संघर्षाचा ‘महामेरु’..

जगाच्या राजकीय इतिहासात अनेकदा अशा घटना घडतात, जिथे प्रस्थापित सत्तेचे बुरुज ढासळतात आणि एक सामान्य चेहरा इतिहासाच्या पानांवर आपली मोहोर उमटवतो. रशियाच्या विस्तीर्ण भूमीवर जेव्हा व्लादिमीर लेनिन यांनी सामान्य कष्टकर्यांच्या जोरावर क्रांतीची मशाल पेटवली, किंवा अमेरिकेत अब्राहम लिंकन यांनी एका लाकूडतोड्याच्या झोपडीतून व्हाईट हाऊसपर्यंत मजल मारली, तेव्हा जगाला उमजले की, ‘सामर्थ्य हे रक्ताच्या वारशात नसून घामाच्या थेंबात असते.’ महाराष्ट्राच्या मातीत आणि विशेषतः संगमनेरच्या राजकारणात असाच एक ‘जायंट किलर’ म्हणून उदयाला आलेला शब्दप्रभू आणि लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार अमोल धोंडीबा खताळ.

आकाशाशी जडले नाते, धरणीमाता आपली..
कष्टाच्या या घामातूनच, स्वप्ने होतात साजिरी!
या ओळींप्रमाणे अमोल खताळ यांचा प्रवासही एका साध्या शेतकरी कुटुंबातून सुरु झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर संगणकाचे तंत्रज्ञान अवगत करुन, वीस वर्षांपूर्वी एका छोट्याशा ‘सायबर कॅफे’तून त्यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासाची पहिली पायरी चढली. आजच्या भाषेत ज्याला आपण ‘स्टार्ट-अप’ म्हणतो, त्याचे ते आद्य वारकरी ठरले. मात्र, केवळ स्वतःचा उत्कर्ष साधणे हा त्यांचा पिंड नव्हता. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुला’ या संत तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे, समाजातील वंचितांचे प्रश्न त्यांना अस्वस्थ करत राहिले आणि याच अस्वस्थतेतून त्यांचा राजकीय जन्म झाला.

संगमनेर जिल्हा व्हावा, या मागणीसाठी त्यांनी राबवलेले ‘स्वाक्षरी अभियान’ ही त्यांच्या संघर्षाची पहिली मोठी नांदी होती. 46 दिवसांचे आंदोलन आणि दीड लाख नागरिकांचा सहभाग ही केवळ आकडेवारी नसून, तो अमोल खताळ यांच्या जनसंपर्काचा आणि संयमाचा विजय होता. याच आंदोलनाने त्यांना आमदारकीच्या जवळ नेले आणि एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली.

प्रखर हिंदुत्व आणि गोवंश रक्षणाची भूमिका घेताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून तब्बल 16 हजार गरजूंना न्याय मिळवून देणं, यातून त्यांच्यातील संवेदनशील प्रशासकाचे दर्शन घडते. संगमनेरच्या प्रस्थापितांविरुद्ध दंड थोपटताना त्यांना अनेकदा आर्थिक आमिषंही दाखवली गेली, पण ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’ हा समर्थ रामदासांचा मंत्र त्यांनी जणू काळजात कोरला होता. प्रलोभनांच्या चिखलात न अडकता त्यांनी प्रामाणिकतेचे कमळ फुलवले.

निग्रहाचा तो डोंगर, धैर्याचा तो सागर..
लोकांचिया कल्याणा, जो वाहे निरंतर!
निवडणुकीच्या रिंगणात उतरताना ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज विनामूल्य भरुन देणारा हा कार्यकर्ता खर्या अर्थाने घराघरात पोहोचला. केवळ 10-12 दिवसांच्या प्रचारात, पायाला भिंगरी बांधून त्यांनी जो विजय मिळवला, तो संगमनेरच्या राजकीय इतिहासातील एक ‘चमत्कार’ मानला जातो. मात्र, हा चमत्कार नसून त्यांच्या गेल्या 25 वर्षांच्या तपश्चर्येचे ते फळ आहे.

आमदार म्हणून निवडून येताच त्यांनी दाखवलेली कामाची तत्परता थक्क करणारी आहे. भोजापूर पुरचारीला पाणी सोडून त्यांनी दुष्काळी भागाची तहान भागवली, ही त्यांच्यासाठी केवळ योजना नव्हती, तर तो एक ‘भागीरथी प्रयत्न’ होता. पुणे-नाशिक रेल्वेमार्ग असो वा, तालुक्यातील नवी औद्योगिक वसाहत, संगमनेरच्या विकासाला समृद्धीच्या दिशेने वळवण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न चालवले आहेत.

आजच्या झगमगाटाच्या राजकारणात अमोल खताळ एक असे व्यक्तिमत्व आहेत, जे सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होतात. सत्तेची हवा डोक्यात जाऊ न देता, पाय जमिनीवर ठेवून चालणारा हा ‘कार्यकर्ता आमदार’ उद्याच्या महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे. त्यांच्या या धडाडीला, अढळ आत्मविश्वासाला आणि जनसेवेच्या या महान यज्ञाला उदंड शुभेच्छा!
– श्याम तिवारी
कार्यकारी संपादक

