महाराज ‘सुटले’ अन् उद्योजक ‘गुतले’! शाही सोहळ्याच्या खर्चाची कबुली; टीकेचा बाण मात्र उद्योजकांच्या छाती..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या कन्येचा विवाह सोहळा सध्या केवळ अक्षतांच्या शुभ्रतेमुळे नव्हे, तर त्यावरुन उठलेल्या वादाच्या धुरामुळेही राज्यभर चर्चेत आहे. दुसर्याला शालजोडे मारले की टाळ्या पडतात, पण स्वतःवर वेळ आली की स्पष्टीकरण द्यावे लागते, या उक्तीचा प्रत्यय नुकताच संगमनेरात आला. आपल्या हजारो कीर्तनांतून ‘साध्या लग्नाचा’ मंत्र देणार्या महाराजांनी आपल्या मुलीच्या लग्नातील कोट्यवधींच्या खर्चाचा भार आपला नसून तो ‘भक्तांनी’ आणि ‘उद्योजकांनी’ उचलल्याचे जाहीर केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात गाडगे बाबांच्या वारशाची आठवण करुन देत, लग्नातील अवाजवी खर्चावर आसूड ओढणारे इंदोरीकर महाराज आपल्याच मुलीच्या लग्नात मात्र काहीसे ‘बॅकफूट’वर गेल्याचे दिसले. सोशल मीडियावर होणार्या त्यांच्यावरील टीकेला उत्तर देताना त्यांनी भावनिक साद घातली. आम्ही 32 वर्षे रक्ताचे पाणी केलं, पण मुला-मुलीला बापाचे सुख देऊ शकलो नाही, असे सांगताना त्यांनी आपल्या कष्टाचा पाढा वाचला. मात्र, याचवेळी त्यांनी लग्नातील 90 टक्के खर्चाचा भार ‘स्वदेश प्रॉपर्टीज’चे बाळासाहेब देशमाने आणि रामहरी कातोरे या दोन उद्योजकांनी उचलल्याचे जाहीरपणे सांगितले. महाराजांच्या या प्रांजळ कबुलीमुळे ते स्वतः टीकेच्या फेर्यातून ‘सुटले’ असले तरी, ज्या दोन उद्योजकांची नावे त्यांनी भरलग्नात घेतली, ते मात्र आता ‘तांत्रिक’ आणि ‘सामाजिक’ पेचात ‘गुतले’ गेल्याची चर्चा रंगली आहे.

कूत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच, या आपल्या आवडत्या म्हणीचा आधार घेत महाराजांनी टीकाकारांना ‘नास्तिक प्रवृत्तीचे’ ठरवले. चांगदेव पासष्टीचा दाखला देत त्यांनी अलंकार कोणताही असला तरी सोने आपले सुवर्णपण सोडत नाही, असे सांगून स्वतःच्या कृतीचे समर्थन केले. मात्र, येथे प्रश्न सोन्याच्या शुद्धतेचा नसून तत्वज्ञानाच्या सुसंगततेचा आहे. ज्या व्यासपीठावरुन ‘मिष्टान्न भोजन’ आणि ‘देखाव्यावर’ टीका झाली, त्याच व्यासपीठाच्या साक्षीने झालेला हा ‘शाही सोहळा’ म्हणजे ‘बोले तैसा न चाले’ या पठडीतील तर नाही ना? असा टोकदार प्रश्न आता समाजमाध्यमांतून विचारला जात आहे.

या विवाह सोहळ्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे, महाराजांनी घेतलेली ‘ती’ दोन नावे. बँडवाला, मांडववाला किंवा आचारी यांच्याशी गेल्या 26 वर्षात आपला कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगत महाराजांनी आर्थिक व्यवहारातून आपले हात झटकले. परंतु, एका सार्वजनिक कार्यक्रमासाठी कोणा उद्योजकांनी इतका मोठा खर्च करणे, हे भविष्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण करणारे ठरु शकते. महाराजांनी ज्या ओघाने ही नावे घेतली, त्यातून त्यांचा उद्देश कृतज्ञता व्यक्त करण्याचा असला, तरी त्यातून महाराज ‘सुटले’ अन् उद्योजक ‘गुतले’ असेच चित्र सध्या दिसत आहे. सोशल माध्यमातही त्यावरुन चर्चेचे धुमारे उसळत असून महाराजांकडून ‘त्या’ दोघांचा करेक्ट कार्यक्रम झाल्याचेही बोलले जात आहे.

‘कीर्तनात मठ्ठा’ आणि ‘गुलाबजाम’वर बंदी घालणार्या महाराजांच्या सोहळ्यात सात्विक जेवणाचा दावा झाला असला तरी ‘खर्चाचा आकडा’ सात्विकतेच्या पलीकडचा असल्याचे बोलले जात आहे. उद्योजक बाळासाहेब देशमाने (स्वदेश प्रॉपर्टीज) आणि रामहरी कातोरे यांच्या खांद्यावर खर्चाची धुरा टाकून महाराजांनी सुरक्षित रस्ता शोधला खरा, पण या उद्योजकांसाठी हा ‘प्रसाद’ भविष्यात जड जाण्याची चिन्हे आहेत. टीकाकारांची बौद्धिक पातळी काढत महाराजांनी हटयोग आणि ज्ञानयोगाची चर्चा केली, मात्र सर्वसामान्य वारकरी तत्वांच्या ‘कोर्या पत्रा’चा दाखला देत लोकांना संभ्रमातही टाकले आहे. त्यातून हा सोहळा केवळ एक विवाह नसून तो ‘सेलिब्रिटी’ कीर्तनकाराच्या शब्दांची आणि कृतीची कसोटी पाहणारा ठरला आहे.

