गणोरे मार्गावरील बससेवा अजूनही पूर्ववत नाही! नागरिकांसह विद्यार्थ्यांचे होताहेत हाल; रास्ता रोकोचा दिला इशारा

नायक वृत्तसेवा, अकोले
राज्यातील लालपरी धावण्यास महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही वाहतूक पूर्ववत झालेली नाही. अकोले व संगमनेर आगाराने गणोरे मार्गे सुरू असणारी वाहतूक अद्यापही सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अकोले व संगमनेरातील दोन्ही आमदारांनी या मार्गावरील बस सुविधा पूर्वीप्रमाणे सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

गेली दोन वर्षे करोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळपास बंद होती. त्यानंतर एसटी बस कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप, त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरू होऊ शकली नाही. आता मात्र करोना नियंत्रणात आला असून संपही मिटला आहे. अशावेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ववत होण्याची अपेक्षा होती. मात्र अकोले व संगमनेर आगाराच्यावतीने गणोरे मार्गे जाणार्‍या बसेस अद्यापपावेतो सुरू होऊ शकलेल्या नाहीत.

संगमनेर आगाराच्यावतीने राजापूर, चिखली, जवळेकडलग, गणोरे, वीरगाव, देवठाण, सावरगाव पाट, समशेरपूर, केळी सांगवी, टाहाकारी या गावांसाठी बसेस धावायच्या. तर अकोले आगारातून तांभोळ, वीरगाव, गणोरे, हिवरगाव आंबरे, डोंगरगाव, चिकणी मार्गे संगमनेर या गावांसाठी बसेस धावायच्या. मात्र, अजूनही बस सुरू न झाल्याने नागरिकांना मोठ्या कुचंबनेला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा नागरिकांना खासगी वाहतूक व्यवस्थेचा पर्याय निवडावा लागतो. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची ये-जा असते मात्र तरी सुद्धा संगमनेर व अकोले आगाराने अद्यापपावेतो या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्ववत केलेली नाही.

वृद्धांना प्रवासासाठी सार्वजनिक सुविधांशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही अशा परिस्थितीत उपचार करण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने ज्येष्ठांचीही मोठ्या प्रमाणात कुचंबना होत आहे. त्यांना खासगी वाहतुकीने प्रवास करावयाचा झाल्यास पूर्ण दराने पैसे द्यावे लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. तर विद्यार्थ्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षणास जावे लागत असल्याने त्यांचेही बस नसल्याने हाल होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दोन्ही आगारांनी बस सुरू कराव्यात. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Visits: 164 Today: 1 Total: 1793523

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *