बस स्थानक आवारातील रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळा व्यापारी संघटनेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर बस स्थानकात अवैद्यरित्या उभ्या केलेल्या रिक्षांमुळे या परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून यातून प्रवासी आणि रिक्षा चालकांचे वादीवाद होत असल्याने या रिक्षा बस स्थानक परिसरातून हटवाव्यात अशी मागणी बस स्थानक व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, बस स्थानक आवारातील गाळ्यांमध्ये विविध व्यावसायिकांची विविध प्रकारची दुकाने आहेत. या दुकानांच्या समोर अनधिकृत रिक्षा वाकड्यातिकड्या उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या आणि येणाऱ्या व्यक्तींना रिक्षाच्या अडचणीमुळे जाता आणि येता येत नाही, त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. त्यासोबतच रिक्षा चालक जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींना अडदांडपणा दाखवून दमदाटी करत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या ठिकाणी दररोज चार ते पाच अपघात होतात आणि त्यातून वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना टाळण्यासाठी या रिक्षा चालकांचा बंदोबस्त करावा आणि गाळेधारकांच्या समोरील रिक्षा स्टॅन्ड हटवावे अन्यथा व्यापारी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा रवींद्र नवले, संतोष मुर्तडक, नारायण जाधव, टिकू सेठ, मिरज वाकचौरे अमर काळे, शहाजी काळे, परमित पंजाबी, सतीश आहेर, अमोल आरोटे, अनिल मुथा, ओंकार साळुंखे, निखिल शिंदे, शुभम घुले, श्याम भडांगे, डॉ. सागर मैड, डॉ. संतोष देशमुख, भळगट, अभिराज नाईकवाडी, अमोल गोर्डे, सुशील कस्तुरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Visits: 140 Today: 1 Total: 1573257
