एकता चौकातील ‘व्हिडिओ’ ठरतोय नागरी दहशतीचे कारण! बिबट्याची दुचाकीवर झेप; वनविभागाने दुर्घटनेपूर्वीच लक्ष देण्याची गरज..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत तालुक्याच्या विविध भागात बिबट्याच्या हल्ल्यात मानवी जीव जाण्याच्या एकामागून एक घटना समोर आल्या आहेत. त्यावरुन नागरिकांच्या संयमाचा अंत होवून आंदोलनाचे हत्यारही उपसले गेले. त्यातून दबावात आलेल्या वनविभागाने बिबटे जेरबंद करण्याचा सपाटा लावून अवघ्या महिन्याभरातच डझनभर बिबट्यांना पिंजर्यात अडकवले. मात्र त्या उपरांतही या हिंस्त्र श्वापदाचे भय कमी होत नसून आतातर त्याने थेट शहरीभागात दाट लोकवस्तीच्या भागातच गुरगुरण्यास सुरुवात केल्याने संगमनेरात दहशत निर्माण झाली आहे. अर्थात शहरालगतच्या गुंजाळवाडी, घुलेवाडी, सुकेवाडी व कासारवाडीसारख्या भागात यापूर्वीही बिबट्यांचा संचार असल्याचे आढळले आहे. मात्र त्यांच्याकडून आजवर मानवावर हल्ला झाला नसल्याने शहरी नागरिकांचा सामान्य वावर कायम असतानाच आता मालदाड रस्त्यावरील एकता चौकातून अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. समाज माध्यमात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका बंगल्याच्या आडोशाला दबा धरुन बसलेला बिबट्या रस्त्यावरुन जाणार्या दुचाकीस्वारावर झेप घेत असल्याचे दिसत असून या भयानक घटनेतून ‘तो’ इसम बालंबाल बचावल्याचा थरारही अनुभवायला येत आहे.

चोहोबाजूंनी सह्याद्रीच्या डोंगरांनी वेढलेल्या संगमनेर तालुक्यातून वाहणार्या मुळा आणि प्रवरा या दोन्ही नद्यांच्या खोर्यात बिबट्यांची मोठी संख्या आहे. संगमनेर-अकोले तालुक्याला लागून असलेल्या डोंगररांगा, जंगलाचे क्षेत्र, मोठ्या प्रमाणात शिकारीची सोय आणि धरणांमुळे पाण्याची विपूल उपलब्धी असल्याने कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारन्यात काही दशकांपूर्वी पर्यंत बिबट्यांचे साम्राज्य होते. मात्र या अभयारन्यातील रानडुकरांना ‘एक है तो, सेफ है’ हा मंत्र कोणीतरी सांगितला आणि त्यापूर्वी एकट्या-दुकट्या फिरणार्या आणि अगदी सहज बिबट्याचे भक्ष्य होणार्या रानडुकरांनी संघटीत होवून या श्वापदालाच जंगली क्षेत्रातून हुसकावले. त्यासोबतच संरक्षित असल्याने बिबट्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली.

त्याचा परिणाम पूर्णतः जंगली वास्तव्य असलेल्या या श्वापदाला अन्न-पाण्यासाठी जंगलाची मर्यादा ओलांडून आसपासच्या मानवी वस्त्यांचा आधार
घ्यावा लागला. दिवसा शेतात अथवा आसपासच्या आडोशाला छपून रात्रीच्यावेळी शेतकर्यांच्या पाळलेल्या जनावरांची अथवा पाळीव किंवा मोकाट कुत्र्यांची शिकार करुन त्यांची उपजीविका सुरु झाली. अशा घटनांमध्ये वाढ होवू लागल्याने पशूपालकांनी आपले गोठे सुरक्षित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिबट्यांची उपासमार सुरु झाल्याने ते आणखी दाट लोकवस्तीच्या क्षेत्राकडे सरकू लागले. त्यातूनच मानव आणि बिबट्यांचा वारंवार सामना होवू लागला असून एकमेकांशी संघर्षाच्या घटनाही समोर येत आहेत. संगमनेर तालुक्यात तर, अलिकडच्या दोन-चार महिन्यांतच बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुरडीसह दोन महिला आणि पुरुषाला आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या ऑगस्टमध्ये निमगांव टेंभीत अंगणात खेळणार्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात गंभीर जखमी होवून तिचा बळी गेला. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यातच त्याच गावातील वर्पे वस्तीवर दारात धुणी धूत असताना संगिता शिवाजी वर्पे (वय 40) या महिलेवर पाठीमागून झडप घालीत बिबट्याने त्यांना जवळपास 25 फूटापर्यंत फरफटत नेलं. त्यात त्या महिलेला गंभीर जखमा झाल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होवून त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वनविभागाने तातडीची पावलं उचलण्याची गरज असताना प्रत्यक्षात मात्र अधिकारी लाकड्यांच्या हिशोबातच व्यस्त राहीले. त्यामुळे या भयंकर घटनेच्या महिनाभरातच याच गावाच्या पंचक्रोशीत मोडणार्या देवगावमधील पानमळ्यात गवत कापत असताना योगिता आकाश पानसरे (वय 38) या महिलेवर बिबट्याने हल्ला करुन त्यांचा जीव घेतला.

एका पाठोपाठ तीन घटना घडल्यानंतरही संगमनेरचा वनविभाग त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्या गावांसह बिबट्यांचा संचार अनुभवणार्या भागात संताप तयार झाला. ऐन विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देवगावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने त्याचा भडका
उडाला आणि दशर्याच्या दिवशी सकाळीच संतप्त शेकडों नागरिकांनी पिंपरणे फाट्याजवळ पुणे-नाशिक महामार्ग रोखला. यावेळी आंदोलनस्थळावरुन जात असलेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन त्यांच्या भावना जाणल्या व थेट तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाहीर फोन लावला. त्यांनीही नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे जाहीर आदेश दिले. त्यानंतर काही दिवसांतच पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर अशा कितीतरी ठिकाणांहून ‘शूटर्स’, निष्णात कर्मचारी असा मोठा लवाजमाही देवगाव आणि परिसरात दाखल झाला.

थेट वनमंत्र्यांपर्यंत विषय गेल्याने दबावात येवून धावपळ करु लागलेल्या वनविभागाने पिंजरे लावण्याचीही घोषणा केली. त्यामुळे ज्या-ज्या भागात बिबटे दिसले किंवा त्याच्या चर्चा उठल्या अशा सगळ्या गावांमधून पिंजर्यांची मागणी होवू लागली. त्यातील बहुतेक ठिकाणी वनविभागाने पिंजरेही बसवले. महिनाभरात त्यात जवळपास डझनभर बिबटे फसल्याचेही सांगितले गेले. प्रत्यक्षात किती पकडले आणि त्यांचे पुढे काय केले?, ठार मारण्याचा आदेश असलेल्या बिबट्याचे काय झाले? असे अनेक प्रश्न आजही कायम आहेत. बिबट्यांची संख्या आणि त्यांचा मानवी वस्त्यांच्या परिसरातील संचार या गोष्टी भविष्यात अधिक वाढण्याची शक्यता असल्याने त्यावर उपाय योजण्याचीही नितांत गरज आहे.

तीन महिन्यांपूर्वी एका मागोमाग चार बळी गेल्यानंतर वनविभागाने राबवलेला ‘शो’ त्यावेळचा रोष शमवण्यात यशस्वी ठरला. मात्र आता शेती आणि लोकवस्ती असा संमिश्र मात्र मोठी वर्दळ असलेल्या विधी महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस बिबट्याच्या पूर्ण कुटुंबाचे दर्शन घडल्याची चर्चा आहे. काहींनी तर, त्यांची संख्या चार असल्याचीही माहिती दिली. गेल्याकाही वर्षात संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र बहुतेक ठिकाणी दीर्घकाळापासून वावर असूनही थेट मानव आणि बिबट्या यांच्यात संघर्ष झालेला नाही. मात्र काही भागात तो वारंवार घडत असल्याने आणि अलिकडच्या काळात वनविभागाकडून तब्बल डझनभर बिबटे जेरबंद होवूनही मालदाडरोडसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात एकाचवेळी चौघांचा वावर अतिशय धोकादायक ठरु शकतो. वनविभागाने आपल्या धुंदीतून बाहेर येवून पुन्हा एखाद्याचा जीव जाण्यापूर्वीच या परिसरात वावरणार्या बिबट्यांना पकडून त्यांना त्यांच्या हक्काच्या ठिकाणी नेवून सोडण्याची गरज आहे.

गेल्या चार दिवसांपासून मालदाडरोड वरील एकता चौकात घडलेला हा प्रकार असल्याचे सांगत सोशल माध्यमात फिरणार्या या व्हिडिओमध्ये श्रमगाथा कॉलनीतील एका बंगल्याच्या सुरक्षा भिंतीलगत दडलेला बिबट्या एका दुचाकीवर झडप घालीत असल्याचे दिसते. हल्ला झालेल्या दुचाकीवर पूंजाहरी भूसाळ होते असेही या सीसीटीव्ही फूटेजवरुन घेतलेल्या व्हिडिओच्या खाली संदेशात म्हंटले आहे. सोबतच सीसीटीव्हीने या घटनेची नोंद 20 जानेवारी रोजी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी घेतल्याचेही दिसून येत आहे. दैनिक नायकने याबाबतची सत्यता पडताळली असता हा व्हिडिओ एकता चौकातीलच असल्याचे स्पष्ट झाले असून या भागात एकापेक्षा जास्त बिबट्यांचा संचार असल्याचेही नागरिकांकडून सांगितले जात आहे.

