अतिवृष्टीचे कारण देत राज्य सरकारकडून अगस्तिची निवडणूक स्थगित माजी मंत्री पिचड व आमदार लहामटे औरंगाबाद खंडपीठात जाण्याची शक्यता

नायक वृत्तसेवा, नगर
अतिवृष्टीचे कारण देत राज्य सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये अकोले तालुक्यातील अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचाही समावेश आहे. अवघ्या दोन दिवसांवर मतदान आलेले असताना ही निवडणूक स्थगित झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत जोरदार भाषण केले. त्यांची पाठ फिरताच निवडणुका स्थगित झाल्याचा आदेश आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पिचड व लहामटे हे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे समजते.

आता या निवडणुका 30 सप्टेंबरनंतर होणार आहेत. अकोलेतील अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 17 जुलैला मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे, सीताराम गायकर आणि अशोक भांगरे यांनी शेतकरी समृद्धी मंडळ उभे केले आहे. त्यांच्या प्रचारासाठी थेट अजित पवार यांचीच सभा घेण्यात आली. या सभेला माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार सदाशिव लोखंडे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. सहकारातही भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असे स्वरूप देण्याचा हा प्रयत्न होता. मात्र, थोरात व लोखंडे यांनी सभेला येणे टाळले.

अहमदनगर जिल्ह्यात एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांत हस्तक्षेप करण्याची पद्धत नाही. अशा प्रथा पाडू नयेत, अशी यामागे थोरात यांची भूमिका असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी या सभेत अजित पवार यांचे मात्र जोरदार भाषण झाले. त्यांनी मधुकर पिचड यांच्यावर टीका केलीच, शिवाय राज्य सरकारवरही निशाणा साधला. पिचड यांच्याकडून कारखान्याची सत्ता काढून घेऊन ती आमच्याकडे द्या. पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांप्रमाणे ही संस्थाही चालवून दाखवू, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

शुक्रवारी दुपारी पवार यांची सभा संपली. त्यांची पाठ फिरते ना फिरते तोच संध्याकाळी राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्याचा आदेश आला. ज्या टप्प्यावर निवडणुका आहेत, त्या टप्प्यावर त्या स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांवर मतदान असलेल्या या अगस्ति कारखान्याची निवडणूकही स्थगित झाली आहे. ती आता 30 सप्टेंबरनंतर होणार आहे. त्यामुळे पवार यांच्या भाषणामुळे झालेली वातावरण निर्मितीही हाणून पाडली गेली आहे. या निवडणुका खरोखरच पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या, त्या मागे राजकीय कारणही आहे? अशी चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे.

दोन कारखाने आधीच बिनविरोध..
अगस्ति कारखान्याची निवडणूक गाजत असताना त्यापेक्षा मोठे आणि चुरशीचे राजकारण असलेल्या कोपरगाव तालुक्यातील दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका मात्र बिनविरोध झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सहकारमहर्षी शंकरराव काळे साखर कारखाना आणि भाजपच्या ताब्यातील शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका नुकत्याच बिनविरोध झाल्या आहेत.
