‘शाळा तेथे कलाध्यापक नेमावा’; कलाध्यापक संघाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
‘शाळा तेथे कलाध्यापक नेमावा’; कलाध्यापक संघाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
सुधारित संच मान्यतेमध्ये कलाध्यापक पद धोक्यात आल्याने निवेदनाद्वारे केली मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
कलाध्यापक पद सुधारित संच मान्यतेमध्ये धोक्यात आले आहे. त्याचा फटका उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कलाध्यापकांना बसणार आहे. शिक्षण आयुक्तांच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आपल्या कलागुणांच्या विकासापासून वंचित राहतील, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. सरकारने हा निर्णय मागे घेऊन, ‘शाळा तेथे कलाध्यापक नेमावा’ अशी मागणी कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक काळे व सचिव बाळासाहेब पाचरणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अहमदनगर येथे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, सुधारित संच मान्यता निकषांमध्ये ज्या उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत 16 ते 23 शिक्षक असतील. तेथेच विशेष शिक्षक म्हणजे कलाध्यापक पद असेल. त्यापेक्षा कमी शिक्षक संख्या असलेल्या शाळेत हे पद असणार नाही. त्यामुळे कलाध्यापकांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. पाचवीचे वर्ग प्राथमिक शाळेला जोडले जाणार असल्याने माध्यमिक शाळेत कार्यरत असलेल्या विद्यमान कलाशिक्षकांचे काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
शिक्षण आयुक्तांनी 13 जुलैला दिलेला सुधारित संच मान्यता प्रस्ताव शहरातील शाळा समोर ठेवून घेतला आहे असे दिसते. ग्रामीण भागात जास्तीत जास्त शाळांमध्ये प्रत्येक वर्गाच्या एक-एक तुकड्या आहेत. तेथून तर कलाशिक्षक हद्दपार झालेला असेल. कला शिक्षकाशिवाय शाळा म्हणजे उजाड माळरान असते. मुलांचे कलागुण ओळखून त्यांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम कला शिक्षक करीत असतो. त्यामुळे सुधारित संच मान्यतेतील सोळा ते तेवीस शिक्षक पदे हा निकष रद्द करुन, पूर्वीप्रमाणे संच मान्यतेत विशेष कला शिक्षकाचे पद अबाधित ठेवण्यात यावे, अशी मागणी काळे व पाचरणे यांनी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व शिक्षण आयुक्तांना पाठविण्यात आल्या आहेत.