ज्येष्ठांचे वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धन! विद्यार्थ्यांनीही घेतली प्लास्टिक मुक्तीची शपथ

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चंदनापुरी घाटातील राहुलगड परिसरात डोंगर माथ्यावर ज्येष्ठ महिला, पुरुषांनी वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनात सहभाग घेतला. संस्था परिसरात बीएससी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवत प्लास्टिक मुक्तीची शपथ घेतली.

डॉ.आर.एस.गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित जनशिक्षण संस्थान अहमदनगर, माजी विद्यार्थी व स्काऊट गाईड सेवाभावी संस्था संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यावेळी कॉलेज ऑफ बी एस्सी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी संस्था परिसरात स्वच्छता अभियान राबवितानाच प्लास्टिक मुक्तीची शपथ घेतली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ, जनशिक्षण संस्थानच्या चेअरमन उषा गुंजाळ, संचालक बाळासाहेब पवार, वृक्षप्रेमी आणि औषधी वनस्पतींचे अभ्यासक रामलाल हासे, स्काऊट सेवाभावी संस्थेचे संस्थापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रत्नाकर पगारे, सचिव नारायण उगले, भाऊसाहेब हांडे, संभाजी कानवडे, अजित गुंजाळ, याह्या खान, डॉ. संजय गुंजाळ, काशिनाथ गुंजाळ यांसह स्काऊट सेवाभावी संस्थेचे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमात पाचशे रोपांची लागवड करण्यात आली.

डॉ.राधेश्याम गुंजाळ यांनी चंदनापुरी घाटमाथ्यावर असलेल्या संस्थेच्या मालकीच्या राहुलगड परिसरात हजारो औषधी आणि जंगली वृक्षांची लागवड केली असल्याचे सांगितले. रत्नाकर पगारे यांनी स्काऊट संस्थेच्या कामाची माहिती दिली. बाळासाहेब पवार यांनी जनशिक्षण संस्थानमार्फत सुरू असलेल्या कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमांची माहिती देत पंचेचाळीस हजाराहून अधिक स्री पुरुषांना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. वृक्षप्रेमी रामलाल हासे यांनी महाळुंग या वनस्पतीच्या औषधी गुणधर्मांची माहिती दिली.

जनशिक्षण संस्थानच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवडा या अभियानांतर्गत बी. एस्सी. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संस्था परिसरात स्वच्छता केली. प्रदूषणाबरोबरच पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, करू देणार नाही अशी शपथ घेतली.

Visits: 32 Today: 2 Total: 1108773
