इतिवृत्ताच्या मुद्द्यावर अडखळली शांतता समितीची बैठक! पोलीस अधीक्षक राकेश ओला; मुस्लिम समाजाने अन्य ठिकाणचे अनुकरण करावे..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुढील आठवड्यात सुरु होणारा गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या दिवशी येणारा ईद-ए-मिलादचा सण या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बैठका घेतल्या जात आहेत. हे दोन्ही उत्सव आनंदाने आणि शांततेत साजरे व्हावेत यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या असून अहमदनगरसह शेवगाव, श्रीरामपूर, नेवासा व श्रीगोंदा येथील मुस्लिम समाजाने पैगंबर जयंतीला निघणार्या मिरवणुकांच्या तारखा बदलल्या आहेत. त्या अनुषंगाने संगमनेरातील मुस्लिम समाजानेही पुढाकार घेवून जिल्ह्यासह राज्यातील अन्य ठिकाणच्या मुस्लिमांनी घेतलेल्या निर्णयाचे अनुकरण करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेरात केले.
आगामी कालावधीतील सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आज (ता.१६) संगमनेरात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस अधीक्षक ओला बोलत होते. प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक शिरीष वमने, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यासह जलसंपदा, वीज मंडळ व वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अधीक्षक ओला म्हणाले की, भारतीय परंपरेतील विविध सण-उत्सव सर्वांना सोबत घेवून मोठ्या उत्साहात साजरे करण्याची आपली पद्धत आहे. यापूर्वी गणेशोत्सवादरम्यान मोहरमचा सण साजरा झाला आहे, त्यातून सामाजिक एकोप्याचेही दर्शन घडले आहे. यावेळी मात्र एकाच दिवशी विसर्जन आणि पैगंबर जयंती असल्याने त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. त्यासाठी राज्यात मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणच्या मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवून ईदच्या निमित्ताने निघणार्या मिरवणुका पुढे ढकलल्या आहेत. संगमनेरातही असाच निर्णय होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक गणपती मंडळांनी परवानगी घेतल्याशिवाय उत्सव साजरा करु नये असे सांगत त्यांनी मंडळांसाठी छोटी माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून त्यात वेगवेगळ्या अर्जाचे नमुने, उत्सवाबाबतच्या सूचना आणि महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनीही गणेशोत्सवाचे नियोजन पूर्ण केले असून यावेळी प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाला किमान एक पोलीस कर्मचारी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मंडळांनीही सुरक्षितता म्हणून मांडवात व बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, महिला व मुलींची छेडछाड होणार नाही यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.
उत्सवाच्या काळात वीजेची मागणी वाढल्यानंतरही त्यात तूट राहणार नाही यासाठी राज्य शासनाने पूर्ण नियोजन केल्याची माहितीही अधीक्षक ओला यांनी दिली. सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृतपणे वीजजोड घेवूनच त्याचा वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय डीजेच्या बाबतीत प्रशासनाची भूमिका कठोर असल्याचे सांगत कोणत्याही स्थितीत ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, वर्गणीसाठी कोणावरही दबाव आणू नये, आक्षेपार्ह देखावे सादर करुन सलोख्याचे वातावरण खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी, लहान मुलांना विसर्जनाच्या ठिकाणी घेवून जावू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी राज्य सरकारच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव अभियानात सहभागी होवून संगमनेरच्या सार्वजनिक गणेश मंडळांनी किमान एक पारितोषिक मिळवावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माजी नगरसेवक व शहर भाजपाध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचल्यानंतर अधिकार्यांनी त्यावर काय कारवाई केली याची माहिती देवूनच पुढील कामकाज सुरु करण्याची मागणी केली. त्यांचा हाच मुद्दा माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, कैलास वाकचौरे, अॅड.सुहास आहेर यांनी लावून धरला. मात्र सध्या संगमनेरातील संपूर्ण प्रशासन नव्याने बदलून आलेले असल्याने मागील सभेचे इतिवृत्त उपलब्ध न झाल्याने पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्डे, वीज पुरवठ्याबाबतच्या अडचणी, खंडीत होणारा पुरवठा, नदीपात्रातील पाणी अशा दरवर्षीच्या मुद्द्यांवरच आजची बैठक केंद्रीत राहिली.
माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी वीज मंडळातील उर्मटपणे बोलणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा मुद्दा उपस्थित करुन सण-उत्सवांच्या कालावधीत त्यांच्या वागणुकीत बदल करण्याची सूचना मांडली. माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी डीजे बंदीचा निर्णय केवळ उत्सवापुरता न ठेवता लग्नसोहळे, वराती व अन्य कार्यक्रमातही त्याची अंमलबजावणी का होत नाही? असा सवाल केला. एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमात सहभाग घेणार्या व्यापार्यांच्या मनात ‘पोलिसांची आणि कोर्टाची झंझट’ अशी शंका आहे, ती दूर करण्याची मागणीही त्यांनी केली. माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी संगमनेरातील अश्लील चाळ्यांचे केंद्र ठरलेल्या ‘कॅफे’ हाऊस विरोधात झालेल्या कारवाईबाबत संगमनेर पोलिसांचे कौतुक केले.
श्रीरामपूरमधून दररोज सकाळी काही महिला संगमनेरात येतात आणि चोर्या करुन परत जातात याकडेही त्यांनी पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले. प्रत्येक सणाला फक्त वीज मंडळाच्या विरोधातच रोष का निर्माण होतो याचे एकदा वीज कंपनीच्या अधिकार्यांनी आत्मचिंतन करण्याचा सल्लाही मुर्तडक यांनी दिला. माजी नगरसेवक किशोर पवार यांनी सौहार्दाच्या वातावरणात संगमनेरातील उत्सव साजरे केले जातात असे सांगताना विसर्जनाचा दिवस सोडून निघणार्या ईदच्या मिरवणुकीचे जागोजागी स्वागत करण्याची सूचना मांडली. तसेच, विसर्जनासाठी सर्वाधिक वापर होणार्या अकोले रोड व कासारवाडी रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करण्याची मागणी केली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमेश्वर मंडळाकडून एका गरजू विद्यार्थीनीला सायकल भेट देण्याची घोषणाही त्यांनी केली.
राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष, उद्योजक मनीष मालपाणी यांनी अधीक्षकांच्या आवाहनाचा धागा पकडून मुस्लिम समाजाने महाराष्ट्रातील अन्य ठिकाणी घेतल्या गेलेल्या निर्णयाचे अनुकरण करण्याची विनंती केली. संगमनेरातील रस्त्यांवर खड्ड्यांपेक्षा गतीरोधकच अधिक असल्याची कोपरखळीही त्यांनी हाणली. मंडळांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचार्यांवर भाष्य करताना मालपाणी यांनी त्यांच्यासाठी किमान एकवेळ जेवणाची व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची सूचना केली. माजी नगरसेवक नूरमोहंमद शेख यांनी आज (ता.१६) सायंकाळच्या चंद्रदर्शनानंतरच पैगंबर जयंतीच्या मिरवुणकीचा निर्णय होईल असे सांगितले.
शहर काझी रकीब पीरजादे यांनी आज (ता.१६) चंद्रदर्शन झाले तरच ईद-ए-मिलाद २८ सप्टेंबर रोजी साजरी होईल. मात्र आज चंद्रदर्शन न झाल्यास ईद पुढच्या दिवशी साजरी होईल. त्यासाठी आजची रात्र वाट पाहण्याची आवश्यकता व्यक्त करताना आज चंद्रदर्शन झाले तरीही पुढील दोन दिवसांत अन्य मौलाना आणि समाजातील ज्येष्ठांशी चर्चा करुन संगमनेर शहरासाठी चांगला असेल असाच निर्णय घेण्याची ग्वाही यावेळी दिली. निखील पापडेजा, करुलेचे सरपंच बाळासाहेब कोल्हे यांनीही आपले मत मांडले. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी स्वागत आणि प्रास्तविक केले, नीलेश पर्बत यांनी सूत्रसंचालन तर उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आभार मानले. या बैठकीला सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांसह शहरातील हिंदू-मुस्लिम समाजातील प्रतिष्ठीत नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज (ता.१६) चाँद रात आहे. आज रात्री चंद्रदर्शन झाले तरच गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी येईल. मात्र आज तसे घडले नाही तर ईदचा सण आपोआप पुढच्या दिवसावर जाईल. आज रात्री चंद्रदर्शन झाले तरीही आम्ही प्रशासन आणि स्थानिक गणेश मंडळांच्या विनंतीनुसार पुढील दोन दिवसांत शहरातील अन्य मशिदींचे मौलाना आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांशी सल्लामसलत करुन सकारात्मक निर्णय घेवू.
– रकीब पीरजादे
शहर काझी, संगमनेर