पाणी पुरवठा योजनांसाठी 782 कोटी रुपयांचा निधी ः थोरात विकासकामांत अडथळे आणणार्‍यांचा बंदोबस्त करण्याचा दिला इशारा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे कालव्यांसाठी मोठा निधी मिळवून रात्रंदिवस काम सुरू ठेवले. डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे ऑक्टोबर 2022 पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र सरकार बदलले आणि काम थंडावले. ही कामे आपणच केली आहे. मात्र सत्ता बदलामुळे काही दुसरे पाहुणे येतील. परंतु कामे कोणी केली हे जनतेला सगळे माहीत आहे. तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा योजनांसाठी आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच 782 कोटी रुपयांचा निधी मिळवला असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर तालुक्यातील झोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झोळे, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, आनंदवाडी व गणेशवाडी पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी आर. बी. रहाणे हे होते. तर व्यासपीठावर दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, संपत डोंगरे, सुधाकर जोशी, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, विष्णूपंत रहाटळ, संतोष हासे, अर्चना बालोडे, संतोष मांडेकर, विलास कवडे, एमआयडीसीचे अध्यक्ष भाऊसाहेब एरंडे, किरण नवले, सरपंच प्रगती बोराडे, रमेश गुंजाळ, शंकर रहाणे, सुभाष गडाख, विजय रहाणे, माधव वाळे, दिनकर एरंडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले, चंदनापुरी, झोळे, हिवरगाव पावसा या गावांच्या पाणी पुरवठा योजनेकरीता 59 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मिळवला आहे. याचबरोबर निमगाव जाळी, कोल्हेवाडी, तळेगाव, निमोण, निमगाव, घुलेवाडी या सर्व पाणी पुरवठा योजनांसाठी आपण महाविकास आघाडी सरकारच्या काळातच 782 कोटी रुपयांचा मोठा निधी मिळवला. यातून या परिसरातील गावांच्या पुढील 25 वर्षांच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले आहे. तालुक्यातील सर्व सहकारी संस्था उत्तम रीतीने सुरू आहेत. मात्र या चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्यासाठी काही लोक उपद्रव निर्माण करत आहेत.

जिल्ह्यात सध्या दहशतीचे राजकारण सुरू आहे. आपण सर्व एकत्रितपणे लढून त्यांना पुरून उरू असे सांगताना देश व राज्यपातळीवर राजकारणाची अवस्था वाईट झाली असून खासदार राहुल गांधी यांनी 20 हजार कोटींबाबत विचारलेल्या प्रश्नाला अद्याप पंतप्रधानांनी उत्तर दिले नाही. उलट तातडीने खासदारकी रद्द केली आहे. राज्यातील सरकार न्यायालयाच्या निर्णयानंतर एका मिनिटात पायउतार होईल. धार्मिक तेढ निर्माण करून केले जाणारे राजकारण हे पुरोगामी व मानवतेचा विचार असलेल्या महाराष्ट्राला मान्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. संगमनेर तालुक्याला संस्कृत राजकारणाची परंपरा आहे येथील विकासकामांत अडथळे आणणार्‍यांचा बंदोबस्त करू असा शेवटी इशाराही दिला. प्रास्ताविक भाऊसाहेब एरंडे यांनी केले तर किरण नवले यांनी आभार मानले.

Visits: 127 Today: 1 Total: 1105662

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *