संगमनेरची ओळख सांगणार्या नद्यांना ‘प्रदूषणा’चा फास! अमृतवाहिनीवर वाळू तस्करांचे दरोडे; तर, म्हाळुंगीनदी बनली शहराची गटारगंगा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे स्थानिक प्रशासनाकडून ‘साबरमती रिव्हरफ्रंट’च्या धर्तीवर संगमनेरच्या नदीकाठ विकासाची गुलाबी स्वप्ने रंगवली जात आहेत, मात्र जमिनीवरचे विदारक वास्तव या स्वप्नांना छेद देणारे आहे. मत्स्यपुराणानुसार ज्या अमृतवाहिनीचा उगम साक्षात विष्णूंच्या चरणांशी जोडला गेला, ती प्रवरा आणि तिची उपनदी म्हाळुंगी आज प्रदूषणाच्या विळख्यात गुदमरत आहेत. सातवाहन काळातील समृद्ध ‘संगमिका’ ते आजचे ‘डिजिटल संगमनेर’ असा हजारो वर्षांचा प्रवास लाभलेल्या या नद्या आज मानवी हव्यास आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत.

भारतीय संस्कृतीत नद्यांना केवळ जलस्रोत नव्हे, तर ‘लोकमाता’ मानले गेले आहे. संगमनेरच्या बाबतीत हा इतिहास अधिक प्रगल्भ आहे. पौराणिक कथांनुसार, समुद्रमंथनावेळी राहू असुराने चोरुन अमृत प्राशन केले, तेव्हा भगवान विष्णूंनी त्याचे मस्तक उडवले. त्यातून जे अमृत पृथ्वीवर सांडले, तीच ही ‘अमृतवाहिनी’ प्रवरा अशी श्रद्धा आहे. याच नदीच्या काठी दंडकारण्यात प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मणाचे वास्तव्य होते, असे दाखले रामायणात आढळतात. मात्र, आज याच पवित्र पात्रात ‘अधर्मा’चा नंगानाच सुरु आहे.

गेल्या अडीच दशकांपासून प्रवरेच्या पात्रातून होणार्या अनिर्बंध वाळू उपशाने नदीची नैसर्गिक परिसंस्था उद्धवस्त झाली आहे. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय अभयामुळे फोफावलेल्या वाळू तस्करांनी नदीचे पात्र इतके पोखरले आहे की, पालिकेने बांधलेल्या संरक्षक भिंती आणि ऐतिहासिक घाटांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. वाळू हा नदीचा नैसर्गिक फिल्टर असतो; तीच संपल्यामुळे पावसाळ्याचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते, परिणामी भूजल पातळी खालावली आहे. साचलेल्या डबक्यांमुळे डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांनी शहराचा विळखा घट्ट होत आहे.

ज्या म्हाळुंगी नदीने शहराला सौंदर्य दिले, तिला पालिकेने अधिकृत ‘गटार’ घोषित केल्यासारखी स्थिती आहे. शहरातील लाखो लिटर मैलापाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीपात्रात सोडले जाते. यामुळे नदीचे पाणी काळवंडले असून त्यातून सुकेवाडी, खांजापूर यांसारख्या लगतच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कायमस्वरुपी विषारी बनले आहेत. नदीपात्राचा वापर केवळ सांडपाण्यासाठीच नव्हे, तर कत्तलखान्यातील टाकाऊ अवशेष आणि हॉटेलमधील घाण टाकण्यासाठीही केला जात आहे. रात्रीच्या अंधारात काही समाजकंटक जनावरांचे रक्त आणि हाडे थेट पात्रात फेकत असल्याने पर्यावरणासोबतच सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. संगमनेर खुर्द ते साटम मठ आणि स्वामीसमर्थ मंदिर ते अकोलेनाका या परिसरातील रिंगरोड त्यामुळे दुर्गंधीचे केंद्र बनले आहेत.

नदीतील प्रदूषण थांबवण्यासाठी साधी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारता न येणार्या पालिकेला कोट्यवधींच्या रिव्हरफ्रंटचे स्वप्न पाहण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे. जोपर्यंत नद्यांमधील वाळू तस्करी थांबत नाही आणि सांडपाणी नदीत सोडणे बंद होत नाही, तोपर्यंत नद्यांच्या नावाने केले जाणारे कोणतेही सुशोभीकरण केवळ ‘वरपांगी मलमपट्टी’ ठरेल याचा सत्ताधार्यांनी विचार करण्याची गरज आहे.

संगमनेरची संस्कृती ही नद्यांनी समृद्ध झाली आहे. जर या नद्याच मृत पावल्या, तर शहराचा ऐतिहासिक वारसा कायमचा पुसला जाईल. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करुन साबरमतीसारख्या नद्यांचे ‘रिव्हरफ्रंट’ समोर ठेवून त्याची चकाकी दाखवण्यापेक्षा स्थानिक समृद्धीचे मूळ स्रोत असलेल्या या नद्या ‘निर्मल आणि अविरत’पणे आपले पावित्र्य सांभाळून कशा प्रवाहीत राहतील यासाठी प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे. केवळ नद्यांच्या काठावर बांधकामं आणि उद्यानं घालूनही या नद्या प्रदुषीत आणि दुर्गंधीत डूबलेल्या राहण्याचीच अधिक शक्यता आहे या गांभीर्याने विचार होणं आवश्यक आहे.

