श्री श्री रविशंकर विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय स्पर्धात डंका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुमेरू एज्युकेशन सोसायटी संचलित येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश मिळवत संपूर्ण विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.

इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड या देशातील क्रमांक एकच्या स्पर्धेत इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. आदिती आशुतोष सोमाणी हिने महाराष्ट्र राज्यात पाचवा क्रमांक मिळवत सुवर्णपदक आणि रोख बक्षीस पटकावले. इयत्ता नववीची कु. भक्ती दिपक वाडेकर हिने राज्यस्तरीय जी.के. इंटरनॅशनल ऑलिम्पियाड मध्ये महाराष्ट्र राज्यात २१ वा क्रमांक मिळवून आपल्या ज्ञानाची चमक दाखवली. तर इयत्ता आठवीची कु. स्वरा सुधाकर पानसरे हिने आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड मध्ये महाराष्ट्र राज्यात २२ वा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली.या गौरवशाली क्षणी, शाळेच्या प्राचार्या आरती सप्रा यांच्या हस्ते या यशस्वी विद्यार्थिनींना सन्मानित करण्यात आले. त्यांची मेहनत, बुद्धिमत्ता आणि चिकाटीला प्राचार्यां सप्रा यांनी मनःपूर्वक दाद दिली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.श्री श्री रविशंकर विद्या मंदिर संगमनेर ही संस्था केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि मूल्याधारित शिक्षण रुजवण्यासाठी ओळखली जाते. शाळेतील कुशल व समर्पित शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

त्यांचे शंका समाधान, वेगवेगळ्या पद्धतीने तयारी आणि प्रेरणा देण्याचं काम अत्यंत तळमळीने करतात. या यशामागे पालकांचाही मोलाचा वाटा आहे. आपल्या मुलांवर अढळ विश्वास ठेवणं, त्यांच्या मेहनतीसाठी अनुकूल वातावरण तयार करणं आणि शाळेत दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणं हे सर्व घटक विद्यार्थ्यांच्या प्रगतीला अधिक बळकटी देतात. शाळेच्या व्यवस्थापनाची दूरदृष्टी, शिक्षणप्रणालीतील नावीन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर असलेला भर हेही यशाचे पायाभूत घटक आहेत.विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा स्वाती शाह, सेक्रेटरी समीर शाह, प्राचार्या आरती सप्रा, उप-प्राचार्या ज्योतिर्मया चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असते, ती फुलवण्यासाठी योग्य दिशा आणि समर्पित प्रयत्नांची गरज असते.आमची टीम हेच करत असते. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या क्षमतेप्रमाणे पुढे नेणे. या यशामुळे आमचं कष्टाचं चीज झालं हे नक्की, हे आनंदाचे क्षणच पुढील प्रेरणा देणारे ठरतात. पुढेही असेच प्रयत्न आम्ही करत राहणार असल्याचे अध्यक्षा स्वाती शाह यांनी सांगितले

हे यश केवळ शाळेचेच नव्हे तर संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. विद्यार्थिनींच्या या यशाने शाळेचा झेंडा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षक, शाळा आणि पालकांचे त्रिसूत्री योगदान महत्त्वाचे असल्याचे प्राचार्या सप्रा म्हणाल्या.

Visits: 124 Today: 3 Total: 1107059
