सीताराम गायकरांना विधान परिषदेवर घ्या! समर्थकांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी; मुंबईत घेतली भेट

नायक वृत्तसेवा, अकोले
विधान परिषदेच्या बारा जागांचे घोंगडे भिजत पडलेले आहे. इच्छुकांना मात्र घोंगडे सुकेल तेव्हा सुकेल पण आपला नंबर बारामधे ‘फिक्स’ व्हावा ही अभिलाषा आहेच. गप्प बसलो तर ऐनवेळी आपला नंबर हुकायला नको असेही काहींना वाटतेय. अकोलेतील अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सीताराम गायकर यांचे कार्यकर्तेही असाच काहीसा हट्ट थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करत आहेत. यानिमित्ताने गुरुवारी (ता.१७) सकाळीच भेट घेण्यासाठी गायकरांच्या समर्थकांनी मुंबई गाठत देवगिरी बंगल्यावर भेट घेऊन गळ घातली.

गायकरांच्या समर्थनार्थ गेलेले जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, बाळासाहेब भोर, अशोक देशमुख, संभाजी पोखरकर आदिंनी गायकर यांची विधान परिषदेवर वर्णी लावावी अशी गळ घातली. अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत सकारात्मक आश्वासन दिले. अकोले तालुक्यावर आपले पूर्वीपासूनच प्रेम असून माझे गायकरांवर विशेष लक्ष आहे, असे सूचक आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.

अकोले विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अशात यापूर्वी विधानसभा आणि परिषदेसाठी, असे दोन लोकप्रतिनिधी तालुक्यात असताना येथील आदिवासी भागाचा वेगाने विकास झाल्याची जुनी उदाहरणे सध्या चर्चेत आणली जात आहेत. विधान परिषदेच्या बारा जागा सध्या न्यायालयीन निर्णय आणि त्यानंतर राज्यपाल यांच्या मंजुरीच्या अधीन आहेत. त्यात अनुकूल निर्णय आल्यास त्यात भाजपच्या वाट्याला निम्या ६ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला ३-३ जागांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. अशात महायुतीतील तीनही पक्षांसाठी ‘एक अनार और सौ बिमार’ अशी वस्तुस्थिती असताना पक्षनेतृत्व कुणाची वर्णी लावणार ही मोठी कसरत असणार आहे. मात्र ‘उम्मीद पर दुनिया कायम है’ याला राजकारणी कसे अपवाद असणार हे नाकारता येणार नाही.
