वाघ,पवार प्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करा! मागासवर्गीय दलित व आदिवासी सामाजिक संघटनांचा मोर्चा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठार भागातील कर्जुले पठार येथील रूपाली वाघ हिच्या खून प्रकरणाची आणि कोकणगाव येथील गणेश पवार याच्या घातपाती मृत्यूची चौकशी करून आरोपींवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी तालुक्यातील मागासवर्गीय दलित व आदिवासी सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संगमनेरात भव्य मोर्चा काढत बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पठार भागातील कर्जुले पठार येथे मंगळवार दि. १० जून रोजी सायंकाळी शौचास गेल्याच्या कारणावरून २८ वर्षीय रूपाली वाघ या विवाहितेचा विक्रम पडवळ याने चाकूने भोसकून खून केला होता. या घटनेत रूपाली वाघ हिला वाचवण्यासाठी गेलेली तिची नणंद मोनिका वाघ गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी विक्रम पडवळ, मुरलीधर पडवळ व अलका पडवळ यांच्यावर गुन्हा दाखल करत घारगाव पोलिसांनी त्यांना अटक केली. त्याचबरोबर कोकणगाव येथील गणेश पवार याचा मृतदेह कोकणगाव शिवारातील सुखओहळ येथे संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्याचा घातपात झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांना आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील मागासवर्गीय दलित व आदिवासी सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चाचे आणि रस्ता रोकोचे आयोजन केले होते. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शहरातील शिवाजी पुतळा ते प्रांत कार्यालय असा घोषणा देत मोर्चा काढला. बस स्थानक परिसरात काही काळ रस्ता रोको आंदोलनही केले, त्यानंतर त्यांनी निवेदन दिले.या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रूपाली वाघ हिच्यावर पैसे अभावी उपचार न करणाऱ्या रुग्णालयावर तसेच तेथील डॉक्टर व व्यवस्थापकांवर कठोर कारवाई करावी, गावातील सरपंच, ग्रामसेवक यांनी कामांमध्ये कसूर केल्याने त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी तसेच पोलीस पाटील व तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी गावातील आदिवासी समाजाला गावात राहू न देण्याची भूमिका मांडल्याने त्यांच्यावरही ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करावी, पीडित कुटुंबाची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्याने शासनाने त्यांना योग्य ती आर्थिक मदत करावी, हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून तज्ञ वकिलांची नेमणूक करावी व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, कोकणगाव येथील गणेश पवार यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या तसेच त्याचा घातपात करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करावा, या मृत्यू मागे काही दिवसापूर्वी झालेल्या वादाची पार्श्वभूमी आहे आणि त्याच वादातून हा घातपात झालेला आहे. त्यामुळे गणेशचे नातेवाईक ज्या पद्धतीने फिर्यादित सांगतील, त्याप्रमाणे फिर्याद दाखल करून घ्यावी, निझणेश्वर फाटा येथे असणाऱ्या बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या व या प्रकरणाशी संबंध असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, या प्रकरणातील मयत गणेश पवार व रूपाली वाघ या दोन्ही कुटुंबांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व पोलीस संरक्षण मिळावे असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी विकास जाधव, राम दारोळे, ॲड किरण रोहोम, सुरेंद्र थोरात, शिवाजी ढवळे, योगेश सूर्यवंशी, आशिष शेळके, राजू खरात,अनिल बर्डे, राम सुरळकर, अशोक शेळके, रवींद्र शेळके, रोहम शेळके, सतीश शेळके, भास्कर बर्डे, रोहन शेळके, प्रवीण गायकवाड, मंजाबापू साळवे, संतोष बलसाने, अनिल जाधव, शशिकांत दारोळे, विनोद गायकवाड, दिलीप बर्डे, भाऊसाहेब माळी, अनिल मोरे, गोरक्ष बर्डे, लक्ष्मण पवार, पोपट सूर्यवंशी, सिकंदर पवार, बाळू पवार, गोपाल पवार, निसर्ग गवळी, बाबासाहेब खरात, बापूसाहेब खरात, रवींद्र भालेराव आदींसह मागासवर्गीय दलित व आदिवासी सामाजिक संघटनातील पदाधिकारी युवक कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Visits: 31 Today: 2 Total: 1100167
