कोणताही नगरसेवक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदार नसेल! आमदार सत्यजीत तांबे यांचे अभिवचन; शहराचा विकास हेच आमचे ‘व्हिजन’..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीनंतरच्या वर्षभरात शहर व तालुक्यातील बिघडलेली व्यवस्था पाहता राजकारणविरहित सर्वसमावेशक आघाडीची गरज निर्माण झाली होती. त्याची पूर्तता करताना संगमनेर सेवा समितीच्या बॅनरखाली पालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये कर्तृत्ववान प्रतिमा असलेले उमेदवार देण्यात आले असून नगराध्यक्षपदासाठी उच्चशिक्षित व सामाजिक क्षेत्रात लौकीक असलेल्या मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी निवडणुकीच्या माध्यमातून आपण पहिल्यांदाच पालिकेच्या कारभारात लक्ष देत असून ‘ठेकेदारी मुक्त’ कारभाराचे अभिवचन आणि शहराच्या सर्वकष विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून ‘संगमनेर 2.0’ ही कालबद्ध संकल्पना राबवणार आहोत. जनसहभागातून लोकांच्या मनातील शहर साकारण्यासाठी पुढील शंभर दिवसांच्या कृती आराखड्यासह पुढील पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम आणि पन्नास वर्षांची दृष्टी ठेवून समितीने काम सुरु केले असून त्यात बिगर राजकीय अभ्यासकांचाही समावेश केला जाणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.


शहर विकास आघाडी की आणखी काही.. अशा उत्कंठेच्या वातावरणात सोमवारी (ता.17) सायंकाळी त्यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी राजकारणाच्या पलिकडे जावून संगमनेर सेवा समितीची स्थापना केल्याचे व त्या माध्यमातून व्यापक काम करण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. समितीला कोणताही राजकीय वास येवू नये याची काळजी घेण्यासह त्यात बिगर राजकीय अभ्यासू सदस्यांची नियुक्ति करण्याचा मनोदयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


विधानसभा निवडणुकीनंतरच्या विविध घटनांचे दाखले देत त्यांनी शहरातील सामाजिक सौहार्द, शांतता खराब झाल्याचा उल्लेख केला. गेल्या चार वर्षांपासून पालिकेवर प्रशासक असल्याने त्यांनी प्रशासकीय पद्धतीनेच कामकाज केले. त्यामुळे विकासकामांना खीळ बसण्यासह राजकीय हस्तक्षेपही वाढल्याने दोन महिन्यात चार मुख्याधिकार्‍यांना बदलून जावे लागले. शहरातील स्वच्छतेचे प्रश्‍नही गंभीर होत असून स्वच्छ शहर म्हणून मिळवलेला लौकीक धुमील होत आहे. छोट्या-छोट्या गोष्टींना राजकीय रंग दिला जावू लागल्याने सगळेच वातावरण गढूळ झाल्याची खंत व्यक्त करताना आमदार तांबे यांनी त्यातूनच राजकारणाच्या पलिकडे जावून काहीतरी घडण्याच्या नागरी अपेक्षेने जन्म घेतल्याचे व संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून त्याची पूर्तता झाल्याचे सांगितले.


सुसंस्कृत शहराची ओळख कायम ठेवताना शहराचा पुढील पन्नास वर्षांचा विकास डोळ्यासमोर ठेवून समितीने कृती आराखडा तयार करण्यावर भर दिला असून त्यासाठी नागरी सहभागही मागण्यात आला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगताना लोकांमधून सहा हजारांहून अधिक सूचना प्राप्त झाल्याची माहिती आमदार तांबे यांनी दिली. निवडणुकीनंतरच्या पहिल्या शंभर दिवसातील कृतीसह पुढील पाच वर्षात पन्नास वर्षांचा विकास डोळ्यासमोर ठेवून समिती प्रामाणिकपणे काम करण्यासाठी कटीबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडून गेलेला नगरसेवक पालिकेचा ठेकेदार होतो त्यामुळे लोकांमध्ये नाराजीची भावना असल्याचे समोर आल्यानंतर सेवा समितीने उमेदवारी दिलेल्या सर्व उमेदवारांकडून स्वतः अथवा इतरांमार्फत, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पालिकेची ठेकेदारी करणार नाही अशा आशयाचा मजकूर लिहिलेले शपथपत्रही घेतल्याची माहिती त्यांनी दिली.


यावेळी आमदार तांबे यांनी डॉ.सुधीर तांबे यांच्या कार्यकाळापासूनच्या सर्व नगराध्यक्षांच्या नावाचा उल्लेख करीत त्या सर्वांनी संगमनेर शहरातील मुलभूत सुविधा सोडवण्यासाठी केलेल्या कामांचे दाखले दिले. शहराला ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता होती त्यावर यापूर्वीच्या पदाधिकार्‍यांनी चांगले काम केले आहे. आता आपल्याला आधुनिक शहराचे स्वप्नं साकारताना विकासाची दृष्टी ठेवून व्यापक काम करावे लागणार आहे. त्यासाठी समाजातील चांगल्या लोकांची साथ मिळावी या उद्देशाने 19 नव्या चेहर्‍यांसह 11 जुन्या सहकार्‍यांना उमेदवारी देवून नव्या-जुन्यांचा मेळ घातल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.


स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बहुधा पहिल्यांदाच संगमनेर सेवा समिती वचननामा प्रसिद्ध करणार आहे. त्यावर युद्ध पातळीवर काम सुरु असून लवकरच संगमनेरला नव्या आवृत्तीच्या दिशेने घेवून जाणारा समितीचा जाहीरनामा प्रसिद्ध होईल. समितीच्या निवडणूक चिन्हाबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी आघाडीला मिळणार्‍या चिन्हाची किचकट प्रक्रिया पाहता ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राजकीय पक्षाच्या एबी फॉर्मचा वापर करुन त्यांच्या ‘सिंह’ या निवडणूक चिन्हावर समिती लढणार असल्याची घोषणाही केली. विशेष म्हणजे 1985 साली बाळासाहेब थोरात यांनी पहिल्यांदाच विधानसभा लढवली त्यावेळी त्यांचेही चिन्ह सिंह होते, तब्बल 40 वर्षांनी तसाच प्रसंग आज उभा राहीला आहे.


मागील नगराध्यक्षांनी काय केले या आरोपांचा समाचार घेताना आमदार तांबे यांनी निळवंडे धरणाच्या पाईपलाईनचा उल्लेख करीत संगमनेरकरांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी निकाली निघाल्याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. कधीकाळी शहरात केवळ एकमेव नेहरु उद्यान होते आज शहराच्या वेगवेगळ्या प्रभागात मिळून 35 उद्याने, पुण्याचा लक्ष्मीरस्ता वाटावा असा कॉलेजरोड या गोष्टीही निदर्शनास आणून दिल्या. संगमनेरच्या विकासाच्या गप्पा शेजारच्या तालुक्यांमध्ये सुरु असल्याचे सांगताना त्यांनी विरोधकांना कोपराही दिला. गेल्या दोन वर्षात शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वर्षभरात एका रुपयाचाही निधी आला नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. दोन महिन्यात चार मुख्याधिकार्‍यांची बदली होणं हे चांगल्या शहरासाठी योग्य नसून ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापक काम करण्याची गरज असल्याचे व त्यासाठी आपण समितीसह सज्ज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सत्यजीत तांबे यांनी आगामी निवडणूक राजकारणाच्या पलिकडे जावून पूर्ण ताकदीने लढवण्याचा मनोदय व्यक्त करताना ‘संगमनेर सेवा समिती’ची घोषणा केली. निवडणूक आयोगाच्या कठोर निकषांना टाळण्यासाठी समितीचे उमेदवार ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राष्ट्रीय पक्षाच्या ‘सिंह’ या निशाणीवर लढण्याचा विचार करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या पत्रकार परिषदेतील लक्ष्यवेधी वक्तव्य म्हणजे त्यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या सर्वांकडून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष ठेकेदारी करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेतले आहे. समितीचा हा मुद्दा निवडणुकीत प्रभावी ठरण्याची दाट शक्यता आहे.

Visits: 38 Today: 3 Total: 1109047

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *