शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांना विमा कंपन्यांनी पुसली तोंडाला पाने! पिकांचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी शेतकर्यांना वार्यावर सोडले
नायक वृत्तसेवा, शेवगाव
मागील वर्षी खरीप पिकांसाठी विमा भरलेल्या तालुक्यातील 44 हजार 261 शेतकर्यांपैकी अवघ्या 532 शेतकर्यांनाच विमा मंजूर करून पीकविमा कंपन्यांनी शेतकर्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली आहेत. तालुक्यातील 21 हजार 705 हेक्टर पिकांसाठी संरक्षित केलेल्या रकमेच्या दोन टक्के प्रमाणात 1 कोटी 91 लाख 34 हजार 114 रुपयांचा विमा भरला होता. मात्र, पिकांचे नुकसान होऊनही केवळ 22 लाख 29 हजार 36 रुपयांचा विमा देत कंपन्यांनी शेतकर्यांची लूट केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी विविध प्रकारच्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहेत. अनावृष्टी, अतिवृष्टी, गारपीट अशा अनेक आपत्तींमुळे खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या वारंवार होणार्या नुकसानीमुळे किमान केलेला खर्च तरी मिळावा, या हेतूने शेतकरी पीकविमा भरतात. बियाणे, खते, मशागत यावर मोठा खर्च करूनही लहरी हवामानामुळे शेतकर्यांचा पीकविमा भरण्याकडे कल वाढला आहे. मात्र शेतकर्यांच्या या जोखमीचा फायदा आता विमा कंपन्याही मोठ्या प्रमाणावर घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
गेल्या वर्षी तालुक्यातील 44 हजार 261 शेतकर्यांनी 21 हजार 705 हेक्टर क्षेत्रासाठी एक कोटी 91 लाख 34 हजार 114 रुपयांचा विमा भरला होता. त्यामध्ये कपाशी, तूर, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कांदा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. गेल्या वर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने खरिपासह रब्बी पिकांचेही नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकर्यांना दिली. मात्र विमा कंपन्यांनी शेतकर्यांना वार्यावर सोडले. विमा भरलेल्या 44 हजार 261 शेतकर्यांपैकी अवघ्या 532 शेतकर्यांनाच विमा रक्कम मंजूर करून त्यांची एक प्रकारे फसवणूकच केली आहे.
पीकविम्यासाठी शासनाने नेमलेल्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला शेतकरी वैतागले आहेत. विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून नफेखोरी करणार्या या कंपन्या नैसर्गिक आपत्तीतही विमा रक्कम देण्याचे सौजन्य दाखवत नाहीत. या विषयावर शासकीय स्तरावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी पाठपुरावा करू.
– डॉ. क्षितीज घुले (सभापती-पंचायत समिती, शेवगाव)