भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अभिनव त्यागींनी स्वीकारला पदभार
भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अभिनव त्यागींनी स्वीकारला पदभार
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरेंची अहमदनगरला बदली
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांची अहमदनगर येथे नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. उत्तर प्रदेश आग्रा येथून आलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी अभिनव त्यागी यांनी मंगळवारी (ता.27) प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला. या दोन्हीही अधिकार्यांचा नागरिकांसह सर्वपक्षीयांच्यावतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
नेवासा पोलीस ठाण्याच्या दालनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांचे स्वागत करण्यात येऊन पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. यावेळी पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. गावाची ऐतिहासिक धार्मिक, सामाजिक पार्श्वभूमी विषद केली. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक डेरे म्हणाले, नेवासा पोलीस ठाण्याला दोन वर्षे मी सेवा केली. जास्तीत जास्त खटले सामोपचाराने निकाली निघावेत मी केलेल्या प्रयत्नांना नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी दाद दिली. त्यामुळे सकारात्मक दृष्टीने न्याय देण्याचा प्रयत्न केला याचे समाधान वाटते. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी देखील सहकार्य केल्याने जातीय सलोखा देखील वृद्धिंगत झाला. याबद्दल चांगले काम केल्याचे मनोमन समाधान वाटते अशा भावना व्यक्त केल्या.
आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी म्हणाले, नेवासा पोलीस ठाण्याचा प्रभारी म्हणून तीन महिन्यांचा पदभार माझ्याकडे असणार आहे. यामध्ये सर्वांना न्याय देण्याची भूमिका राहील, शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माझा प्रयत्न राहील त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केला.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखधान, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, बहुजन नेते सुनील वाघमारे, नेवासा बुद्रुक गावचे युवा नेते दादासाहेब कोकणे, माजी सरपंच सतीश गायके, जातीय सलोखा समितीचे सदस्य असीफ पठाण, इम्रान दारुवाले, आदर्श वडुले गावचे सरपंच दिनकर गर्जे, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन जगताप, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, नगरसेवक अंबादास ईरले, राजेंद्र मापारी, किशोर गारुळे, ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पठाडे, प्रा.सुनील गर्जे, पत्रकार शंकर नाबदे, रमेश शिंदे, मकरंद देशपांडे, कमलेश गायकवाड, मोहन गायकवाड, पवन गरुड, काकासाहेब ससे, शिंदे पाटील, शिवा राजगिरे, अजित नरुला, स्वप्नील मापारी उपस्थित होते.