राजकीय परिवर्तनातून व्यापार्‍यांची व्यावसायिक गोची! इच्छा असूनही ‘कृती’ करता येईना; पत्रिकांमधून ‘नेत्यां’ची नावेच ‘गायब’..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकालांमध्ये संगमनेरच्या निकालाचाही समावेश आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चार दशकांच्या भक्कम सिंहासनाला हादरा देत अमोल खताळ सारखा सामान्य कार्यकर्ता विधीमंडळात पोहोचला. अनपेक्षितपणे घडलेल्या या परिवर्तनाला असंख्य कारणे असली तरीही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठा वर्ग एकाबाजूला झुकल्यानेच राज्यात महायुतीची त्सुनामी आली ही गोष्ट लपून राहिली नाही. निवडणुकांनंतर महिन्याभरातच प्रयागराजमधील महाकुंभाला जगभरातून मिळालेला प्रतिसाद पाहता राज्यात जन्माला आलेला हिंदुत्वाचा मुद्दा राष्ट्रीय झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे अनेक पराभूत उमेदवारांची ‘वैचारिक’ गोची झालेली दिसत असतानाच त्यात आता संभ्रमित झालेल्या व्यापार्‍यांचाही समावेश झाला आहे. त्यातून उगाच ‘नाराजी’ नको म्हणून नव्याने सुरु होणार्‍या दालनांच्या उद्घाटन पत्रिकांमधून नेत्यांची नावेच ‘गायब’ होवू लागली आहेत. अर्थात या सर्वांना दोन्ही नेत्यांविषयी आदर आहे, मात्र नामोल्लेखावरुन नाराजीची भीती असल्याने अनेकांची मोठी ‘गोची’ झाल्याचे दिसत आहे.


गेल्यावर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे अनपेक्षित निकाल समोर आले. लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात विरोधकांना मोठे यश मिळाल्याने विधानसभेतही त्याची पुनरावृत्ती होण्याचा कयास होता. काही प्रवक्त्यांनी तर, आघाडीला 170 ते 190 जागा मिळतील असेही अंदाज वर्तवले होते. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राज्य सरकारने ‘लाडकी बहिण योजना’ सुरु करुन त्याचे हप्तेही वर्ग केले. मात्र त्यातूनही दिलासा मिळत नसल्याचे समोर आल्यानंतर विदर्भातील आपल्या पहिल्याच सभेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिली आणि निवडणुकीची दिशा त्याच सभेने पालटली. योगींची घोषणा परिणामकारक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर संवैधानिक पदावर असलेल्या पंतप्रधान नरेंद मोदी यांनी त्याला चाळण लावून ‘एक है तो सेफ है’चा नारा दिला. या दोन्ही गोष्टी राज्यात हिंदुत्वाची सूप्त लाट निर्माण करणार्‍या ठरल्या आणि त्यांनी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यारख्या अनेक दिग्गजांना पराभव दाखवला.


बाळासाहेब थोरात यांनी आपल्या चार दशकांच्या राजकीय प्रवासात अगदी गंगामाईपासून ते वन-ट्रीपर्यंत विविध ठिकाणी सातत्याने संपर्क ठेवून आपला व्यक्तिगत वर्ग निर्माण केला आहे. संगमनेरच्या बाजारपेठेत तर अनेकांशी त्यांचे महाविद्यालयीन अथवा समकालीन मैत्रिचे संबंध आहेत. अगदी रस्त्याने जाताना ते सहज अशांच्या घरी गेल्याची अनेक उदाहरणेही आहेत. त्यामुळे शहर अथवा ग्रामीणभागात त्यांना व्यक्तिगत ओळख असलेले हजारों चेहरे आहेत. त्यातूनच त्यांनी चार दशके संगमनेर विधानसभेवर सत्ता गाजवली आणि यावेळी सलग नवव्यावेळी विजय मिळवून ते विधानसभेत जातील असेच एकंदर वातावरण होते. खूद्द थोरात आणि त्यांची संपूर्ण यंत्रणाही आपला विजय निश्‍चित आहे असे मानून आश्‍वस्थ होती.


मात्र या निवडणुकीत सरकारची लाडकी बहिण योजना आणि सूप्तपणे घराघरातून वाहीलेली हिंदुत्वाची लाट संगमनेरमध्ये परिवर्तन घडवणारी ठरली. त्याचे चिंतन करुन कमतरता शोधल्या जात असतानाच प्रयागराजमधील कुंभमेळ्यात देशाची निम्मी लोकसंख्या ‘डूबकी’ मारुन आल्याचे समोर आले. त्यावरुन राज्यात परिणामकारक ठरलेला हिंदुत्वाचा मुद्दा योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यातून राष्ट्रीय पातळीवर नेल्याचेही दिसून आले. त्यामुळे जनमनाचा बदलणारा हा भाव निधर्मीवादाचा पुरस्कार करणार्‍या अनेकांसाठी त्रासदायक ठरु लागला आहे. त्यातून हे करावं, की ते सोडावं अशी स्थिती दिसू लागली असून शिवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा देणार्‍या फलकांमधून त्याचे प्रतिबिंबही दिसत आहे. एकिकडे नेत्यांच्या विचारसरणीत होत असलेला हा बदल त्यांची वैचारिक ‘गोची’ झाल्याचे दाखवत असताना दुसरीकडे तसाच प्रकार व्यापार्‍यांच्या आणि नव उद्योजकांच्या बाबतीतही घडू लागला आहे.


जिल्ह्यात प्रगल्भ असलेल्या संगमनेरच्या बाजारपेठेत रोजच कोणता तरी नवीन व्यवसाय सुरु होत असतात. अनेक तरुण व्यावसायिक प्रशिक्षण घेवून, आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डची एजन्सी मिळवून व्यवसायात उतरत आहेत. कोविडनंतर त्याला अधिक वेग आला आहे. साधारणपणे शहरात सुरु होणार्‍या कोणत्याही व्यवसायाच्या शुभारंभाला लोकप्रतिनिधींना बोलावण्याचा प्रघात आहे. आजवर तो निर्विवादपणे पाळलाही गेला आहे. मात्र यावेळी मतदारसंघात परिवर्तन घडून आमदारपदी अमोल खताळ निवडून गेल्याने आपल्या दुकानाच्या अथवा दालनाच्या उद्घाटनाला त्यांना कसे बोलवावे असा प्रश्‍न अनेकाना पडत आहे. माजीमंत्र्यांवरील स्नेह कायम असल्याने त्यांच्याशिवाय तो घेण्याची तयारी नसते. दोघांना सोबत बोलवावे म्हटल्यावर शिष्टाचारानुसार पत्रिकेतील एकमेकांचे स्थान निश्‍चित असल्याने त्यातून ‘नाराजी’ नको म्हणून अनेकजण राजकारण्यांना टाळून धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीतच आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा उरकून घेत आहेत.


दोन्ही नेत्यांनी यावं आणि सदीच्छा द्याव्यात अशी या व्यापार्‍यांची मनापासून तळमळही आहे. मात्र बदलत्या राजकीय स्थितीनुसार जर कृती केली तर नाहक नाराजी निर्माण होवून संबंधात कुटुता येईल या भीतीने अनेकांना नेत्यांना केवळ ‘निमंत्रण’ देत उद्घाटन पत्रिकांच्या मथळ्यातून मात्र टाळण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. यासर्व घडमोडी नेत्यांप्रमाणेच मतदारांचीही ‘गोची’ झाल्याचे दाखवणार्‍या आहेत.


नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत संगमनेरात चार दशकांनंतर परिवर्तन घडलं. लाडकी बहिणं, हिंदुत्त्व, प्रदीर्घ नेतृत्वातून निर्माण झालेली नकारात्मकता अशा अनेक कारणांतून घडलेला हा बदल राज्याचे लक्ष वेधणारा ठरला. राज्याच्या पातळीवर हा काँग्रेसचा पराभव असला तरीही संगमनेरच्या पातळीवर मात्र तो बाळासाहेब थोरात यांचा पराभव आहे. शहर व तालुक्यात त्यांना मानणारा, त्यांना मतदान करणारा मोठा पक्षविरहित वर्ग आहे, त्यांच्यासाठी थोरात हाच पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासह नूतन आमदारांनाही बोलवावे लागणार. दोघेही असणार म्हटल्यावर शिष्टाचारानुसार विद्यमान आमदाराचे नाव आणि कार्यक्रमातील त्यांचे महत्व सर्वाधीक असणार. त्यामुळे अनेक आस्थापनांनी उगाच नाराजी नको म्हणून आपल्या उद्घाटन पत्रिकांमधून आजी-माजी दोघांना टाळून साधुसंतांच्या शुभहस्ते कार्यक्रम उरकण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

Visits: 162 Today: 2 Total: 1101348

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *