श्रीरामपूर काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली पदाधिकारी निवडीवर नामदार थोरात काढणार मार्ग

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर शहर व तालुका काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी दोन बैठका घेतल्या. दोन्ही गटांनी शक्तीप्रदर्शन करत पक्ष निरीक्षकांसमोर मोठ्या गटबाजीचे प्रदर्शन केले. पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी दोन्ही गटाकडून नावे आल्याने निवड प्रक्रिया पूर्ण न करता पक्ष निरीक्षक सांगळे यांनी निर्णय घेतला नाही. आता या निवडीचा पेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात सोडविणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नामदार थोरात कसा मार्ग काढतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सध्या श्रीरामपूर काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून आमदार लहू कानडे गटाचे अरुण नाईक तर शहराध्यक्ष म्हणून ससाणे गटाचे संजय छल्लारे काम पाहत आहेत. मात्र पक्षाच्या आदेशानुसार सध्या निवडी होत आहेत. ससाणे व आमदार कानडे यांच्यातील मतभेदांमुळे शहराध्यक्षांचा कानडे यांच्याशी संपर्क नाही तर तालुकाध्यक्ष नाईक यांचा ससाणे गटाशी संपर्क नसल्यामुळे दोघा गटांनी आपल्याला हवे तसेच शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या. त्यानुसार श्रीरामपूर काँग्रेस पक्षाची तालुका व शहर कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पक्षाचे निरीक्षक व जिल्हा बँकेचे संचालक गणपत सांगळे श्रीरामपूर येथे आले होते. यावेळी सर्वप्रथम आमदार लहू कानडे यांच्या यशोधन कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर करण ससाणे यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात दुसरी बैठक पार पडली. यावेळी दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दोन्ही बैठकांना शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

काँग्रेस पक्षाने दोन महिन्यांपूर्वी डिजिटल सदस्य नोंदणीची मोहीम राबविली होती. त्याला मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळाला. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीणसाठी 310 बूथ प्रतिनिधी तर शहरात 77 प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. सदस्य नोंदणीसाठी आमदार कानडे व ससाणे यांच्याकडून स्वतंत्रपणे मोहीम राबविण्यात आली होती. त्यामुळे आपणच सर्वाधिक नोंदणी केल्याचा दावा स्वतंत्रपणे आमदार कानडे व ससाणे यांनी पक्ष निरीक्षकांसमोर केला. या बैठकीदरम्यान, आमदार कानडे गटाकडून तालुकाध्यक्ष पदासाठी अरुण नाईक व शहराध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. समीन बागवान यांची नावे तर ससाणे गटाकडून तालुकाध्यक्ष पदासाठी राजेंद्र पाऊलबुद्धे व शहराध्यक्ष पदासाठी मुळा प्रवराचे संचालक संजय छल्लारे यांची नावे देऊन त्यांचे अर्ज दाखल केले आहेत. सध्या नाईक (कानडे गट) तालुकाध्यक्ष तर छल्लारे (ससाणे गट) शहराध्यक्षपदाचे कामकाज पाहत आहेत. दोन्ही गटांकडून नावे आल्याने निवडीचा पेच निर्माण झाला. निवडीबाबत एकमत न झाल्याने पक्ष निरीक्षक गणपत सांगळे यांना पदाधिकार्‍यांची निवड न करताच माघारी परतावे लागले. त्यामुळे आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याबाबत निर्णय घेणार आहेत.

Visits: 86 Today: 1 Total: 1106273

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *