जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांचे राजकीय वाटचालीत मोठे योगदान ः थोरात खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहानूभाऊ गुंजाळांचा अमृत महोत्सव सोहळा उत्साहात
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचा विरोध असतानाही मला अपक्ष उमेदवार केले आणि प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणले. त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या विकासाला खर्या अर्थाने कलाटणी मिळाली. तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये मला मताधिक्क्य मिळविण्यात लहानूभाऊ गुंजाळ यांच्यासह जुन्या पिढीतील सर्वच कार्यकर्त्यांचे मोठे योगदान राहिले असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील श्री खांडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष लहानूभाऊ गुंजाळ आणि त्यांच्या सौभाग्यवती नानीबाई व हौसाबाई यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याप्रसंगी नामदार थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर नारायणगिरी महाराज प्रतिष्ठानचे मठाधिपती उद्धव महाराज मंडलिक, सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, स्वामी दयानंदगिरी महाराज, बाजीराव खेमनर, माधव कानवडे, दशरथ सावंत, इंद्रजीत थोरात, सत्यजीत तांबे, भाऊसाहेब कुटे, सीताराम गायकर, मीनानाथ पांडे, प्रताप ओहोळ, डॉ. जयश्री थोरात, कैलास वाकचौरे, आर. एम. कातोरे, मिलिंद कानवडे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, दादासाहेब गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, अशोक गुंजाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार थोरात म्हणाले, लहानूभाऊ गुंजाळ यांच्यासह जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी कायम निष्ठा, प्रामाणिकपणा आणि नेतृत्वावरील श्रद्धा हे सूत्र जपले आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतून वाटचाल करताना लहानूभाऊंनी गावासह तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. आपल्याबरोबर समाजाची प्रगती होईल हे उद्दिष्ट लहानूभाऊ गुंजाळ यांनी कायम जपले असून समाजकारण, शेती, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत मोठी प्रगती साधली आहे. लहानूभाऊ यांचा राजकीय, सामाजिक व अध्यात्मिक संस्कार घेऊन रमेश, बाळासाहेब, दादासाहेब हे तिन्ही मुलं पुढे वाटचाल करत आहेत. आईवडीलांचा असा भव्यदिव्य सन्मान करणं हे आदर्शवत असून ते प्रत्येकाच्या घराला घरपण देणारे असल्याचे महसूल मंत्री थोरात यांनी सांगितले.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना अत्यंत दिशादर्शक काम केले. त्याच पावलावर पाऊल ठेवून आज आपण काम करत आहोत. राजकारण विरहित त्यांनी अनेक माणसे जोडली, असून अध्यात्म व नेतृत्वावर निष्ठा ठेवली असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, वारकरी संप्रदाय आणि अध्यात्मासाठी लहानूभाऊ गुंजाळ यांनी कायम सेवावृत्ती पद्धतीने काम केले. आमदार माणिक कोकाटे म्हणाले, शेतकरी माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व सवंगड्यांना बरोबर घेऊन भाऊसाहेब थोरातांनी काम करुन त्यांचे हात बळकट करण्याचे काम लहानूभाऊ व त्यांच्या पिढीतील सर्व सहकार्यांनी केले असल्याचे म्हणाले. प्रास्ताविक थोरात साखर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले. आभार अॅड. मधुकर गुंजाळ यांनी मानले. या कार्यक्रमास खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.