सततच्या विकासकामांमुळे संगमनेर शहराची वैभवाकडे वाटचाल ः थोरात पालिकेच्यावतीने शहरात रस्ते, बंदिस्त गटारींसह विविध विकास कामांचा शुभारंभ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सन 1992 पासून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकदिलाने नगरपरिषदेत काम होत असल्याने विकासाची पायाभरणी झाली आहे. थेट पाईपलाईन योजना, रस्ते, विविध उद्याने, अद्ययावत बसस्थानक, वैभवशाली इमारती, शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण यांसह सामाजिक सलोखा व सुरक्षिततेमुळे संगमनेर शहराचा राज्यात लौकिक निर्माण झाला आहे. या सततच्या विकासकामांतून संगमनेर शहराची विकासातून वैभवाकडे वाटचाल होत असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर नगरपरिषदेच्यावतीने प्रभाग 1 ते 14 मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारे, ट्रीमिक्स काँक्रिटीकरण, आमदार डॉ.सुधीर तांबे शॉपिंग कॉम्प्लेक्स यांसह विविध विकासकामांचा शुभारंभ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला; यावेळी ते बोलत होते. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ.सुधीर तांबे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, बांधकाम विभागाच्या सभापती सुनंदा दिघे, सभापती वृषाली भडांगे, मालती डाके, मनीषा भळगट, शबाना बेपारी, सुहासिनी गुंजाळ, नगरसेवक बाळासाहेब पवार, दिलीप पुंड, सोनाली शिंदे, रुपाली औटी, कुंदन लहामगे, सुमित्रा दिड्डी, शमा शेख, इब्राहिम देशमुख, नूरमोहम्मद शेख, किशोर पवार, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, प्रियंका भरीतकर, राजेंद्र वाकचौरे, किशोर टोकसे, नसीमबानो पठाण, डॉक्टर शहानवाज खान, हिरालाल पगडाल, वसीम शेख, रिजवान शेख, योगेश जाजू, शिवसेनेचे शहरप्रमुख, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख प्रशांत वामन, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर, प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर कोरोना, तौक्ते चक्रीवादळ असे विविध संकटे आली अशा संकटातही या सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. संगमनेर शहर व तालुक्यासाठी सातत्याने मोठा निधी दिला आहे. शहरात विविध उद्याने, चांगले रस्ते, अद्ययावत इमारती, बसस्थानक, बाह्यवळण रस्ता, प्रवरा नदीवर विविध पूल, क्रीडा संकुल असे अनेक मोठमोठी विकासकामे मार्गी लागली आहेत. यामधूनच शहराच्या विकासाची खरी पायाभरणी झाली आहे. यामध्ये अनेक माजी पदाधिकार्‍यांचेही मोठे योगदान आहे. शहरासाठी सुमारे दीडशे कोटींच्या निधीतून नव्याने विविध रस्ते, बंदिस्त गटारी, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाचे बंदिस्तीकरण अशी विविध कामे होणार आहेत. ही सर्व कामे उच्च व चांगल्या दर्जाची करताना शहराच्या वैभवात आणखी भर पडेल यासाठी सर्वांनी काम करावे, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, कोरोना काळात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक, नगरसेविका व पालिका अधिकारी-कर्मचारी यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने निधी मिळवून पालिकेने विकासाचा मोठा टप्पा उभा करून शहर आदर्शवत व सुंदर केले आहे. स्वच्छ व हरित संगमनेर करण्यासाठी आपण काम करत असून याची राज्य पातळीवर कायम दखल घेतली गेली आहे. यामध्ये सर्व नागरिकांचा सहभाग असून, नव्याने शहरात महिलांसाठी स्वतंत्र शंभर खाटांचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

याप्रसंगी गुलाब ढोले, सिद्राम दिड्डी, सोमेश्वर दिवटे, सुभाष सांगळे, निखील पापडेजा, सतीश खंडेलवाल, चित्रपट गीतकार व कवी बाबासाहेब सौदागर, मिलिंद औटी, प्रा.मच्छिंद्र दिघे, अ‍ॅड.सुहास आहेर, मिलिंद कानवडे, किरण कडू, के.के. थोरात, अरविंद वैद्य, श्याम भडांगे, प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, राजेंद्र गुंजाळ, पंकज मुंगसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याधिकारी डॉ.बांगर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर आभार उपनगराध्यक्ष कलंत्री यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *