शिवजयंती उत्सव समितीने राबविला ‘शिवशाही’ला साजेसा उपक्रम! कोविडच्या पार्श्वभूमीवर तरुणांचे रक्तदान; आठशेहून अधिक पिशव्यांचे झाले संकलन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या दुसर्या संक्रमणामुळे राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 31 मार्च रोजी तिथीनुसार येणारा शिवजयंती उत्सव सार्वजनिक पातळीवर साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. संगमनेरातील शिवजयंती उत्सव युवक समितीने प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत या वर्षीच्या उत्सवाचा डामडौल कमी केला असून महाराष्ट्राच्या जाणता राजाचा जन्मोत्सव विविध सामाजिक कार्यांनी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी (ता.28) शहरातील विविध ठिकाणी ‘रक्तदान’ शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात 812 रक्तदात्यांनी रक्तदान करुन यंदाचा शिवजयंती उत्सव ‘शिवशाहीला’ साजेसा ठरवला आहे.
यावर्षी बुधवार 31 मार्च रोजी तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती आहे. मात्र यावर्षी राज्यावर कोविडचे सावट असल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर साजर्या होणार्या या उत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. संगमनेरातील शिवजयंती उत्सव युवक समितीच्या माध्यमातून दरवर्षी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्यांचा समावेश असलेली मोटारसायकल रॅली विशेष आकर्षण असते. त्यासोबतच विविध स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांच्या कलागुणांना वाव देण्याचाही प्रयत्नही समितीकडून केला जातो. मात्र यावर्षी राज्यावर महामारीचे संकट असल्याने समितीने शिवजयंती निमित्ताने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असून समाजाभिमुख उपक्रमाद्वारे यंदाचा शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता.28) शहरातील विविध ठिकाणांसह ग्रामीण भागातील सुकेवाडी, आश्वी, पेमगिरी, कासारवाडी, बटवाल मळा व जवळे कडलग या ठिकाणी कोविड बाबतचे सर्व नियम पाळून अर्पण व आधार रक्तपेढ्यांच्या मदतीने हे शिबिर घेण्यात आले. या माध्यमातून गोळा झालेल्या 812 रक्तपिशव्या कोविडमुळे गंभीर झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेरच्या शिवजयंती उत्सव युवक समितीने रयतेचे सुराज्य निर्माण करणार्या महाराष्ट्राच्या जाणता राजाचा जन्मोत्सव शिवशाहीला साजेशा पद्धतीनेच साजरा केला आहे.
कोविडच्या काळातही समितीच्यावतीने विविध कार्यक्रम राबविले गेले होते. टाळेबंदीच्या काळात निराधार व गरजू लोकांसाठी अन्नछत्र, शहरात औषधाची फवारणी, शहरात कोविडच्या अनुषंगाने बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्यांच्या जेवणाची व्यवस्था, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप अशा अनेक उपक्रमातून समितीने समाजाविषयीची कणव सिद्ध केली आहे. या उपक्रमातून शिवजयंती उत्सव युवक समितीच्या कार्याला सोन्याचा मुलामा चढला आहे. या उपक्रमाबद्दल शहरातून समितीचे कौतुक होत असून दरवर्षी अशाच कार्यक्रमांच्या आयोजनातून महाराष्ट्राच्या आराध्याचा जन्मोत्सव साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिवजयंती उत्सव युवक समितीने रविवारी (ता.28) राबविलेल्या रक्तदान शिबिराचे नेटके नियोजन केले होते. शहर व तालुक्यात कोविडचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता कोणत्याही केंद्रावर गर्दी होणार नाही व त्यातून सामाजिक अंतराचे उल्लंघन होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली होती. शिबिरस्थळी वावरणार्या प्रत्येकाच्या मुखावर मास्क होते, नव्याने येणार्या सदस्यांना व रक्तदात्यांनाही मास्कशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. सकाळी 8 ते रात्री 8 अशा जवळपास बारा तास चाललेल्या या शिबिरातून ताशी 68 रक्तपिशव्या या गतीने 812 पिशव्या रक्त संकलिक करण्यात आले. यासाठी अर्पण व आधार रक्तपेढ्यांचे सहकार्य मिळाले.