरु असलेला एलसीबीचा हा धिंगाणा चव्हाट्यावर आणतांना गेल्यावर्षी 23 जुलैरोजी पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यावेळी त्यांनी गुन्हेशाखेकडून वेगवेगळ्या अवैध धंद्यांकडून किती पैसे मिळवले जातात याचे दरपत्रक जाहीर करण्यासह महिन्याकाठी तब्बल 27 कोटी रुपयांची वसुली होत असल्याचा गंभीर आरोप करुन जिल्ह्यातच नव्हेतर संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली होती. या दरम्यान आपल्याला एकरकमी पाच कोटी रुपये आणि दर महिन्याला ठराविक रकमेचे पाकिट देण्याची ‘ऑफर’ मिळाल्याचे जाहीर वक्तव्यही त्यांनी केले होते, ज्याचे कोणत्याही पोलीस अधिकार्याने खंडण केले नाही हे विशेष. खासदार लंके यांच्या या आंदोलनाने स्थानिक गुन्हेशाखेचा भ्रष्टाचार उघड झाल्याने वरीष्ठांकडून चौकशी आणि कारवाई होईल अशी आशा होती, मात्र खासदारांच्या उपोषणाला आता वर्ष उलटल्यानंतरही स्थानिक गुन्हेशाखेत कोणताही विशेष बदल झाल्याचे दिसून आलेले नाही.

यासर्व पार्श्वभूमीवर अवघ्या महिनाभरापूर्वीच जिल्हा पोलीस अधिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारणार्या सोमनाथ घार्गे यांनी थेट आपल्या नियंत्रणात असतानाही ‘एलसीबी’ला बाजूला ठेवून ‘विशेष पथक’ स्थापन केले. सुरुवातीला या पथकाचे नेतृत्त्व तीन महिन्यांसाठी जिल्ह्यात पर्यविक्षाधीन म्हणून आलेल्या मात्र त्यातील दोन महिने नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दित दैनंदिन कामकाजात घालण्यास भाग पडलेल्या उपअधिक्षक संतोष खाडे यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांनीही शेवटच्या महिनाभरासाठी मिळालेल्या संधीचे सोनं करताना मटका, गुटखा, जुगार, गांजा, वाळू, दारु, वेश्या व्यवसाय यांना लक्ष्य करीत थेट मूळात हात घालण्यास सुरुवात केली. त्यातून जिल्ह्यात फोफावलेल्या बेकायदा उद्योगांचे दर्शनही घडले. या दरम्यान खासदार लंके यांनी गंभीर आरोप केल्यानंतरही वर्षभर गुन्हे शाखेतच कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची मुख्यालयात उचलबांगडीही झाली.

गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून चक्क पोलिसांकडून सुरु असलेले एकामागून एक गंभीर प्रकार, त्याकडे पोलीस अधिक्षकांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही केलेले दुर्लक्ष यामुळे सर्वसामान्यांना कोणीच वाली नाही अशी स्थिती निर्माण होवून पोलिसांच्या पराक्रमी आणि विश्वासार्ह प्रतिमेलाच तडा गेला. तो सावरण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी सुरुवातीला विशेष पथक स्थापन करुन इशारा देत महिनाभरातच पोलीस निरीक्षकांची बदली केल्याने जिल्हावासीयांमध्ये सुशासनाबाबत आशा जागल्या असतानाच शिर्डीच्या ‘ग्रो-मोअर’ प्रकरणात गुन्हेशाखेच्या तुषार धाकराव आणि त्याच्या टोळीने तब्बल दीडकोटी रुपये लुबाडल्याचा प्रकार समोर आल्याने सामान्य माणूस साशंक झाला असून जो पर्यंत गुन्हेशाखेतील ‘वतनदारी’ला खणत्या लागणार नाहीत, तो पर्यंत पोलिसांची गढूळ झालेली प्रतिमा उजळणार नाही अशी भावना निर्माण झाली आहे.

दोन दशकांपूर्वी श्रीरामपूर विभागाचे उपअधिक्षक म्हणून सेवा केलेल्या सोमनाथ घार्गे यांची जिल्ह्याचे नूतन पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ति होताच त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभार्यांना हद्दित घडणारे गुन्हे, त्यांचे प्रलंबित तपास, नागरिकांशी वागणूक आणि बेकायदा धंद्यांवर नियंत्रण याबाबत सक्तिचे आदेश दिले. यासर्व गोष्टींवर नियंत्रणासाठी ‘विशेष पथका’ची स्थापना केल्याचे सांगत त्यांनी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दित पथक कारवाई करेल तेथील प्रभार्यांना शिस्तभंगाचा सामना करावा लागेल असा इशाराही दिला, अर्थात त्यांनतर पथकाकडून डझनभर कारवायाही झाल्या मात्र शिस्तभंग वगैरे कोठेही दिसून आला नाही. विशेष पथकाचे नेतृत्व असलेल्या उपअधिक्षक संतोष खाडे यांचीही बदली झाली आहे, मात्र त्या उपरांतही पोलीस अधिक्षकांनी अद्यापही ‘विशेष पथक’ कायम ठेवल्याने येणार्या कालावधीत ‘एलसीबी’त मोठे फेरबदल होवून अनेकांच्या वतनदार्या संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

