घोषणाबाज राज्य सरकारचा आता फ्युजही उडाला ः विखे
घोषणाबाज राज्य सरकारचा आता फ्युजही उडाला ः विखे
लोणी बुद्रूकसह विविध ठिकाणी भाजपकडून वीज बिलांची होळी
नायक वृत्तसेवा, राहाता
सरसकट वीज बील पाठवून महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांना ‘शॉक’ दिला आहे. तिजोरीत पैसा नसताना केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा सुरु आहेत. बिघाडी सरकारच्या फसव्या धोरणाचीच होळी रस्त्यावर उतरुन करण्याची वेळ आली आहे. घोषणाबाज सरकारचा फ्युजही आता उडाला असल्याची तिरकस टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी केली.

वीज वितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांना देण्यात आलेल्या सरसकट बिलांची होळी आणि राज्य सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आमदार विखे यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रूक येथे आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात ज्येष्ठ नेते काशिनाथ विखे, एम. वाय. विखे, किसन विखे, अध्यक्ष नंदू राठी, सुभाष विखे, संचालक संजय आहेर, सिनेट सदस्य अनिल विखे, माजी सरपंच लक्ष्मण बनसोडे, माजी उपसरपंच अनिल विखे, रावसाहेब साबळे, अशोक धावणे, विक्रांत विखे, खंडू धावणे, संतोष विखे, अनिल विखे, शंकर विखे यांच्यासह शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारच्या धोरणावर टीका करताना आमदार विखे म्हणाले, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सामान्य माणसाला वीज वितरण कंपनीने सरसकट बिले पाठवून ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड टाकला आहे. या सरसकट वीज बिलांची वसुली वितरण कंपनीने तातडीने थांबवावी अशी मागणी करुन त्यांनी सांगितले की, 100 यूनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी सरकारकडे कोणीही केली नव्हती. परंतु सवंग लोकप्रियतेसाठी महाविकास आघाडीकडून केवळ घोषणा आणि आश्वासने दिली जात आहेत. ऊर्जामंत्र्यांनीच स्वत:च्या घोषणेपासून पळ काढला आहे. या घोषणेची पूर्तता करुन तातडीने 100 यूनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचा आग्रह सरकारकडे आम्ही धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारची मागील वर्षभरात फक्त घोषणाबाजी सुरु असून, कर्तबगारी मात्र शून्य आहे. सरकारच्या कोणत्याही धोरणात आणि निर्णयात स्पष्टता नाही. केवळ निर्माण झालेल्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचे काम मंत्र्यांकडून केले जाते. वीज बिल माफीची नागरिकांची मागणी दुर्लक्षित व्हावी म्हणून अचानक या सरकारने घाईत ऊर्जा धोरण जाहीर केले. तुमच्या तिजोरीत जर पैसाच नाही तर मग घोषणा करता कशाला? अशा प्रश्न उपस्थित करुन आमदार विखे म्हणाले, काही घडले तरी केंद्राकडे बोट दाखवायचे हा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचा केवळ अपयश झाकण्याचा प्रयत्न असून, राज्यातील जनतेशी केलेल्या विश्वासघातामुळे या सरकारची फ्युजच उडाली असल्याची खरमरीत टीका विखे यांनी केली आहे.

लोणी खुर्द येथेही वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी डॉ.विखे पाटील कारखान्याचे संचालक संजय आहेर, बापूसाहेब आहेर, पंचायत समिती सदस्य संतोष ब्राम्हणे, डॉ.हरिभाऊ आहेर, राहुल घोगरे, नितीन घोगरे, मच्छिंद्र घोगरे, मच्छिंद्र आहेर, रविराज आहेर आदिंसह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राहाता तालुक्यातील विविध गावांमध्येही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे.

शाळा सुरु करण्याबाबतही सरकारमधील मंत्र्यांची कोणतीही एकवाक्यता नाही. शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयालाच राज्यमंत्री विरोध करतात, शिक्षकांच्या कोविड टेस्टसाठी कोणतीही सुसज्ज यंत्रणा नाही. सरकार पूर्णत: गोंधळलेल्या परिस्थितीत असून, विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामध्ये झालेली संभ्रमावस्था दूर करण्यात सरकारला पूर्ण अपयश आले आहे.
– राधाकृष्ण विखे (माजी मंत्री तथा आमदार)

