दरडगाव येथे शेतीच्या वादातून दोघांना मारहाण राहुरी पोलिसांत विविध कलमान्वये दोघांवर गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
शेतीच्या वादाच्या कारणावरुन दोघा पती-पत्नीने मायलेकाला शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील दरडगाव येथे घडली आहे.

कमलाबाई रेवणनाथ काळे (वय 60) ही महिला तिच्या कुटुंबासह दरडगाव येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या शेजारीच त्यांचा भाया भाऊसाहेब मुरलीधर काळे हा राहण्यास आहे. शेतीत ये-जा करण्यावरुन तो नेहमीच कमलाबाई काळे यांना त्रास देतो. 7 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कमलाबाई काळे या त्यांच्या शेतीत जात असताना भाऊसाहेब काळे व त्याची पत्नी भीमाबाई काळे हे दोघे तेथे आले व म्हणाले, तुम्ही या शेतात जायचे नाही. त्यावेळेस कमलाबाई काळे त्याला म्हणाल्या की, ही शेती आमची आहे. तुझा या शेतीशी काहीही संबंध नाही. असे म्हणाल्याचा त्याला राग आल्याने त्याने कमलाबाई यांना शिवीगाळ केली. तसेच लोखंडी गजाने मारहाण केली.

तेव्हा कमलाबाई काळे यांचा मुलगा योगेश हा भांडण सोडविण्यास आला असता त्यालाही त्याने शिवीगाळ केली. तुम्हाला गाठून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर कमलाबाई काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब मुरलीधर काळे व त्याची पत्नी भीमाबाई भाऊसाहेब काळे या दोघांवर गुरनं. 626/2023 भादंवि कलम 323, 324, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
