‘सह्याद्री’ समोरील घटनेला ‘भ्रष्टाचारा’चा गंध! स्कॉर्पिओ घालून जीवे मारण्याचा प्रयत्न; जखमी विद्यार्थ्याचा महिन्यानंतरही जवाब नाही..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
हल्लीच्या काळात धनदांडग्यांच्या अल्पवयीन मुलांकडून बेदरकारपणे वाहने चालवून सामान्यांचे जीव धोक्यात घालण्याच्या घटना वारंवार समोर येत असताना संगमनेरमध्ये मात्र या बेदरकारपणाला गुन्हेगारीचा स्पर्श होवून चक्क विद्यार्थ्यांच्या एका टोळक्याने दुसर्‍या टोळक्यावरच वाहन घातले. सह्याद्री शाळेसमोरच घडलेल्या या घटनेत ज्यांच्याशी वाद होते त्यांना काहीच झाले नाही, मात्र कोणताही संबंध नसलेला सातवीतला विद्यार्थी गंभीर जखमी झाला. शालेय क्षेत्रात खळबळ उडवणार्‍या या घटनेनंतर ‘स्कॉर्पिओ’ घालून विद्यार्थ्यांच्या टोळक्याला उडवू पाहणारे आठही जण तेथून पसार झाले. या प्रकरणी हल्ल्याचा प्रयत्न झालेल्या विद्यार्थ्यांमधील एकाने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. मात्र घटनेला दीड महिन्याचा कालावधी उलटत असतानाही ‘त्या’ जखमी विद्यार्थ्याचा अद्याप जवाब नोंदवलेला नाही. त्याच्या पालकांनी तपासी अधिकार्‍यांकडे चौकशी केली असता प्रकरण सामोपचाराने मिटल्याचे ‘अजब’ उत्तर त्यांच्याकडून मिळाले. त्यामुळे पुण्याच्या ‘पोर्शे’ प्रमाणे या प्रकरणालाही आता भ्रष्टाचाराचा ‘गंध’ येवू लागला आहे. या घटनेत नाहक जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे पालक मोलमजुरी करुन उपजीविका करणारे असून त्यांच्याकडे मुलाच्या उपचारांसाठीही पैसा नाही अशी स्थिती आहे.


दीड महिन्यापूर्वी 12 डिसेंबररोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सदरचा प्रकार घडला होता. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्यातरी विषयावरुन दोन गट निर्माण झाले होते. त्याचे पर्यावसान सुरुवातीला शाब्दीक आणि नंतर थेट एकमेकांच्या जीवावर उठण्याइतपत प्रकरण जाण्यापर्यंत ते ताणले गेले. या प्रकरणात घटनेच्या दिवशी वडगाव लांडगा येथील एका धनदांडग्याचा अल्पवयीन मुलगा स्कॉर्पिओ (क्र.एम.एच.12/डी.एन.5864) हे चारचाकी वाहन घेवून आपल्या सहा साथीदारांसह सह्याद्री शाळेजवळ आला. यावेळी विद्यार्थ्यांचा दुसरा गट बसस्थानकावरुन मोटार सायकलवर बसून शाळेच्या समोरील भागात असलेल्या बोळात गेले. ही सगळी मंउळी तेथे जमल्याचे पाहुन ‘स्कॉर्पिओ’ चालवत असलेल्या अल्पवयीन मुलाने कोणताही विचार न करता थेट वाद असलेल्या ‘त्या’ मुलांच्या अंगावरच वाहन घातले. प्रसंगावधान राखून त्या सर्वांनी ऐनवेळी उड्या मारुन आपला जीव वाचवला.


मात्र विद्यार्थ्यांच्या या दोन्ही टोळक्यांशी कोणताही संबंध नसलेला ओंकार अरुण हराळे (इयत्ता सातवी) हा विद्यार्थी मात्र पायावरुन वाहन गेल्याने गंभीर जखमी झाला. या प्रकरणात शहर पोलिसांनी वाहनासह हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांमधील एका 17 वर्षीय मुलाची फिर्याद नोंदवतांना वडगाव लांडग्याच्या दोन सख्ख्या भावांसह सातजणांवर खुनाचा प्रयत्न करण्यासह भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलामन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करणार्‍या सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ यांनी या प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा जवाब नोंदवून पुढील कारवाई करणं आवश्यक होते. त्यासोबतच घटनेच्यावेळी वाहन चालवणार्‍या आरोपीकडे परवानाही नव्हता. त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा नोंद होण्याचीही अपेक्षा होती.


या घटनेत जखमी झालेला ओंकार हराळ हा सातवीतला विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील असून त्याचे आई-वडील मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. अशा स्थितीत वडगाव लांडग्यातील ‘त्या’ आरोपीच्या पालकांनी सुरुवातीला किरकोळ अर्थसहाय्य करीत उपचाराचा संपूर्ण खर्च पेलण्याची हमी भरली. मात्र त्यानंतर संपर्कच थांबवल्याने सध्या या विद्यार्थ्यावर उपचार करणंही त्याच्या पालकांसाठी अवघड झालं आहे. त्यातच पोलिसांकडूनही या प्रकरणाला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचा संशय आल्याने त्याच्या पालकांनी तपासी अधिकार्‍यांकडे मुलाच्या जवाबाबाबतची विचारणा केली असता सुरुवातीला उडवाउडवी आणि नंतर ‘फिर्यादी आणि आरोपी यांच्यात परस्पर सहमतीने तडजोड झाली आहे’ असे ‘अजब’ उत्तर त्यांच्याकडून मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


खरेतर या प्रकरणात जखमी झालेल्या विद्यार्थ्याची स्वतंत्र तक्रार दाखल करुन ‘त्या’ सातजणांवर गुन्हा दाखल होण्याची गरज होती. मात्र पोलिसांनी कोणतीही शारीरिक इजा न झालेल्या गटातील विद्यार्थ्याची फिर्याद दाखल करुन घेत त्यांना जीवे ठार मारण्याच्या आरोपींच्या प्रयत्नात ओंकार हराळे हा विद्यार्थी जखमी झाल्याचे दाखवले. घटना होवून दीड महिना उलटला तरीही पोलिसांकडून जवाब नोंदवण्यासाठी कोणीही आले नाही. हा सगळा घटनाक्रम अतिशय संशयास्पद असून या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या कुटुंबियांच्या मनात निर्माण झाली आहे. वरीष्ठांनी त्याची दखल घेवून वास्तव कारवाई करुन जखमी विद्यार्थ्याच्या मनात कायद्याविषयीचा आदर कायम ठेवण्याची गरज आहे.


समाजातील ‘धनदांडग्यां’च्या अल्पवयीन मुलांना कायद्याचा धाकच नसल्याच्या काही घटना अलिकडे समोर आल्या आहेत. पुण्यातील ‘पोर्शे’कार दुर्घटनेनंतर राज्यातील अन्य भागातही बेदरकारपणे कार चालवून सामान्यांचा बळी जाण्याच्या घटना घडतच असताना संगमनेरात मात्र श्रीमंतांच्या बिघडलेल्या अल्पवयीन मुलांनी थेट ‘स्कॉर्पिओ’ वाहन घालून विरुद्ध गटातील विद्यार्थ्यांनाच चिरडण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने या घटनेत पायावरुन वाहन गेल्याने सातवीतला एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. वरकरणी हा प्रकार विद्यार्थ्यांच्या दोन गटातील वादाइतकाच दिसत असला तरी एका गटाकडून थेट चारचाकी अंगारवर घालून जीव घेण्याचा प्रयत्न मात्र खूप गंभीर आहे. मात्र पोलिसांना अद्यापही या प्रकरणात ‘गांभीर्य’ असल्याचे दिसून आलेले नाही, त्यामुळे या प्रकरणालाही ‘पोर्शे’प्रमाणे भ्रष्टाचाराचाही ‘गंध’ येवू लागला आहे.

Visits: 118 Today: 1 Total: 255865

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *