माजी खासदार दिलीप गांधी यांच्या मृत्यूची चौकशी करा! सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
![]()
नायक वृत्तसेवा, राहुरी
माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन होवून आठ दिवस लोटले आहेत. मात्र आजही त्यांच्या मृत्यूबाबत काहींच्या मनात शंका असून खरोखरी त्यांचे निधन कोविडनेच झाले का? असा सवाल उपस्थित होत आहे. जर त्यांना कोविडचे संक्रमण झाले होत तर मग त्यांचे पार्थिव नातेवाईकांकडे कसे काय सुपूर्द करण्यात आले? दिल्लीतून त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून आणण्यात आले व लोकदर्शनासाठीही खुले कसे ठेवले? त्यांच्या अंत्यविधीला उपस्थितीची मर्यादा का पाळली गेली नाही? असे एक ना अनेक सवालांवर बोट ठेवीत सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे गांधी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गेल्या 17 मार्च रोजी दक्षिणेतील माजी खासदार दिलीप गांधी यांचे दिल्लीत कोविडच्या संक्रमणातून निधन झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर 18 मार्चरोजी रुग्णवाहिकेतून दिल्लीहून त्यांचे पार्थिव अहमदनगरमध्ये आणण्यात आले. यावेळी रुग्णवाहिका उभी ठेवून लोकांना अंत्यदर्शनही घेवू देण्यात आले. तसेच, गांधी यांच्या अंतिमयात्रेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसह गांधी यांच्या चाहत्यांची मोठी गर्दीही झाली, त्यातही अनेकांनी मास्क घातलेले नसल्याचेही दिसून आले. प्रत्यक्ष अंत्यसंस्कार करतानाही कोविडबाबत फारसे गांभिर्य दिसून आले नाही. त्यावरुन दिलीप गांधी यांचा मृत्यू खरोखरी कोविडनेच झाला की त्यामागे अन्य काही कारण आहे अशी शंका निर्माण होण्यास मोठा वाव असल्याचे डॉ.मकासरे यांचे म्हणणे आहे.

वास्तविक नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्यात माजी खासदार दिलीप गांधी संशयित आरोपी आहेत. त्यातून तर काही अघटीत घडले नसेल ना? अशी शंकाही डॉ.मकासरे यांनी उपस्थित केली आहे. या सर्व चर्चांमुळे जिल्ह्यातील वातावरण गढूळ झालेले असल्याने पोलीस प्रशासनाने सुमोटो पद्धतीने त्यांच्या मृत्यूची दखल घेवून खरोखरी त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे जनतेसमोर आणण्याची गरज असल्याचे डॉ.मकासरे यांचे म्हणणे असून त्यासाठी आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहारही करणार असल्याचे त्यांनी दैनिक नायकला सांगितले.
