राहुरीतील पन्नास उपोषणकर्ते कृषी अभियंत्यांची प्रकृती खालावली प्रशासन घेईना दखल; मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
नायक वृत्तसेवा, राहुरी
सुमारे सातशे कृषी अभियंत्यांनी कृषी विद्यापीठाच्या कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. सोमवारी (ता.30) उपोषणाचा सहावा दिवस होता. परंतु, अद्याप कोणताही मार्ग निघाला नाही. त्यात 50 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून काहींची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
विद्यापीठ प्रशासनाने अद्याप या उपोषणाची कोणतीच दखल घेतली नसून प्रशासन या उपोषणकर्त्यांची मरणाची वाट पाहत आहे का? असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला आहे. कृषी सेवा मुख्य परीक्षा 2021 व 22 ला तत्काळ स्थगिती देऊन अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे करावा, स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचलनालय स्थापन करावे, मृदा व जलसंधारण विभागामध्ये कृषी अभियांत्रिकी शाखेच्या उमेदवारांची भरती करावी, महाराष्ट्र राज्य सेवा 2023 मुख्य परीक्षेत कृषी अभियांत्रिकी शाखेसाठी वैकल्पिक विषयाचा समावेश करावा या आंदोलकांच्या मागण्या आहेत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा अभ्यासक्रमात बदल करताना किमान दोन वर्षे तरी आधी असे जाहीर केले पाहिजे. मात्र, तसे झाले नाही. कृषी अभियंत्यांना प्रमाणापेक्षा अधिक फायदा मिळाला. हा राज्य लोकसेवा आयोगाचा दावा वास्तवतेशी निगडित नाही. आत्तापर्यंत केवळ अडीच टक्के कृषी अभियंत्यांची कृषी खात्यात निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भूमिकेमुळे कृषी अभियंत्यांत नैराश्याची भावना वाढली आहे.
दरम्यान, आमदार प्राजक्त तनपुरे, नीलेश लंके, माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी नगराध्यक्षा उषा तनपुरे, पद्मश्री पोपटराव पवार, नाना पटोले, सुभाष जंगले, मैथिली तांबे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, कुलसचिव प्रमोद लहाळगे, दिलीप पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण आदिंनी आंदोलनस्थळी भेट दिली. परंतु, कुठल्याच प्रकारचे आश्वासन मिळाले नसल्याने उपोषण सुरूच आहे. शासकीय प्रशासनाने उपोषणाची दखल न घेता मागण्यांबाबत कोणीही स्पष्ट बोलत नाही म्हणून कृषी अभियंत्यांचा जीव गेला तरी चालेल. परंतु मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.